Last Modified: शनिवार, 20 सप्टेंबर 2014 (15:51 IST)
काऊंटडाउन सुरु: महायुती आणि आघाडीतील गुंता सुटेना
विधानसभा निवडणुकीचे आजपासून काऊंटडाऊन सुरु झाले आहे. निवडणुकीच आज अधिसूचना जारी झाली. तरी देखील महायुती आणि आघाडी यांच्यातील जागावाटपाचा घोळ सुटलेला नाही. मात्र येत्या दोन दिवसांत युती आणि आघाडीचा गुंता सुटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दिल्लीत काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक सोनियांच्या घरी सुरु झाली आहे. महायुतीमध्येही जागावाटपावरून टोलवाटोलवी सुरुच आहे. भाजप म्हणते शिवसेनेकडे प्रस्ताव पाठवला आहे. आणि शिवसेना म्हणते कोणताही प्रस्ताव मिळाला नाही, यात दोन्ही पक्षाचे नेते दंग असून जागावाटपावर तोडगा मात्र निघालेला नाही.
दुसरीकडे, भाजपचे निरीक्षक ओम माथूर हे रविवारी संसदीय बोर्डाच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल होणार आहेत. या बैठकीत ते उमेदवारांची यादी सादर करणार असल्याचे समजते.
भाजपचे नेते एकनाथ खडसेंच्या घरी जागावाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली. कोअर कमिटीच्या या बैठकीत भाजपचे निरीक्षक ओम माथूर, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभेतले विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. परंतु अनेक नेत्यांनी या बैठकीला दांडी मारल्याचे चित्र दिसले.