मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. मराठी कलावंत
Written By वेबदुनिया|

उगवती गायिका

- नेहा राजपाल

- दीपक जाधव

PRPR
हिरो होंडा प्रस्तुत 'सारेगामापा' संगीत स्पर्धेची २००४ सालची महाअंतिम फेरीची विजेती नेहा राजपाल आजच्या घडीला एक नामवंत पार्श्वगायिका म्हणून चित्रपटक्षेत्रात नाव कमवून आहे. आज तिच्या मेहनतीचं फळ म्हणून तिला झी गौरव पुरस्कारामध्ये मुक्काम पोस्ट लंडन' या चित्रपटातील गीतासाठी सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून तिला नामांकित करण्यात आलं आहे. नेहा राजपालला आज अवघा महाराष्ट्र ओळखतो तो तिच्या रामबंधू सहयाद्री अंताक्षरी या सहयाद्रीवरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या मार्मिक सुत्रसंचालनामुळे. गेल्या वर्षभरात तिने या कार्यक्रमात रसिकांची मने जिंकून घेतली आहेत.

नेहाने एम.बी.बी.एसची पदवी संपादन केली आहे. पण तरीही तिचा ओढा गाण्याकडे ओढा आहे. तिचे वडील संगीतात पारंगत आहेत. शिवाय ते एक उत्तम गिटारवादक आहेत. त्यांनीच अगदी लहानपणापासून तिच्यात संगीताची आवड निर्माण केली. त्यामुळे संगीत तिच्या नसानसात भिनलं. लहानपणीच नेहाने की संगीतातंच करीयर करायचे ठरविले होते. तिचे हे स्वप्न सारेगामापाच्या विजेतेपदाने सत्यात उतरलं.

तिने किराणा घराण्यातील गुरू श्रीमती विभावरी बांधवकर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीताचं शिक्षण घेतलं. सुप्रसिध्द संगीतकार अनिल मोहिले यांचाही आशीर्वाद तिला लाभला आहे. त्यांनी तिला रेकॉर्डिंग करताना नेमके कसे गायचे, त्यातले खाचखळगे व अचुकपणा याचं ज्ञान दिलं. त्यामुळे ती आज कोणत्याही प्रकारचं गाणं अगदी सहजतेने गाऊ शकते.

कोणतंही गाणं असो, शास्त्रीय, पॉप, सुगम संगीत किंवा लोकसंगीत नेहाचा गळा अगदी अचूक सूर पकडतो व श्रोत्याना भारावून टाकतो. त्यामुळेच गुणांमूळे लता मंगेशकर पुरस्कार सोहळयात नावाजलेल्या गायक - गायिकेच्या समवेत नेहालाही गाण्यासाठी खास पाचारण केलं. हा तिच्या आयुष्यातील सर्वांत मोठा बहुमान व स्मरणीय कार्यक्रम असं ती मानते. 'शुभमंगल सावधान' या चित्रपटातील गाण्यासाठी लता मंगेशकरबरोबर तिने गाणं रेकॉर्ड केले हाही तिच्या लेखी अविस्मरणीय क्षण. त्याचबरोबर तिने शंकर महादेवन यांच्याबरोबरही अनेक अविस्मरणीय मैफिली रंगवल्या आहेत. इतकंच नव्हे तर देश- परदेशातही तिने असंख्य गायनाचे कार्यक्रम यशस्वी केले आहेत व श्रोत्यांकडून वाहवा मिळविली आहे. तिला मिळालेल्या पुरस्कारांची यादीही मोठी आहे. यात सुरसंगम प्रतिष्टानचा पुरस्कार, सोनी टीव्हीवरील आदाब अर्ज है आणि अनिल मोहिले आदी नामांकित पुरस्कारांचा समावेश आहे.

