इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की कट?
President of Iran Ebrahim Raisi death : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. रायसींचे हेलिकॉप्टर अझरबैजानच्या दाट आणि डोंगराळ भागात कोसळले होते. इराणच्या अधिकाऱ्यांनी हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि देशाचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. दाट धुक्यात डोंगराळ प्रदेश ओलांडताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. रॉयटर्सने सोमवारी इराणच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली.
अपघात कसा घडला : इराणचे राष्ट्राध्यक्ष रायसी तेहरानच्या वायव्येस सुमारे 600 किलोमीटर (375 मैल) पूर्व अझरबैजान प्रांतात प्रवास करत होते. यावेळी त्यांचा हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला. ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते, त्यापैकी दोन सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचले. त्यांच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. खराब हवामान आणि परिसरात दाट धुके असल्याने बचाव पथकांना अपघातस्थळ शोधण्यात अडचणी आल्या.
इराणच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर परत मिळाले आहे. मात्र परिस्थिती योग्य नसून अध्यक्ष रायसी जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याचेही बोलले जात होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या ड्रोनने अपघातस्थळाचा शोध घेतला आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीच्या प्रमुखाने परिस्थिती चांगली नसल्याचे म्हटले आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणचे हवामान खूपच खराब आहे. त्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणींचा सामना करावा लागला.
कोण आहे रायसी : 63 वर्षीय इब्राहिम रायसी हे कट्टरपंथी प्रतिमा असलेले नेते आहेत, ज्यांनी यापूर्वी देशाच्या न्यायव्यवस्थेचे नेतृत्व केले होते. ते इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या जवळचे मानले जात होते आणि काही विश्लेषकांनी सांगितले की ते 85 वर्षीय नेते (खामेनी) त्यांच्या मृत्यूनंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा घेऊ शकत होते. रायसी यांनी इराणच्या 2021 च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला होता.
काही षडयंत्र आहे का : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या ताफ्यात एकूण 3 हेलिकॉप्टर होते. दोन हेलिकॉप्टर सुखरूप पोहोचले, मात्र राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर कोसळले. इराणमधील एका वर्गाला यामागे कट असल्याचा संशय आहे. याबाबत सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. अमेरिकेचे सिनेटर चक शूमर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांची गुप्तचर संस्थांशी चर्चा झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही कटाचा संशय किंवा पुरावे मिळालेले नाहीत. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानेही या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे.