मुलाची शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असेल तर त्याला लहानपणापासून वाचायची सवय लावा, असा सल्ला एका अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ बाईंनी तमाम आईमंडळींना दिलाय.
कौटुंबिक साक्षरतेसाठी काम करणार्या एका संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा असणार्या शेरॉन डार्लिंग यांनी हा सल्ला दिलाय. मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक यशासाठी त्यांना लहानपणापासूनच रोज काही तरी वाचायची सवय लावा, असं त्या म्हणतात. आपल्या मुलाला चांगले मार्क मिळावे यासाठी काय करता येईल, असा या आया सतत विचार करत असतात. पण याचं उत्तर मात्र शेरॉनबाईंच्या मते अगदी साधे आहे. ते म्हणजे 'वाचनाची सवय'.
पण याव्यतिरिक्तही मुलाचे पालक त्याच्यासाठी बरंच काही करू शकतात. मुलाबरोबर काही काम करणे, खेळणे, वाचणे, त्यांच्याशी गप्पा मारणे यासारख्या बाबींमुळे मुलांना आवश्यक असलेला आत्मविश्वास वाढतो. मुलांसोबत गाणी म्हणणे, 'ट ला ट' लावून गाणी रचणे, आपण पाहिलेल्या एखाद्या गोष्टीबाबत त्याला काही सांगणे, आजूबाजूला असलेली अक्षरे, शब्द दाखविणे अशा पद्धतीनेही मुलांचे 'शिक्षण' तुम्ही करू शकता, असा शेरॉनबाईंचा सल्ला आहे.
जेवणाच्या टेबलावर गप्पा मारणे, गेम्स खेळणे, घरातल्या घरात किंवा गाडीतून जात असताना त्याच्याशी बोलणे याही गोष्टी आपण करू शकतो. कुटुंबातच वाचनाची सवय असल्यास खूपच चांगले. त्यामुळे वाचनातही गंमत असते हे त्याला जाणवू द्यायला हवे.
रोज विशिष्ट जागी वेगळा वेळ काढून वाचन केल्यास मुलेही कोणत्याही हस्तक्षेपाविना वाचनाचा निखळ आनंद घेऊ शकतील. मुलासोबत बसून वाचनामुळे आणखी एक गोष्ट घडते. ती म्हणजे एरवी एकटे असताना मुलांत असुरक्षितता निर्माण करणारी संप्रेरके (हार्मोन्स) स्त्रवतात. पण मुलाबरोबर वाचनात सहभाग घेतल्यास सुरक्षितता प्रदान करणारी संप्रेरके स्त्रवतात. त्यामुळे त्याच्यातील असुरक्षिततेची भावना निघून जाते.
दुपारची जेवणाची वेळ या सगळ्यासाठी अतिशय उत्तम असल्याचे संशोधनात आढळले आहे.
|