मंगळवार, 19 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By वेबदुनिया|

'व्हॅलेंटाईन डे'चा खरा सुगंध

14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. प्रेमाचा दिवस. या दिवशी टीव्ही, रेडिओ, ग्रीटिंग्स, फुगे, गिफ्ट सेंटर सर्वदूर प्रेमाचा रंग चढलेला दिसतो. सर्वत्र सेलिब्रेशनचा माहौल असतो.
 
हे सर्व पाहून मनात सहज विचार येतो की हे प्रेम खरं प्रेम आहे का? दिवसभर हॉटेलिंग, पिक्चर, ग्रिटिंगची देवाण-घेवाण. उपहाराचे आदान-प्रदान हेच फक्त या दिवसाचे अंतिम उद्दिष्ट आहे काय? आपण म्हणतो की हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा असतो. परंतु, प्रेम अशी एका दिवसात व्यक्त करण्याची बाब आहे काय? प्रेम त्यागात आहे. कर्तव्यात आहे. समर्पणात आहे. जीवनभरच्या अनुभवात आहे. तात्कालिक दिवस साजरा करण्यात ते नाही. प्रेम ही अनुभुती आहे. सुगंध आहे. जीवनाचा आधार आहे.
 
ह्या दिवशी मुलं-मुली बाहेर दिसतात.प्रेम फक्त तरुण-तरुणीतच असतं नाही नां? मग का बरं जीवनातील दुसरी नाती नाही दिसत? आहे न हाही एक विचारणीय प्रश्न?
 
कोणताही दिवस साजरा करण्यात काही चुकीचे नाही. पण आपल्या इथे वसंत पंचमी आमची परंपरा आहे. या दिवसात संपूर्ण सृष्टी श्रृंगारलेली असते. फुलं पानांनी बहरलेली असते. परंतु, आता वसंत पंचमी शाळांपुरती राहिलेली आहे. वसंत पंचमीला तयार केलेला केशरीभात समर्पणाचे द्योतक आहे. पिवळी वस्त्रे पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. पण हा केशरीभात आता दिसत नाही आणि सरस्वती पूजन पाश्चात्य संस्कृतीत हरवले गेले आहे.
 
खरंच आपल्या तरुण पिढीला हलवून जागं करावंस वाटत. अरे जागा बाळांनो, जगात श्रृंगारिक प्रेम फार कमी काळासाठी असतं. आपले माता-पिता, म्हातारे आजी-आजोबा, लहान भाऊ-बहीण ह्यांचं प्रेम जीवनात अविभाज्य अंग आहे. ही नाती कायम टिकणारी आहेत. आजीव आहेत. याचा विसर जीवनात एकटेपणाचे वाळवंटच घेऊन येतो. जीवन वृक्षावर अनेक गोड फळे आहेत. त्याचा आस्वाद घ्या. एक व्हॅलेंटाईन डे आपल्या आजी, आजोबांनकडून केक कापवून साजरा करा. ते तर तुमचे आणि तुमच्या आई-वडिलांचेही व्हॅलेंटाईन आहेत. ते होते म्हणून आपण आहोत ह्याचा विसर पडता कामा नये.
 
प्रेम एक पारिजात पुष्प आहे. त्याचा अग्रभाग पांढरा आणि दांडी केशरी. पांढरा रंग प्रेमाचा, समर्पणाचे द्योतक आहे. केशरी रंग त्यागाचा. हा पारिजात बहरून तर पाहा कसा प्रेम सुगंध पसरतो ते.