नेहाच्या आतापर्यंतच्या गायनक्षेत्राचा आढावा घेतला तरी त्यात वैविध्य आढळतं. अगदी जिंगल, मालिका शीर्षक गीत, मराठी - हिंदी चित्रपट गीत व स्वतंत्र सोलो अल्बमपर्यंत तिचा प्रवास झाला आहे. नेहाने आपलं पहिलं गाणं अनिल मोहिले यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली -तुझ्याचसाठी' या चित्रपटासाठी गायिलं. त्यानंतर रामोजी राव यांचा 'चालू नवरा भोळी बायको', 'माणूस', 'लगीनघाई', 'माझं सौभाग्य' या मराठी चित्रपटासाठी व 'नयी पडोसन' या हिंदी चित्रपटासाठी आपला आवाज दिला. सोनी म्युझिकने तिचा 'ये जो मोहब्बत है' हा अल्बम निर्माण केला. मराठी चित्रपटांबरोबरच 'रामायण', 'सारा आकाश', 'भाभी', 'महाभारत', हेमा मालिनीची 'कामिनी दामिनी', 'कागज की कश्ती', 'नॉक नॉक कौन है' यासारख्या लोकप्रिय हिंदी मालिकांसाठी तिने आवाज दिला. तसेच 'बिर्ला व्हाईट सिमेंट', 'लेक्सी पेन' यासारख्या अनेक जाहिरातीतही नेहाने गायन केले आहे.


PRPR
नेहाने केवळ हिंदी मराठीच नव्हे तर कन्नड, इंग्रजी, कोकणी, राजस्थानी, भोजपुरी, गुजराथी भाषेतही विविध गाणी गायली आहेत. श्रोत्यांनी त्या गीतांना पसंतीची दाद दिली आहे. मात्र नेहाने या सर्व भाषेत गाऊनही मराठी भाषा विसरली नाही. कारण तिची मायबोली मराठी आहे. सुमीत, विंग्ज, कृणाल, व्हीनस, म्युझिक्राफ्ट आदी अनेक म्युझिक कंपन्यांनी तिचे अल्बम्स प्रकाशित केले असून कुणाल गांजावाला, सुनिधी चौहान, शान, शंकर महादेवन यासारख्या आजच्या प्रथितयश गायकांबरोबर गाणी गायली आहेत.

महेश मांजरेकर यांनी 'दे धक्का' या चित्रपटासाठी तिच्याकडून गावून घेतलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा आहे. 'कलंक', 'माझं सौभाग्य', 'गोप्या', 'दोष कुणाचा', 'खुळी बायको तोतरा नवरा' या मराठी चित्रपटात तसेच हिंदीमध्ये दिग्दर्शक कृष्णा यांचा 'ब्लॅक सिंडे्रला', दिग्दर्शक गुफी पेंटल यांचा ÷चैतन्य महाप्रभु आणि व्हीनसचा 'मान गये मुगले आझम' या चित्रपटात तिची गाणी आहेत. हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहेत.

नेहाला आतापर्यंत अभिनयाच्या खूपच ऑफर आल्या पण तिने त्या नाकारल्या. ती म्हणते, 'गाणं गाताना अभिनयच करावा लागतो. पण हा अभिनय डोळयांना दिसत नाही तर कानाने ऐकावा लागतो. आजचा जमाना स्पर्धेचा जमाना आहे. रोज नवे गायक - गायिका उदयास येतात. अशा परिस्थितीत स्वतःचं खास अस्तित्व निर्माण करणं खुप मुश्किल आहे. पण यातूनही काहीतरी अद्वितीय करून संगीतक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा नेहाने चंग बांधला आहे.

नेहा आजही गाण्याचा सातत्याने रियाज करतेय. ती म्हणते गाणं जितकं शिकावं तितकं कमीच. गाण्याला विश्रांती दिली म्हणजे गळा संपला म्हणूनच समजता. गाणं हेच तिचं भावविश्व आहे. यात तिने स्वतःला अंर्तबाहय समर्पित केलं आहे. तिच्याकडे सध्या भरपूर काम आहे पण ती समाधानी नाही. तिच्या मते अजून बराच पल्ला गाठायचा आहे. स्वतःची एक वेगळी ओळख संगीतक्षेत्रात निर्माण करून यायची आहे व त्यासाठी ती प्रयत्नशील आहे.