शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By वेबदुनिया|

स्त्री- पुरूष (अ)समानता

लग्न स्त्री आणि पुरूष दोघांत होते. पण विवाहित असण्याचे 'लायसन्स' मात्र केवळ स्त्रीलाच घालावे लागते. पुरुषाच्या बाबतीत मात्र असे नाही. अविवाहित आणि विवाहित पुरुष ओळखता येत नाही. ना नावात, ना कपड्यांतून, ना हातातल्या बांगड्यांतून ना बोटातल्या अंगठीतून. स्त्रिया नवर्‍याच्या नावाने कुंकू लावतात, मात्र बायकोच्या नावाने कुंकू लावलेला पुरूष पाहिला आहे? विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखण्यासाठी काहीच उपाय नाही. मात्र, विवाहित आणि अविवाहित स्त्रियांमधील भेद ओळखण्यासाठी बरीच व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे विवाहित आणि विधवा स्त्रियांमधील फरकही ओळखण्याची व्यवस्था आहे. 

पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही. 

विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.

स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का? जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?

पुरुषाच्या उपभोगासाठी योग्य झाल्यावर स्त्रीला बहुमूल्य अलंकारांनी आणि वस्त्रांनी सजविले जाते. पुरुषाच्या उपभोगासाठी 'अयोग्य' झाल्यावर मात्र तिला समाजाच्या कचरापेटीत फेकले जाते. याचा अर्थ आपल्या पुरूषाला खुश करणे, तृप्त करणे एवढेच स्त्रीकडून अपेक्षित आहे का?

समाज असे का करतो? हे बदलले पाहिजे. समानता आता सगळ्या बाबतीत यायला हवी. महिलांनो आता तुम्हीही सर्व दिखाऊ संस्कार, दागिने यांना झुगारून 'मानव' बना.  
'तू एक मुलगी आहेस
हे तू विसरू नकोस
तू जेव्हा घराचे दार ओलांडशील
तेव्हा लोक तुझ्याकडे तिरप्या नजरेने बघतीलच
तू जेव्हा गल्ली-बोळातून जाशील
लोक तुझा पाठलाग करतील, शिट्याही वाजवतील
तू जेव्हा गल्ली पार करून मुख्य रस्त्यावर पोहचशील
लोक तुला चरित्रहीन म्हणून शिव्याही देतील
जर तू निर्जीव असशील
तर परत फिरशील
नाहीतर
जशी जात आहेस तशीच चालत राहशील....