- जान्हवी मुळे
“माझ्यासाठी क्रिकेट म्हणजे सगळं काही आहे. मला विराट कोहली खूप आवडतो,” 72 वर्षांच्या तरुलता संघवी उत्साहानं क्रिकेटविषयी बोलतात.
तरुलता मुंबईत राहतात आणि अगदी अलीकडेच टेनिस बॉल क्रिकेट खेळू लागल्या आहेत. “मी गृहिणी आहे, मला दोन मुलं आहेत. आमचं नऊ जणांचं मोठं कुटुंब आहे. सगळ्यांनाच मॅच बघायला आवडतं.”
नवऱ्यानं आणि मुलानं प्रोत्साहन दिल्यामुळे तरुलता या वयात क्रिकेट खेळू लागल्या. आपल्याला बोलिंग आवडते आणि विकेटही काढता येते, असं त्या आवर्जून सांगतात.
तरुलता यांच्यासारख्या वेगवेगळ्या वयाच्या तीनशेहून अधिक महिलांना मुंबईच्या गोरेगावमधील सर्वश्रेष्ठ क्रिकेट क्लबनं पुन्हा मैदानात आणलं आहे.
दर शनिवारी सकाळी आणि आठवड्यातून दोनदा संध्याकाळी या क्लबचा सराव चालतो. टर्फवर म्हणजे कृत्रिम हिरवळीवर टेनिस बॉलनं त्या क्रिकेटचा सराव करतात आणि सामनेही खेळतात.
तसं मुंबईत मुलींसाठी अनेक क्रिकेट अकॅडमी आहेत आणि शाळा-कॉलेजेसच्या टीम्सही आहेत.
पण अगदी प्रौढ वयातल्या महिलांनाही क्रिकेटचा आनंद लुटता येईल अशा या क्लबची सुरुवात मयुरा अमरकांत आणि त्यांच्या मैत्रिणींनी काही वर्षांपूर्वी केली होती.
असा उभा राहिला महिलांचा क्रिकेट क्लब
“माझं लग्न एका क्रिकेटरशी झालंय आणि त्यांचं लग्न क्रिकेटशी झालंय,” मयुरा गंमतीनं सांगतात.
46 वर्षांच्या मयुरा एक डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट आणि लेखक आहेत. आई, पत्नी, करियर वूमन अशा जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच मयुरा आपल्या पतीमुळे, अमरकांत जैन यांच्यामुळे क्रिकेटकडे वळल्या.
अमरकांत पहिल्यापासून अस्सल क्रिकेटप्रेमी आहेत आणि ते मुंबईतल्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळलेही आहेत.
मयुरा सांगतात, “त्यांचे मित्र असोत किंवा ते स्वतः जे बोलायचे, ते सगळं क्रिकेटभोवती फिरायचं.”
काही वर्षांपूर्वी एक वेळ अशी आली की त्यांना बाजूला पडल्यासारखं वाटू लागलं.
“मला असं वाटलं की माझ्या नवऱ्यावर मी एवढं प्रेम करते, पण आमच्यात बोलण्यासाठी काही समान दुवा नाही. त्यामुळे मी क्रिकेटमध्ये आले.”
व्हॉट्सअॅपद्वारा, मैत्रिणींच्या ग्रुप्समार्फत क्लबची माहिती पसरत गेली, तशा आणखी महिला सहभागी होऊ लागल्या.
“आम्ही पाचजणींनी सुरुवात केली होती आणि आता आम्ही तीनशेहून जास्त जणी आहोत. त्या सगळ्या मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून येतात. आम्ही मालाड वेस्टला सराव करतो, पण अगदी ठाणे, मीरारोड, नवी मुंबई, वरळी अशा कुठून कुठून महिला खेळायला येतात.”
“मला कोणीतरी सांगितलं की हे असं एकमेव क्रिकेट क्लब आहे जिथे तीनशे बायका सदस्य आहेत.”
वय हा केवळ एक आकडा
ऑक्टोबर अखेरीस एका शनिवारी सकाळी आम्ही मयुरा यांना भेटलो, तेव्हा यातल्या पन्नासजणी एकत्र जमत होत्या.
मुंबईच्या मालाड पश्चिम परिसरात सबकुछ कॉम्प्लेक्समधल्या टर्फवर (कृत्रिम हिरवळीवर) त्या सगळ्या एका स्पर्धेसाठी तयारी होत्या.
एकमेकांशेजारीच असलेल्या दोन पिचेसवर एकाच वेळी सराव सुरू होता. टेनिस बॉल आणि कमी वजनाच्या बॅट्सनी हे क्रिकेट खेळलं जातं.
दिवस वर चढला तशी शेजारच्या लिंक रोडवरची गजबज वाढली. ट्रॅफिकचा कलकलाट आणि मेट्रो ट्रेनची धडधड यांतही इथे क्रिकेटचा आवाज भरून राहिला होता.
कुणी बॅटिंग करत होतं, कुणी बोलिंग तर कुणी फिल्डिंग. तेही एकमेकींना वेळोवेळी चीअर करत, हसत खेळत.
एरवी क्रिकेटचा विचार केला, तर हा खेळणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अजूनही नगण्य आहे, असं 2020 साली बीबीसीनं इंडियन स्पोर्टसवूमन ऑफ द ईयरच्या निमित्तानं केलेल्या अभ्यासात दिसून आलं होतं.
