शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By वेबदुनिया|

इथे ओशाळला मृत्यू आता व्हीसीडीवर

PRPR
वसंत कानेटकरांच्या लेखणीतून उतरलेलं आणि नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकरांच्या अभिनयाने चिरस्मरणीय ठरलेलं ऐतिहासिक नाटक इथे ओषाळला मृत्यू आता व्हिसीडीवर उपलब्ध झाले आहे. उत्तमोत्तम दर्जेदार मराठी नाटकांच्या व्हिसीडी आणणाऱ्या प्रिझम कंपनीने ही व्हिसीडी काढली आहे. साडेतीन दशकांपूर्वी पणशीकरांच्याच नाट्यसंपदाने या नाटकाची निर्मिती केली होती. पुरूषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शक होते. त्यात प्रभाकर पंतांबरोबरच काशीनाथ घाणेकर आणि चित्तरंजन कोल्हटकर यांच्या दमदार अभिनयाच्या जुगलबंदीने नाटक प्रचंड गाजले होते.

आताही हे नाटक व्हिसीडीवर बघताना तितकेच ताजेतवाने वाटते. काशीनाथ घाणेकरांचा संभाजी म्हणजे अभिनयाचा मानदंड ठरला. औरंगजेबाचा बेरकीपणा पंतांनी आपल्या अभिनयातून जिवंत केला. औरंगजेब रंगमंचावर नमाज पढतो असा प्रसंग आहे. तो पाहून काही मुस्लिम बांधव पंतांना मुसलमान समजले होते. नुकताच या नाटकाचा पंतांनी शिवाजी मंदिरला प्रयोग केला. त्याला प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आजही या नाटकाची लोकप्रियता कायम असल्याचे लक्षात येते.

हे नाटक मराठेशाहीच्या एका अतिशय दुःखद घटनेवर आधारीत आहे. ही घटना म्हणजे संभाजी राजांचा हाल हाल करून औरंगजेबाने घडवून आणलेला मृत्यू. या नाटकातील प्रत्येक प्रसंग त्यामुळे थेट हृदयाला भिडतो.

कानेटकरांची या नाटकातील ऐतिहासिक भाषा आणि संवाद आजही अंगावर रोमांच आणतात. संभाजी राजांनी क्रूरकर्मा औरंगजेबाशी केलेला तो संघर्ष मन हेलावून टाकतो. त्या काळात या नाटकाचे ८०० प्रयोग झाले होते. प्रभाकर पणशीकर, काशीनाथ घाणेकर तसेच गणोजी शिर्केच्या भूमिकेतील चित्तरंजन कोल्हटकर यांची ती अजरामर अदाकारी आजही प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करते. या व्हिसीडीत काशीनाथ घाणेकर व चित्तरंजन कोल्हटकर यांनी केलेल्या भूमिकांमध्ये किरण भोगले व उदय पौडवाल आहेत. त्यांनीही या भूमिकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

जान्हवी पणशीकर, आप्पा गजमल, जितेंद्र किरकिरे, दिनेश कोयंडे, गौरू दळवी या सर्वच कलाकारांनी त्यांना साथ दिली आहे. व्हिसीडीचे दिग्दर्शन विनायक चासकर यांचे असून त्यांनी नाटकाला उत्तम गती दिली आहे. औरंगजेबाचा खेमा व संभाजीचा गड या सर्वांचं नेपथ्यही छान. ऐतिहासिक नाटक घरबसल्या पहाण्याची संधी प्रिझमने दोन सिडीजच्या संचात उपलब्ध करून दिली आहे.