बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जुलै 2024 (18:02 IST)

पावसाळा सुरू झाला की हजारो माश्या येतात तरी कुठून?

पाऊस येताच घरात वेगवेगळे कीटक यायला सुरुवात होते.माशी हाही असाच एक कीटक आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर घरात खूप माश्या येतात. स्वच्छ अन्नावर बसून ते दूषित करण्याचं कामही त्या करतात.
माश्या हे रोगाचं माहेरघर आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पण पाऊस पडल्यानंतर माश्यांची संख्या वाढते, तेव्हा

नेमकं काय होतं?
हे समजून घेण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली.
 
माश्यांचं वैज्ञानिक नाव डिप्टेरा आहे. त्यांच्या विविध प्रजाती अस्तित्वात आहेत, परंतु घरात आढळणाऱ्या माशीला ‘हाऊस फ्लाय’ असं म्हणतात.
 
माश्यांविषयी अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसीने नवसारी कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख कीटकतज्ज्ञ आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ ललितकुमार घेटिया यांच्याशी चर्चा केली.
 
पावसांत का वाढते माश्यांची संख्या?
"माश्या सडत असलेल्या किंवा सडलेल्या वस्तूंवर जगतात आणि वाढतात,” असं ललितकुमार बीबीसी गुजरातीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

त्यांच्या मते, "उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कचरा असतो पण तो कमी प्रमाणात कुजतो, त्यामुळे माशांसाठी ते वातावरण पोषक नसतं."

"पण पावसाळ्यात दमट वातावरण असतं आणि मग सगळं कुजायला सुरुवात होते. उदा. झाडांच्या पडलेल्या वाळक्या पानांवर पाणी पडलं की ते कुजतं. घराच्या सुक्या कचऱ्यावर पाणी पडलं तरी ते कुजतं. पावसाळ्यात अनेक गोष्टी सडतात आणि दुर्गंधी येते."

"एखादी वस्तू कुजल्यानंतर माश्या त्या विशिष्ट वासाकडे आकर्षित होतात. आणि या वासामुळे माश्यांमध्ये 'सूक्ष्मजीव प्रक्रिया' सुरू होते. त्यामुळे त्या अधिक अंडी घालतात आणि त्यांची संख्या वाढते."
 
सडलेले किंवा कुजलेले पदार्थ हे माशांचे अन्न आहे असंही ललित घेटिया सांगतात.
 
त्यांच्या मते, कोरड्या हवेत वस्तू कुजत नाहीत आणि त्यामुळे त्यांची दुर्गंधी येत नाही. त्यामुळे माश्या फक्त विखुरलेल्या भागातच आढळतात.
 
"याशिवाय, पावसाळ्यात जन्मलेल्या माश्यांचं आयुष्य इतर ऋतूंमध्ये जन्मलेल्या माश्यांपेक्षा कमी असतं."
 
प्रौढ माश्यांचे डोळे लाल असतात आणि ते 3-8 मिलिमीटर लांब असतात .
 
माश्या रोगराई कशा पसरवतात?
स्टिफन शुस्टर हे सिंगापूरमधील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे संशोधन संचालक आहेत.
 
“माश्यांचा वापर संशोधनासाठी केला आहे. काही वेळेला त्यांना विशिष्ट भागावर सोडतात. ड्रोनद्वारे त्यांचं निरीक्षण केलं असता, त्या परत येतात ज्याच्या संपर्कात त्या येतात त्याचा काही भाग सोबत घेऊन येतात, हे आढळून आलं,” असं ते म्हणाले.
 
माशीच्या प्रत्येक हालचालीमुळं मानवी शरीरात जीवाणू जाण्याची शक्यता असते, असंही काही रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.
ललित म्हणाले की, "माश्या घाणीवर बसतात आणि सूक्ष्मजंतू त्यांच्या पायाला चिकटतात. त्यानंतर आपल्या घरातील स्वच्छ अन्नावर बसल्यावर त्या अन्नात सूक्ष्मजीव सोडतात आणि अन्न खराब होतं आणि त्यामुळं विविध रोगांना आमंत्रण मिळतं.
 
"माश्या अशा घाणीत बसल्या नाहीत आणि स्वच्छ अन्नावर बसल्या नाहीत, तर ते घाण होत नाही. याचा अर्थ माश्यांना घाणच आवडते असं नाही.”
तज्ज्ञांच्या मते, माश्यांच्या संपर्कात आलेले पदार्थ खाल्ल्याने टायफाईड आणि कॉलरासारखे आजार होण्याची दाट शक्यता असते.
माश्यांचे वैशिष्ट्य
ललित म्हणतात, "तुम्हाला लक्षात आलं असेल की, माशी एका जागी स्थिर राहू शकते, तिला सतत उडण्याची गरज नसते.
याचं कारण म्हणजे त्यांना पंखांची जोडी असते आणि त्यांच्यामध्ये एक बॅलेन्सर पंख असतो. त्यामुळे ती हवेत एकात जागी राहू शकते"
 
याशिवाय, माश्यांच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगताना, ललित म्हणतात, "माश्या आरशासारख्या कोणत्याही गुळगुळीत पृष्ठभागावर चालू शकते. इतर कीटक अशाप्रकारे चालू शकत नाही.
 
Published By- Priya Dixit