1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By चंद्रकांत शिंदे|

मराठी चित्रपटाची कमाई असते किती?

PR
PR
'नटरंग' या मराठी चित्रपटाने आतापर्यंत ७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कमाईचा विक्रम करणारा नटरंग हा पहिलाच चित्रपट आहे. यानिमित्ताने मराठी चित्रपटांच्या कमाईचा घेतलेला वेध...

मराठी चित्रपटांचा खरा व्यवसाय मुंबई, पुणे येथे नव्हे तर जत्रेतील टूरिंग टॉकिजमध्येच होतो. शहरांमध्ये फक्त नावासाठी चित्रपट प्रदर्शित केला जातो. आज जरी मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत असे म्हटले जात असले तरी ते चित्र खरे नाही. मुंबईसारख्या शहरात मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट लावल्यानंतर त्याचे भाडे भरण्यातच निर्मात्याचे पैसे खर्च होतात. कारण मल्टीप्लेक्स मालकांना आठवड्याचे भाडे आगाऊ द्यावे लागते. हे भाडे वसूल होण्यासाठी कमीत कमी चार दिवस तरी चित्रपट हाऊसफुल जायला हवा. परंतु, मराठी चित्रपट फक्त शनिवार रविवार आणि सोमवारीच प्रेक्षक पहातात कारण या तीन दिवशीच काही प्रेक्षक चित्रपट पहायला येतात. गरीब निर्मात्याला मल्टीप्लेक्स परवडत नाही. यूटीवी, इरॉस इत्यादि ज्या मोठ्या कंपन्या मराठी चित्रपट प्रदर्शित करतात त्यांना हे परवडणारे असते. त्यामुळे ते चित्रपट लावून ठेवतात. परंतु, अनेक वेळा असे झाले आहे की प्रेक्षक नसल्याने मराठी चित्रपटाचे खेळही रद्द करण्यात आले आहेत.

PR
PR
मल्टीप्लेक्सवाले खरी तिकीटविक्रीही दाखवत नाहीत. असे म्हटले जाते की सगळे संगणकीकृत आहे तरीही मराठी निर्मात्याला आरामत फसवले जाते. प्लाझाला एका आठवड्याचे भाडे एक लाख रुपये आहे. हे भाडे वसूल होण्यासाठी आठवडाभर चित्रपट हाऊसफुल जावा लागतो. प्लाझाचे तिकीट बाल्कनी ७० रुपये आहे. स्टॉल आणि ड्रेस सर्कल अजून कमी तर मल्टीप्लेक्समध्ये कमीत कमीत तिकीट ७० रुपये असते. एवढे महागडे तिकीट काढून मराठी माणूस चित्रपट पहात नाही. त्याचे म्हणणे असते की याच पैशात तो शाहरुख, ह्रतिकचा चित्रपट पाहिल.

मराठी चित्रपटांचा खरा व्यवसाय जत्रेमधील टूरिंग टॉकिजमधून असतो. त्यामुळे बरेचसे निर्माते टूरिंग टॉकिजमध्ये चित्रपट प्रदर्शित करतात आणि आपले पैसे वसूल करतात. चित्रपटाचे कलाकारही गरीब निर्मात्याला मदत करण्यास पुढे येत नाही. खरे तर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाच्या कलाकारांनी सगळीकडे फिरायला पाहिजे. प्रेस कॉन्फरन्सला आले पाहिजे. हिंदीचे कलाकार भारतभर जातात, परंतु मराठी कलाकारांना महाराष्ट्रात दौरा करणे कठिण जाते. आताचेच उदाहरण देतो. 'बायको झाली गायब'च्या प्रेस कॉन्फरन्सला शक्ती कपूर जुहूवरून दादरला आला, पण नायिका वर्षा उसगांवकर आली नाही. असेच अनेक वेळा होते

