गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. चंद्रावर पाणी
Written By अभिनय कुलकर्णी|

असा आहे चंद्र !

चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीवर त्याचा खासा प्रभाव आहे. कारण पृथ्वीवरील भरती-ओहोटी त्याच्यामुळेच घडते. या चंद्राचे अंतरंग जाणून घेण्यासाठी आतापर्यंत सत्तर याने सोडण्यात आली. बारा अंतराळवीर आतापर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहेत. या सगळ्यांनी मिळून चंद्रावरील ३८२ किलो दगड आणि माती अभ्यासासाठी पृथ्वीवर आणली आहे.

पृथ्वीच्या परिवलनाच्या स्थिरतेसाठीही चंद्राचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळेच पृथ्वीवर वातावरणाची निर्मिती होऊ शकली. जीवसृष्टीचा विकास झाला.

हा चंद्र मग केव्हा अस्तित्वात आला असावा? पूर्वी मंगळाच्या आकाराचा एक ग्रह पृथ्वीला धडकला. त्यातून पृथ्वीचा काही भाग आणि त्या ग्रहाचा काही भाग मिळून पृथ्वीचा चंद्र तयार झाला. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी ही घटना घडली असावी. चंद्रावरच्या दगडांच्या अभ्यासावरून हा काळ ठरविण्यात आला आहे. चंद्र तयार झाला, त्यावेळी उच्च तापमानामुळे त्याची बाह्यकक्षा वितळून गेली. त्यातूनच चंद्राचा कठीण थर तयार झाला.

पृथ्वीवरून पाहताना चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते. कारण चंद्र आपल्या एकाच अक्षाभोवती आणि पृथ्वीभोवती एकाच वेळी फिरतो. त्यामुळे त्याची दुसरी बाजू आपल्याला दिसतच नाही. चंद्रावर टेकड्याही आहेत नि खळगीही. चार ते अडीच अब्ज वर्षांपूर्वी ज्वालामुखीने तयार झालेला लाव्हा आता घट्ट रूपात त्यात आहे. त्यानंतर त्याच्या रूपात आजतागायत बदल झालेला नाही. तारे आणि धुमकेतूंचे आदळणे एवढाच काय तो तिथल्या निवांत आणि निर्वात आयुष्यातला बदल. चंद्राचा पृष्ठभगा करडा आणि वालुकामय आहे. चंद्राच्या दगडी पृष्ठभागावर पावडरसारखी माती आहे. काही ठिकाणी ती दोन मीटर जाडीची तर काही ठिकाणी वीस मीटर इतकी जाड आहे.

चंद्राचा पृष्ठभाग पृथ्वीसारखा थरथरत नाही किंवा तिथे जिवंत ज्वालामुखीही नाहीत. अर्थात यापूर्वी तिथे गेलेल्या अपोलो यानाने तिथे चंद्राच्या शेकडो किलोमीटर आत भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे नोंदवले होते. पण पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाने चंद्रावर हे धक्के बसत असावेत, असा अंदाज आहे.

असा आहे चंद्र-
चंद्राचे पृथ्वीपासून अंतर- ३ लाख ८४ हजार ४०० किलोमीटर
त्रिज्या- १७३७.४ किलोमीटर
आकार- 21,970,000,000 km3
वजन- 73,483,000,000,000,000,000,000 kg
घनता- 3.341 g/cm3
गुरूत्वाकर्षण- 1.622 m/s2
चंद्रावरचा एक दिवस- पृथ्वीवरचे 27.321661 दिवस.
चंद्रावरचे एक वर्ष- पृथ्वीवरील 0.075 वर्षे
चंद्रावरील किमान व कमाल तापमान- 233/123 °C