मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या!
|
मुलांचे वजन
जन्मत: मुलांचे वजन सामान्यतः: अडीच ते तीन किलो असते. हे वजन मूल पंधरा महिन्याचा होईस्तोवर दुप्पट व्हायला हवे. आईचे दूध आवश्यक प्रमाणात मिळाल्याने पाच-सहा महिन्याच्या मुलाचे वजन दुप्पट होते. मूल सहा महिन्याचे झाल्यावर त्याच्या आहाराकडे दुर्लक्ष व्हायला लागते. त्यामुळे मुलांचे वजन वर्षभरात जन्माच्या वेळेपेक्षा तिप्पट होण्याचा आनंद क्वचितच पालकांना घेता येतो.
पहिल्या वाढदिवसानंतर वजन वाढण्याची गती कमी व्हायला लागते. दोन वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलांचे वजन जन्माच्या वेळेपेक्षा चौपट वाढते. (म्हणजे जन्माच्या वेळी अडीच तर दोन वर्षात दहा किलो). त्यानंतर दरवर्षी एक किलो वजन वाढते.
मुलांची उंची
जन्माच्या वेळी जर उंची 5 सेमी असेल तर बाळ वर्षाचे होईपर्यंत त्याची उंची 75 सेमीपर्यंत वाढते. जन्माच्या चार वर्षानंतर उंची दुप्पट (म्हणजे जवळपास 100 सेमी होते). नंतर ही उंची दरवर्षी 6 सेमी इतकी वाढते. आहारातील कमतरतेमुळे वजनावरही परिणाम होतो. फार काळापर्यंत कुपोषण झाल्याचा परिणाम मुलांच्या उंचीवर होतो. आयर्नच्या (लोह) कमतरतेमुळे एनीमिया होऊ शकतो.
एक ते पाच वर्षे वयोगटातील मुलांचा दंडघेर जर 12.5 सेमीपेक्षा कमी असेल तर मुलगा कुपोषणाचा शिकार हे लक्षात घ्या. मुलाचा चेहरा गुलाबी नसून पांढरा असेल तर त्याला कुपोषणग्रस्त समजावे. ओठ नेहमी फाटणे, जीभ आणि तोंड येणे हे व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होते. त्याचप्रमाणे बोटांच्या नखांमागची त्वचा काळी पडणे फॉलिक ऍसिडच्या अभावाचा परिणाम असतो.
मूठभर हिरव्या भाज्या, सलाड, फळे खाल्ल्याने हे ठीक होऊ शकते. वाढत्या वयात शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी प्रोटीन, आयर्न, कॅल्शिअम, व्हिटॅमिन यांची गरज असते. त्यांच्या अभावामुळे रोग प्रतिरोधक क्षमता कमी होते. या मुलांना सर्दी-खोकला आणि त्यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
