1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र गप्पा
Written By वेबदुनिया|

ब्रह्मांडनायकचे शतक

- चंद्रकांत शिंदे

WD

मी मराठी वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या शेगावचे श्री गजाजन महाराज यांच्या जीवनावरील आच्चरित मालिका ब्रह्मांडनायक १ फेब्रुवारी रोजी शंभर भाग पूर्ण करीत आहे. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेत गजानन महाराजांची भूमिका हा कुठलाही कलाकार साकार करीत नसून गेल्या दोन दशकांपासून गजानन महाराजांच्या विचारांचा प्रसार करीत असलेले वसंत गोगटे साकार करीत आहेत. ७० वर्षाचे गोगटे या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच कॅमेर्‍यासमोर आले आणि आपल्या अभिनयाने त्यांनी गजानन महाराजांची भूमिका जीवंत केली. मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्यानिमित्ताने वसंत गोगटे यांनी वेबदुनियाशी विशेष गप्पा मारल्या.

वसंत गोगटे यांनी सांगितले, मी यापूर्वी कधीही कॅमेर्‍याचा सामना केला नव्हता. या मालिकेच्या निमित्ताने मी प्रथमच कॅमेर्‍यासमोर आलो आहे. अर्थात आज या मालिकेने जे काही यश प्राप्त केले आहे आणि प्रेक्षकांना माझी भूमिका आवडली यात माझे काहीही श्रेय नाही. याचे संपूर्ण श्रेय गजानन महाराजांना आहे. मी गजानन महाराजांचा निस्सिम भक्त आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या विचारांवर माझी अमाप श्रद्धा आहे. मी रिझर्व्ह बँकेत ऑफिसर म्हणून कायर्रत असताना १९७२ मध्ये सर्वप्रथम मी गजानन महाराजांविषयी ऐकले आणि वाचले. तेव्हापासून मी त्यांच्या विचारांनी भारला गेलो. गेल्या २२ वर्षांपासून मी श्री गजानन आशीष नावाचे मासिक प्रकाशित करून गजानन महाराजांचे विचार सगळीकडे प्रसारित करीत आहे.

WD
गोगटे यांनी सांगितले, ही मालिका ज्याप्रमाणे शतक पूर्ण करती झाली आहे त्याप्रमाणेच याची सुरुवातही अगदी कमी वेळात म्हणजे अगदी तीन दिवसात झाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने आम्ही मी मराठी वाहिनीच्या अधिकार्‍यांना भेटलो आणि त्यांनी तिसर्‍या दिवशी मालिकेला मंजूरी दिली. चौथ्या दिवशी आम्ही शूटिंग केले आणि सातव्या दिवशी मालिका प्रसारित झाली. चार-पाच भागानंतर आम्ही गजानन महाराजांच्या जीवनावरील कथानकाचे चित्रिकरण सुरु केले. दासगणू महाराजांनी गजानन महाराजांच्या जीवनावर आच्चरित लिहिलेल्या श्री गजानन विजय ग्रंथावर आच्चरित आम्ही महाराजांच्या जीवनाचे चित्रिकरण केले आहे. आम्ही फक्त महाराजांचे जीवनच दाखवीत नाही तर त्या काळी महाराजांनी केलेले समाजप्रबोच्च्नही दाखवीत आहे जे आजही मार्गदर्शक आहे.

गोगटे यांनी सांगितले की फारच कमी लोकांना ठाऊक आहे की लोकमान्य टिळकांना गजानन महाराजांनी सांगितले होते की तुमच्या हातून फार मोठे कार्य होईल आणि त्यानंतर टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्याची निर्मिती केली. ब्रह्मांडनायक मालिकेची निर्मिती अमृता प्रॉडक्शन ने केली असून दिग्दर्शक आहेत तानाजी घाडगे. मालिकेचे चित्रिकरण भोर, सातारा, कोल्हापुर, नातेपुते, फलटण, म्हसवड, मुंबई इत्यादि ठिकाणी करण्यात आले आहे. वसंत गोगटे यांच्याबरोबर मालिकेत विद्याच्च्र जोशी, पूजा नायक, बाळ कर्वे, प्रसन्ना केतकर, नयनतारा, उदय नेने, प्राजक्ता इत्यादि कलाकार काम करीत आहेत.