सावधान! कम्प्युटरवर काम करताय?
|
कम्प्युटरसमोर तासंतास बसून आपण काम करतो. आपले कामही बिनचूक होते. मात्र सतत खुर्चीवर बसून आपली पाठ दुखणे, स्क्रीनकडे एक सारखे पाहिल्याने डोळ्यातून पाणी येणे, डोळे दुखणे तसेच की-बोर्ड अधिक हाताळल्याने हाताची बोटे दुखणे, बोटाच्या नसा आखडणे आदी दुखणी जडतात. त्याकडे आपले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दुर्लक्ष होत असते.
भविष्यात मात्र हे आजार गंभीर स्वरून धारण करतात व आपल्यासह आपल्या कुटुंबियांची डोकेदुखी होऊन बसतात. वैद्यकीय संज्ञेत त्याला 'रिपिटेटिव्ह स्ट्रेस सिंड्रोम' म्हटले जाते. त्यात 'टेंडोनाइटिस व कार्पल टनल सिंड्रोम' यांचाही सहभाग असतो.
'रिपिटेटिव्ह स्ट्रेस सिंड्रोम' हा आजार मांसपेशी, नसा व सांधे यांच्या कार्यप्रणालीत बिघाड झाल्याने होतो. या आजारापासून आपल्या आरोग्यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सगळ्यात आधी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, आपली काम करण्याची जागा आरामदायक आहे की नाही. कॉम्प्युटरचा मॉनिटर व आपले डोळे यांच्यातील अंतर साधारण एक हाताचे असले पाहिजे. हार्ड की असलेला की-बोर्ड वापरणे टाळावे.
माऊसला असा ठेवा की आपण त्याला सहज हाताळू शकतो. एकाच जागेवर जास्त वेळ बसू नका. स्क्रीनवर डोळे ताणून पाहिल्याने डोळ्यांना अधिक त्रास होतो. तासंतास कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहिल्याने व्हिजन सिंड्रोमची बाधा होऊ शकते. संभव असल्यास साधारण तास दीड तासातून एकदा ब्रेक घ्यावा. अशा ह्या गोष्टी आपल्याला लहान वाटतात. परंतु, त्याकडे लक्ष दिल्यास आपले आरोग्य अबाधित ठेऊ शकतो.
