1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (11:38 IST)

माजी सैनिकहो… तुमच्या अन् तुमच्या कुटुंबासाठी..!

आपल्या सर्वांनाच भारतीय सैन्यावर अभिमान आहे. एका विशिष्ट कालावधीची सेवा पूर्ण झाल्यानंतर भारतीय सेनेतील जवान वा अधिकारी सैन्यातून निवृत्त होतात व त्यांना माजी सैनिक/सैन्याधिकारी संबोधले जाते. हे माजी सैनिक आपआपल्या गावी येवून नवे निवृत्तीचे जीवन आपल्या कुटुंबासह जगू लागतात. या निवृत्ती जीवनात काहीजण नोकरी करतात, काहीजण व्यवसाय करतात तर काहीजण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होतात. अशा विविध क्षेत्रात लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक/त्यांच्या पत्नी/पाल्यांना अशा कार्याबद्दल गौरविण्यात येते.  त्यासंबंधीची माहिती घेवू… या लेखातून…!            
 
राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त  खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कामगिरी करणारे, पूर/जळीत/दरोडा/अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील, अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक/त्यांच्या पत्नी/पाल्यांना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरावर एकरकमी रू.10 हजार  व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रू.25 हजार चा पुरस्कार, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते.
 
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार मिळविण्यासाठी पुढीलप्रमाणे अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे.
 
खेळातील पुरस्कार
राष्ट्रीय/राज्यस्तरावर खेळात भाग घेतलेला आहे काय?
घेतला असल्यास कोणत्या खेळात भाग घेतला?
राष्ट्रीय/राज्यस्तरावर प्रमाणपत्र मिळालेले आहे काय?
उत्कृष्ट कामगिरी/पदक मिळविल्याचे वर्तमानपत्रात प्रसिध्दी/फोटो इत्यादीबाबतची कात्रणे असल्यास प्रकरणासोबत जोडली आहेत काय?
राष्ट्रीय/राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सूवर्ण/रौप्य/कांस्य यापैकी मिळविणे आवश्यक आहे किंवा
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेले असले पाहिजे. खेळामध्ये मिळविलेले प्रमाणपत्र हे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (IOA), स्पोर्टस् ॲथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) असोसिएशन इंडियन युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल फेडरेशन व त्यांशी संलग्न राज्यस्तरीय फेडरेशनचे असले पाहिले.
वर नमूद केलेल्या संस्थेव्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार निवड समितीला असतील.
 
साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इ.क्षेत्रातील पुरस्कार
साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाटय व इतर कला क्षेत्रात राष्ट्रीय/राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असला पाहिजे.
साहित्य,संगीत,गायन,वादन,नृत्य,नाटय व इतर कला क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी/पुरस्कार मिळविल्याबाबत वर्तमान साहित्य,संगीत,गायन,वादन,नृत्य,नाटय व इतर कला क्षेत्रात पत्रात प्रसिध्दी/फोटो इ. बाबतची
साहित्य,संगीत,गायन,वादन,नृत्य,नाटय व इतर कला क्षेत्रात शासनमान्य  किंवा नामवंत राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडून सन्मानित केलेले असले पाहिजे.
वर नमूद केलेल्या संस्थेव्यतीरिक्त इतर कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार समितीला असतील.
 
नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार
 पूर, जळीत, दरोडा, अपघात, नैसर्गिक आपत्ती (भूकंप/वादळ) मध्ये बहुमोल कागमिरी केली असली पाहिजे.
 अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी केल्याबाबत केंद्र/राज्य शासन तसेच अन्य सामाजिक संस्थांद्वारे पुरस्कार/प्रशस्तीपत्र मिळाले असल्यास वर्तमानपत्रात प्रसिध्दी/फोटो इ.बाबतची कात्रणे असल्यास प्रकरणासोबत जोडली आहेत काय?
अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी केल्याबाबत केंद्र/राज्य   शासन तसेच अन्य नामवंत संस्थांद्वारे पुरस्कृत असले पाहिजे.
वर नमूद केलेल्या संस्थेव्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार समितीला असतील.
 
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार
महाराष्ट्र राज्य  माध्यमिक व उच्च  माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळातून (पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, कोल्हापूर, नाशिक व लातूर) इयत्ता 10वी व 12वी मंडळाच्या परिक्षेमध्ये 90% पेक्षा जास्त   गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या 5 (5 X 10 मंडळे = 50 असे इ. 10वी चे एकूण 50 पाल्य व इ. 12वीचे एकूण 50 पाल्य) माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्यांना एकरकमी रू.10,000/- चा विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना एकरकमी रू.10,000/- चा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.
 
यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे
यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणाऱ्यांना राष्ट्रीय/राज्यस्तरावर वृत्तपत्र/मासिक व राज्यस्तरावरचे व्यावसायिक स्तरावरचे संघटन यांनी पुरस्कृत केले असले पाहिजे.
कृषी क्षेत्रात भरघोस उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यास शासनातर्फे पारितोषिक व गौरवपत्र प्राप्त असले पाहिजे किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून प्रशस्तीपत्र प्राप्त असले पाहिजे.
वर नमूद केलेल्या संस्थेव्यतिरिक्त  इतर कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार समितीला असतील.
सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविणारे

असे सामाजिक काम जे की राज्यस्तरावर प्रशंसा किंवा बहुसंख्य लोकांचा फायदा होईल, असे कार्य केले असले पाहिजे.
पर्यावरणामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणल्यामुळे त्या भागातील किंवा बहुसंख्य लोकांचा फायदा होईल असे कार्य केले असले पाहिजे.
सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषक कार्य करणाऱ्या नामवंत संस्था/वृतपत्र यांच्याकडून गौरव/प्रशस्तीपत्र मिळाले असले पाहिजे.
वर नमूद केलेल्या संस्थेव्यतिरिक्त   इतर कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र असल्यास विशेष गौरव पुरस्कार देण्याचे अंतिम अधिकार समितीला असतील.

विशेष गौरव पुरस्कार मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
वैयक्तिक अर्ज (अनिवार्य)
 फॉर्म डी.डी.40 (कार्यालयात उपलब्ध) (अनिवार्य)
ओळखपत्राची दोनही बाजूंची छायांकित प्रत (कंपलसरी)
उत्कृष्ट कामगिरीबाबतच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
वर्तमानपत्रातील जाहिरातीचे कात्रण
10 वी, 12 वीच्या प्रमाणपत्राची/गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत
डिस्चार्ज बुकमधील नमूद कुटुंब सदस्यांची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत
राष्ट्रीयकृत बँक पासबुकची छायांकित प्रत
 
 तरी या पुरस्कार योजनेचा जिल्हयातील जास्तीत जास्त पात्र माजी सैनिक/विधवांनी/पाल्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.) प्रांजळ जाधव यांनी केले आहे.
 
 
 
Edited By -  Ratnadeep ranshoor