सिझोफ्रेनियाः गरज आहे आधाराची
-अभिनय कुलकर्णी
|
पुण्यात सिझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनतर्फे यानिमित्ताने उद्या (ता.२४) विविध कार्यक्रम होत आहेत. पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवेशद्वारापाशी/ प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर सकाळी साडेनऊपासून ते सायंकाळी साडेसातपर्यंत आणि एम. जी. रोड वॉकिंग प्लाझा, पुणे कॅम्प येथे चारपासून रात्री साडेआठपर्यंत यासंदर्भात जाणीव जागृती करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सिझोफ्रेनियाविषयी माहिती देणारा हा लेख....
मनोविकारात सातत्याने उद्भवणारा आणि व्यक्तीला जखडून ठेवणारा आजार म्हणून छिन्नमस्कता अर्थात सिझोफ्रेनिया ओळखला जातो. वयाच्या सोळाव्या वर्षापासून तिशीपर्यंत हा आजार जडू शकतो. पण शंभरापैकी एकालाच तो होतो. थोडक्यात लोकसंख्येतील एक टक्का लोक या विकाराने बाधित आहेत. विशेष म्हणजे महिला व पुरूष दोघांनाही हा विकार होण्याची शक्यता सारखीच आहे. बर्याच अंशी या विकारावर उपचार होऊ शकतात, अर्थात हा विकार पूर्णपणे बरा होण्यासाठी औषध नाही हेही लक्षात घेतले पाहिजे.
सर्वसाधारणपणे मनाचे आपल्या विविध क्रियांवर नियंत्रण असते. (उदा. विचार करणे, भावना, जाणीवा आणि वर्तणुक किंवा स्वभाव.) या सर्व क्रिया परस्परांसह चालू असतात. त्यांच्यामुळेच आपणः
कल्पना आणि वास्तव यांच्यातील फरक सांगू शकतो.
चिंता एका विशिष्ट पातळीवर व्यवस्थापित करू शकतो.
योग्य ते भावनात्मक प्रतिसाद देऊ शकतो.
काही घडले तरी त्याची जाणीव आपल्याला होते
आपण नेमके कोण आहोत, याची स्थिर जाणीव आपल्याला होते.
इतरांबरोबर नाते प्रस्थापित करणे आणि टिकविणे शक्य होते.
पण सिझोफ्रेनिया झाल्यास या सर्व क्रियांचे परस्पर सहकार्य नीट होऊ शकत नाही. सिझोफ्रेनिया याचा अर्थ दुंभगलेले व्यक्तिमत्व (स्प्लिट पर्सनॅलिटी) असा नाही. मनोक्रियांचा परस्परांशी ढळलेला तोल याला सिझोफ्रेनिया असे म्हणता येईल.
सिझोफ्रेनियाची कारणे
सिझोफ्रेनियाची नेमकी कारणे काय आहेत, हे अजूनपर्यंत कळलेले नाही. शास्त्रज्ञांच्या मतेही सिझोफ्रेनिया हा काही विविध परिस्थितींच्या गटाने होणारा विकार आहे. केवळ एका कुठल्या कारणामुळे तो होत नाही. हा विकार होण्यास अनेक कारणे असू शकतात. मेंदूतील रासायनिक किंवा रचनात्मक किंवा दोन्ही प्रकराचे बदल मेंदूचे संतुलन बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात, हे शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. कुण्या एका जनुकामुळे हा विकार होतो, हेही स्पष्ट झालेले नाही. पण आयुष्यात काही घडलेल्या घटनांच्या प्रभावातूनही होऊनही हा विकार होऊ शकतो.
|
संभ्रम( डिल्यूजन)- चुकीच्या पण ठाम विश्वास असलेल्या गोष्टी. हा विकार असलेल्याला या गोष्टी संपूर्णतः खर्या आहेत असे वाटते.
