1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

आहार घ्या आयुर्वेदानुसार

ND
प्रत्येक व्यक्तीचे खाणे-पिणे त्याच्या संस्कृतीनुसार असते. खाण्या-पिण्यात पूर्वीच्या काळात ज्या पदार्थांचा वापर केला जात होता, आजही त्याच पदार्थांचा वापर केला जात आहे. या खाद्यपदार्थामध्ये काही असे पदार्थ आहेत, जे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत, तर काही अति सेवन केल्यास नुकसानदायी आहेत. याच आधारे प्राचीन काळातच आयुर्वेदाचार्यांनी आहाराचे मुख्य तीन प्रकार सांगितले होते....

सात्त्विक आहार :
हा आहार ताजा, रसयुक्त आणि पौष्टिक असतो. त्यात अन्न, दूध, दही, तूप, मठ्ठा, हिरव्या पालेभाज्या, फळे, मेवा इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. सात्त्विक भोजनाचे पचन लगेच होते. त्यासोबत लिंबू, संत्री, लस्सी या सारखे पदार्थ लाभदायक असतात. या आहाराने चित्त एकाग्र आणि पित्त शांत राहते. या पदार्थांचा आहारात समावेश आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

राजस आहार :
या भोजनात सगळ्या प्रकारचे पक्वान्न, मिठाई, अधिक मिरची-मसालेयुक्त पदार्थ, नाश्त्यांचे आधुनिक पदार्थ, चहा, कॉफी, सोडा, पान, तंबाखू, दारू इ. पदार्थांचा समावेश असतो. राजस आहार चुकीच्या किंवा अतिप्रमाणात घेतल्यास आपण कधीही आजारी पडू शकतो. त्यापासून पूर्णपणे दूर राहणे शक्य नसले तरी यांचा वापर शक्य तेवढा कमी करावा. सध्या बर्‍याच आजारांना या पद्धतीचा आहारच कारणीभूत आहे. त्यामुळे आजार होण्यापेक्षा अशा आहारापासून दूर राहणेच योग्य.

तामसी आहार :
यात मांसाहार प्रमुख मानला जातो. हा आहार व्यक्तीला संतापी आणि आळशी बनवितो. तसेच हा आहार शरीर आणि मन या दोघांसाठी प्रतिकूल आहे.

खाण्या-पिण्यासंबंधी खालील बाबी लक्षात ठेवा...
* घाई असेल, तणाव असेल, रागात असाल अशा परिस्थितीत जेवण न करणेच योग्य.
* आयुर्वेदानुसार जो मनुष्य आहार घेतो त्याने व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.
* वयोवृद्धांनी पचनक्रियेसाठी शतपावली करणे पुरेसे आहे.
* आहार ऋतू, स्थळ आणि वेळेनुसारच करा. सारखे सारखे काहीही खाऊ नका.
* जेवणासोबत पाणी पिऊ नका. अर्धा तास आधी आणि एक तास नंतर पाणी प्या.
* उपाशी राहणे अयोग्य आहे. हे शरीराला नुकसानकारक आहे.
* दिवसा इतके काम करा की संध्याकाळी थकवा येईल. याने भूक वाढते आणि झोपही चांगली लागते.