गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. विठ्ठल
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

लक्ष लक्ष डोळ्यांनी टिपला माउलींचा रिंगणसोहळा

- संतोष भोसले

WD

अश्व दौडले दौडले ।

विठू सावळा हसला ।।

मेळा भगव्या भक्तीचा ।

गोल रिंगणी नाचला ।।


या वचनाची साक्ष देत सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात रविवारी लाखो वारकर्‍यांनी केलेल्या गगनाला भिडणार्‍या नामघोषात, शिगेला गेलेल्या टाळ-मृदुंगाच्या गजरात झालेला अनुपम रिंगणसोहळा लक्ष- लक्ष डोळ्यांनी टिपला.

आज पालखी वेळापुरातउद्या 15 जुलै रोजी हा पालखीसोहळा सकाळी वेळापूरकडे मार्गस्थ होईल. सकाळी खुडूस फाटा येथे गोलरिंगण, वेळापूरजवळ धावा व मानाचे भारूडाचा कार्यक्रम झाल्यानंतर सोहळा वेळापूर मुक्कामी पोहोचेल.
आकंठ भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या या रिंगण सोहळ्यात माउलीऽ माउलीऽऽ जयघोषात जेव्हा माउलींचा अश्व बेफाम दौडला तेव्हा लाखो भक्तांचे डोळे दिपून गेले आणि नयनातून ओसंडणारा प्रेमाचा झरा टाळ्यांच्या पावसात कधी बदलला हे हातांनाही कळले नाही.

पहाटे सोहळाप्रमुख डॉ. प्रशांत सुरू यांच्या हस्ते माउलींची नैमित्तीक पूजा व आरती झाल्यानंतर सकाळी 6.30 वाजता माउलींसह लाखो वैष्णवभक्तांनी नातेपुते नगरीचा निरोप घेतला. सकाळची न्याहरी, दुपारचे भोजन व विश्रंतीसाठी हा सोहळा मांडवे ओढा येथे सकाळी सव्वानऊ वाजता पोहोचला. सुमारे 3 तासाच्या विश्रंतीनंतर दुपारी 12 वाजता सोहळा पहिल्या गोल रिंगणासाठी सदाशिवनगरकडे मार्गस्थ झाला. मांडवे ओढा येथे पालखी खांद्यावर घेण्यात आली. ती ओढय़ाच्या दुसर्‍या काठावर आणण्यात आली. त्यानंतर पालखी रथात ठेवून ती पुढे मार्गस्थ झाली. सोहळ्यातील गोल रिंगणाचा आनंद उपभोगण्यासाठी वारकर्‍यांची पावले सदाशिवनगरच्या दिशेने झपझप पडत होती. हे अंतर भरून काढण्यासाठी वारकर्‍यांना मध्येच धावावे लागत होते. यासाठी पाण्याचा हंडा घेऊन वारीत चालणार्‍या महिला वारकर्‍यांची तहान भागविण्याचे काम करीत होत्या.

मांडवे ओढय़ानंतर माउलींचा पालखीसोहळा उजव्या बाजूला तर वाहतूक डाव्या बाजूला घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेश प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस उपअधीक्षक संजयकुमार पाटील यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने वाहतुकीत कोठेही यावर्षी अडचण आली नाही. रिंगणसोहळ्यासाठी माउलींचे अश्व दुपारी 1 वाजता सदाशिवनगर हद्दीत पोहोचले. त्यावेळी सरंपच रेखाताई सालगुडे-पाटील, उपसरपंच वीरकुमार दोशी व ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. पाठोपाठ माउलींचा रथ दुपारी 1.30 वाजता पोहोचला. भाविकांनी यावेळी दर्शनासाठी एकच गर्दी केली.

माउलींच्या पालखी सोहळ्यात वेगवेगळ्या पद्धतीने माउलींची पूजा बांधली जाते. रिंगणसोहळा ही एक पूजा आहे. समाजातील सर्व थरातील लोक एकत्र येऊन ही विश्व माउलींची पूजा बांधतात. टाळ-मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष सुरू असतानाच अश्वांचे रिंगण सुरू होते व या रिंगणाच्या माध्यमातून माउलींचे विश्वरूप दर्शन वारकर्‍यांना होते. सदाशिवनगर येथील हा नेत्रदीपक रिंगणसोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी लाखो भाविक उपस्थित झाले होते. अश्वांची पूजा झाल्यानंतर जरीपटक्याच्या भोपळे दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला 2 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर रामभाऊ व उद्धव या चोपदारांनी यंदा प्रथमच पालखीसोहळ्यात सहभागी झालेल्या गणेश व गजानन या अश्वांना रिंगण दाखविले. त्यानंतर स्वाराचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात आला. त्याच्यापाठोपाठ माउलींचा अश्व धावला आणि लाखो भाविकांनी माउलीऽ माउलीऽऽनामाचा एकच जयघोष सुरू केला आणि या जयजयकारातच दोन्ही अश्वांनी नेत्रदीपक दौड करीत 4 प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर हा रिंगणसोहळा मोठय़ा उत्साही व भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली.

रिंगण सोहळ्यानंतर दिंड्या-दिंड्यामध्ये विविध खेळ रंगले. हुतुतू, गडय़ास गडी, हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी अशा खेळांनी वारकर्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. वासकरांच्या दिंडीत डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील व मानसिंगराव भोसले यांनी फुगडी व विविध खेळ खेळून रंगत आणली व सोहळ्याचा आनंद लुटला. चोपदारांच्या निमंत्रणानंतर उडीच्या कार्यक्रमासाठी सर्व दिंड्या पालखीच्या सभोवती गोलाकार बसल्या.

टाळ- मृदुंगाच्या साथीने आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्म सुरू झाला. सर्व वारकरी श्वास रोखून या नादब्रह्मत तल्लीन होऊन गेले होते. एकात्म भक्त भक्तिभावाचा हा शाश्वत सुखाचा सोहळा लाखो भाविकांनी अनुभवला.

रिंगण व उडीच्या कार्यक्रमानंतर श्री ज्ञानेश्वर माउलींचा पालखीसोहळा पुरंदावडे मार्गे येळीव फाटा येथे विश्रंती घेऊन माळशिरसकडे मार्गस्थ झाला. माळशिरस येथे सरपंच माणिकराव वाघमोडे, उपसरपंच चोरमले, जि.प.सदस्य भीमराव सावंत, पं.स.सदस्य अनिल सावंत यांच्यासह हजारो भाविकांनी माउलींसह वैष्णवांचे उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत केले. ढगाळ वातावरणात सोहळा सायंकाळी माळशिरस मुक्कामी विसावला.