PR
PR
मराठी चित्रपटसृष्टीत पूर्वीपासूनच वितरक पद्धती नव्हती. निर्माता स्वतःच स्वतःचे चित्रपट प्रदर्शित करीत असत. वर्षभरात जेमतेम १५-२० चित्रपट तयार होत. त्यामुळे वितरकांना कामच नसे. मात्र, आता स्थिति बदलली आहे. सध्या वर्षाला ७० ते ८० चित्रपट तयार होत असल्याने वितरकांची गरज भासू लागली आहे. सचिन आणि स्मिता तळवलकरसह अनेक निर्माता स्वतःच स्वतःचे चित्रपट प्रदर्शित करीत. सादिक चितळीकर यांनी या दोघांना चित्रपट वितरीत करण्यास मदत करण्याबरोबरच चांगले पैसेही मिळवून दिले. त्यामुळे सध्या सादिक चितळीकर मराठी चित्रपटसृष्टीतील नंबर वन वितरक आहे. सादिकबरोबरच झी टॉकिज, मराठी चित्रपट निर्माण करणारे हिंदी निर्माते स्वतःच स्वतःचे चित्रपट वितरित करतात. संजय छाब्रिया यांनी स्वतःच 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' वितरीत केला होता. या चित्रपटाने जवळ-जवळ २ कोटींचा व्यवसाय केला तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'शिक्षणाचा आयचा घो' ने ही एक कोटीच्या आसपास व्यवसाय केला आहे. अवधूत गुप्तेच्या 'झेंडा'ची चांगलीच पब्लिसिटी झाली. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तितका यशस्वी झाला नाही. दुसरीकडे नटरंग अजूनही हाऊसफुल चालला आहे. पहिल्या आठवड्यात ९२ चित्रपटगृहात झळकलेला हा चित्रपट सहाव्या आठवड्यात १०८ चित्रपगृहात दाखवला जात आहे. तर दुसरीकडे 'झेंडा' आणि 'शिक्षणाच्या आयचा घो'च्या चित्रपटगृहांची संख्या कमी होऊ लागली आहे.

मराठी चित्रपट निर्मात्यांना व्हिडियो पायरसीलाही तोंड़ द्यावे लागत आहे. झेंडा प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची पायरेटेड व्हीसीडी बाजारात आली होती. मराठी चित्रपट महामंडळ आता पायरसीच्या विरोधातत कडक पावले उचलण्यासाठी सरकारकडे धाव घेणार आहे. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांनी सांगितले आम्ही गृहमंत्री आरआर पाटील यांना भेटून याविषयी कडक पावले उचलण्याची विनंती करणार आहोत.

PR
PR
एका मराठी निर्मात्यानुसार, मुंबईत चित्रपट प्रदर्शित करणे व्यवसायाच्या दृष्टीने नुकसानीचे असले तरी 'इंप्रेशन' पडावे म्हणून मुंबईत चित्रपट प्रदर्शित केला जातो. निर्माता इतरांना दाखवू इच्छितो की त्याचा चित्रपट मुंबईतील मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट सर्कलमध्ये त्याचे नाव होते आणि एखादा हिंदी निर्माता त्याला साइन करू शकतो. दुसरी गोष्ट अशीही की मुंबईत चित्रपट हिट झाला की त्याचा प्रचार करून राज्यात इतरत्रही त्याला फायदा होतो. मात्र, मराठी चित्रपट निर्माता नुकसानीतच असतो.फक्त व्हीडियो, सॅटेलाइट अधिकार विकून थोडे फार नुकसान भरून काढतो. नवीन बर्‍यापैकी चाललेला मराठी चित्रपट असेल तर चॅनेलवाले चांगले पैसे देतात. इतर चित्रपट निर्माता जे मिळेल ती रक्कम घेऊन चित्रपट चॅनेल्सना विकतात. यातही दलाल चांगले पैसे कमवतो.

मुंबईत चित्रपटाने एक लाख रुपयांचा व्यवसाय केला तर त्याला त्यातले फक्त १ हजार रुपये मिळतात. सतीश राजवाडे दिग्दर्शित 'गैर' मोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट होता. परंतु, हा चित्रपट आपला पैसा अजून वसूल करू शकला नाही. मात्र प्रचार असा केला जात आहे की चित्रपट सुपरहिट आहे. हे सगळे खेळ असतात जे चर्चेत रहाण्यासाठी खेळावे लागतात.

(मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारीत.)