शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. विठ्ठल
Written By वेबदुनिया|

विठू तुझे माझे राज्य... नाही दुस-याचे काज

महालिंग दुधाळे

WD
करोनी पातके आलो मी शरण ।

त्याचा अभिमान असो द्यावा ।।

जैसा तैसा तरी तुझा असे दास ।

धरीयेली कास भावबळे ।।

अवघेची दोष घडीले अन्याय ।

किती म्हणून काय सांगू आता ।।

तुका म्हणे आहे पातकी तो खरा ।

शरण दातारा आलो तुज ।।

मुखी नाम हाती मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांची असे संत तुकराम महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितले आहे. संत वचनांवर प्रगाढ श्रध्दा असलेल्या भाविकांमुळे पंढरीत भक्तीरसाचा महापूर आलेला आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहावयास मिळाले आहे. भगवंताच्या चरणी लिन होऊन आपला सारा अभिमान त्यागून सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनात सायुज्य मुक्तीचा अनुभव घेणारे भाविक पाहिले म्हणजे नास्तिकालाही कृत्य कृत्य वाटल्याशिवाय रहात नाही.

संसाराच्या मोहामयी रहाटगाडग्यात कर्म-कर्तव्याच्या फे-यात अडकलेल्या सामान्य जिवाला संसार आणि परमार्थ यात समतोल साधण्याची शक्ती संतांच्या वचनांनी दिली. विठू तुझे माझे राज्य । नाही दुस-याचे काज ।। असा ठाम निर्धार असलेला वारकरी सांप्रदायीक पंढरीत आल्यानंतर मात्र भगवंताचे दर्शन घेताना सद्गदीत होत असतो. आषाढी एकादशी सोहळ्याच्या

निमित्ताने महाद्वारी उभा राहून तेथूनच शिखराचे दर्शन घेऊन तुझी वारी पोहोचली बा पांडुरंगा म्हणणा-या भाविकांची महाद्वारी मोठी गर्दी दिसून आली.संत महात्म्यांनी सर्वसामान्य जनतेला आपल्या अभंगातून जगण्याची एक नवी उमीद दिली आहे. त्याचबरोबर अहंकराचा त्याग करुन आपले दोष मान्य करण्याचेही धाडस दिले आहे. म्हणून आषाढी एकादशी सोहळ्याच्या निमित्ताने पांडुरंगाच्या चरणी माथा टेकताना तुका म्हणे आहे पातकी तो खरा । शरण दातारा आलो तुज ।। या अभंगाचा उच्चार करतानाही अनेक भाविक दिसून आले.

पंढरीची वारी आहे माझ्या घरी । आणिक न करी तीर्थव्रत ।। हा ठाम निर्धार केलेले भाविक पंढरीत दाखल झाले. सा-या पंढरीतील रस्त्यांवर भक्तीचे मळे फुलले होते. वरुणराजाने त्यात थोडा अडसर आणला असला तरी पंढरीत साजरा झालेल्या महाएकादशी सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत, याचाही आनंद अनेकांच्या चेह-यावर दिसून आला. चंद्रभागेच्या वाळवंटात राहुट्या आणि फडक-यांच्या तंबूतून सुरू असलेल्या हरिनामाच्या जयघोषाने सारी पंढरी नगरी दुमदुमली आणि भक्त आणि भगवंत भेटीचा पृथ्वीतलावरील हा सोहळा पुन्हा एकदा अविस्मरणीय झाला, असे म्हणावे लागेल.