भारतातल्या अनेक गावा-शहरांमध्ये तर मैदानावर मुली फारशा दिसतही नाहीत. तुलनेनं मुंबईत त्या मोठ्या प्रमाणात दिसतात, पण तरीही वयाचा एक टप्पा ओलांडल्यावर मैदानात खेळणाऱ्यांचं प्रमाण अजूनही कमी आहे.
सर्वश्रेष्ठ क्रिकेट क्लबमध्ये मात्र वेगळं चित्र दिसतं. या क्लबमध्ये आज सर्वात तरूण खेळाडू 9 वर्षांची आहे तर सर्वात वयस्कर खेळाडूच वय आहे 72 वर्ष.
पण वय हा केवळ एक आकडा आहे, असं प्राजक्ता सांगतात. त्या दर आठवड्याला न चुकता इथे क्रिकेट खेळायला येत आहेत.
“मी 43 वर्षांची आहे, पण मला खेळायला आवडतं. शरीर साथ देतंय, कुठले आजार नाहीयेत आणि खेळातून आनंदही मिळतो.
“फिटनेस वाढवण्यासाठी काही व्यायाम तर करावा लागतोच, मग असा व्यायाम करावा ज्यात तुम्हाला मजाही वाटते.”
पेशानं एक वकील असलेल्या प्राजक्ता यांना क्रिकेट पाहायला आवडायचं आणि त्या क्रिकेट मॅचेस आवर्जून पाहतात. साहजिकच, वर्षभरापूर्वी त्यांना या क्लबविषयी माहिती मिळाली आणि त्यांनी खेळायला सुरुवात केली.
प्राजक्ता सांगतात, “क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे. पण मी लहान असताना मुलींच्या क्रिकेटचा तेवढा प्रसार झाला नव्हता. तो झाला असता, तर मी क्रिकेटरच झाले असते. कुठवर मजल मारली असती माहिती नाही, पण नक्की खेळले असते. ती संधी आता मिळते आहे, त्यामुळे मी तिचा आनंद लुटतेय.
क्रिकेटमधून फन आणि फिटनेस
या क्लबमध्ये महिला त्यांच्या सोयीनुसार आठवड्यातल्या तीनपैकी एक दिवस किंवा तिन्ही दिवस येतात.
दर काही आठवड्यांनी त्या मॅचेसमध्येही खेळतात आणि क्लबची चॅम्पियनशिप जिंकणाऱ्यांना खास बक्षीसंही दिली जातात.
इथे त्यांना रीतसर खेळाचं कोचिंगही मिळतं. सहा कोचेस आणि एक मेंटॉर अशी सात जणांची टीम क्रिकेटचा एक अभ्यासक्रमच राबवते. या कोचिंग टीममध्ये चेतन बागडे, अक्षय मदाने, धवल सर यांचा समावेश आहे.
पण केवळ खेळाचे बारकावे शिकवण्यापेक्षा महिलांचा फिटनेस वाढवण्याकडे लक्ष दिलं जातं, असं अक्षय मदाने सांगतात.
“या सर्व महिला एरवी बरेच कष्ट घेत असतात, कुणी नोकरी करतंय कुणी घर सांभाळतंय. आठवड्यातले सरावाचे दोन तास या महिलांसाठी अविस्मरणीय कसे ठरतील, असा प्रयत्न आम्ही केला. त्यामुळे आम्ही हसत खेळत, गेम्सच्या माध्यमातून सराव करून घेतो,” अक्षय माहिती देतात.
बॅटिंग, बोलिंग, रनिंग बिटविन द विकेट्स अशा क्रिकेटमधल्या कौशल्याइतकाच फिटनेसवर जास्त भर दिला जातो.
“अनेकींमध्ये फिटनेसचा अभाव आहे त्यामुळे आम्ही त्यावर जास्त भर देतो. क्रिकेटपलीकडे आयुष्यातही उपयोगी पडतील अशा गोष्टी म्हणजे संयम, वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जाणं असा गोष्टीही महिला इथे शिकत आहेत. क्रिकेट ही त्यांच्यासाठी थेरपी आहे.”
कोव्हिडच्या साथीदरम्यान या महिलांपैकी कुणी जवळच्या व्यक्तींना गमावलं तर कुणाला मानसिक समस्यांचाही सामना करावा लागला. पण क्रिकेटनं त्यांना नवं काहीतरी करण्याची प्रेरणा दिली आहे.
दीपा दमानिया सांगतात, “कोव्हिडचा काळ माझ्यासाठी वाईट काळ होता. पण क्रिकेटनं मला त्यातून बाहेर काढलं. मी आधी कधीच क्रिकेट खेळले नव्हते.
“क्रिकेटनं माझी शिस्त वाढली. मी फिटनेस आणि आरोग्याविषयी जास्त जागरूक झाले. इथे येतो, तेव्हा डोक्यावर कसलंच ओझं नसतं. दर शनिवारी काहीतरी नवं शिकायला मिळतं.
“खेळ तुम्हाला सगळं काही देतो,” दीपा आत्मविश्वासानं सांगतात.
मयुरा यांनाही असंच वाटतं. त्या सांगतात, “आम्ही महिला खूप सोसतो. घरात, ऑफिसमध्ये, कुटुंबाच्या बाबतीत असं खूप काही. ते टेन्शन विसरून आम्ही इथे येतो आनंदासाठी.
“एका शब्दात सांगायचं असेल तर क्रिकेट म्हणजे आनंद. तो आनंद मी माझ्या प्लेयर्सच्या डोळ्यात पाहते जेव्हा ते खेळतात.”