भ्रम किंवा भूल (हॅल्यूसिनेशन) - ज्या गोष्टी मुळात नाहीच, त्या पाहिल्या, ऐकल्या, जाणीव झाल्या, स्पर्शल्या, वास घेतला वा आस्वाद घेतल्यासारखे वाटणे. भास (हॅल्युसिएशन) हा जाणीवेच्या पातळीवर असतो. एखादा आवाज ऐकल्याचा भास हा सिझोफ्रेनियात बर्याचदा होतो.
भ्रामक कल्पना (इल्यूजन)- हे वरील भ्रमापेक्षा थोडे वेगळे आहे. सिझोफ्रेनिक माणसाच्या जाणीवा जास्त तीव्र असतात. त्यामुळे त्याला नेहमीपेक्षा एखादा आवाज जास्त जोरात ऐकू येतो. तसेच रंग इतरांपेक्षा जास्त तीव्र दिसतात. लक्ष्य जवळ किंवा लांब दिसणे हेही यात घडते.
वैचारिक विनस्कता- सुसंगत विचार करता न येणे. कुठल्याही गोष्टीवर केंद्रीभूत होऊ न शकणे, हे यात येते.
भावनिक व वर्तणुकीच्या संदर्भातील बदल- सिझोफ्रेनिक माणसांत भावनिक बदल फार चटकन होतात. त्यांचे मूड पटापट बदलतात. उदा. तीव्र दुःखष आनंद, उत्साह, निराशा किंवा राग हे कोणत्याही सूचनेविना, कारणाविना दिसून आकस्मिक येतात. काही वेळा भावनाविहीनताही दिसून येते.
सिझोफ्रेनियावर उपचार
सिझोफ्रेनियार आता चांगले उपचार उपलब्ध आहेत. गेल्या दहा वर्षांत अनेक औषधे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे साईड इफेक्टस कमी झाले आहेत. त्याचवेळी सिझोफ्रेनिक रूग्णांना समाजाकडून, कुटुंबाकडून समजावून घेणेही गरजेचे आहे. कारण त्याआधारेच त्याला संतुलित रहाणे शक्य होईल.
एंटी सायकोटीक उपचार वेगवेगळ्या पातळीवर कार्य करतात. त्यामुळे तत्काळ फरक पडतो. सिझोफ्रेनिक व्यक्ती तत्काळ शांत होते. त्याच्या चिंता कमी होतात. अस्वस्थता आणि संताप कमी होतो. भ्रम (हल्युसिनेशन) दूर होम्यास चार आठवडे तरी लागतात.
काही लोक गोळ्या घ्यायला नकार देतात. त्यांना वाटते की आपल्याला काही झालेले नाही. किंवा एकुणात उपचारपद्दतीविषयी त्यांच्या मनात काही नकारात्मक पैलू असतात. पण तरीही त्या गोळ्या घ्यायला हव्यात. आता यासंदर्भात इंजेक्शन्सही उपलब्ध आहेत. प्रत्येक दोन किंवा तीन आठवड्यांत ती घेता येतात. गोळ्या घ्यायला विसरणार्या व्यक्तींसाठी इंजेक्शन्स उपयुक्त आहेत.
सिझोफ्रेनिक व्यक्ती कधी कधी हिंसक होतात. त्यामुळे त्यांना समाजाच्या आधाराची गरज आहे. त्यांना घरात चांगली वागणुक, आर्थिक मदत, मदत करणारे मित्र, कुटुंबीय असले पाहिजे. अनेकदा लोक करीयर घडवत असताना, एखादे ट्रेनिंग घेत असताना किंवा लग्न करत असताना अचानक सिझोफ्रेनिक होतात. त्यामुळे अनेकदा समाजात कसे वावरायचे किंवा नेहमीचेच काम कसे करायचे याचे प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होतात. अशा वेळी त्यांना आधार देऊन समाजात वावरण्यासंदर्भात, कामासंदर्भात त्यांना विश्वासात घेऊन त्या बाबी पुन्हा एकदा शिकवायला हव्यात. त्यामुळे आपण एकटे नाही, आपल्यालाही आधार आहे, ही भावना त्यांच्यात निर्माण होईल.
