1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य लेख

आर्थिक क्षेत्राबरोबर सेक्समध्येही ''मंदी''

आर्थिक क्षेत्राबरोबर सेक्समध्येही मंदी
आर्थिक मंदीचा परिणाम आता ऑफिस, किचन आणि आता बेडरूमवरही पडायला लागला आहे. रोज अनेकांच्या नोकर्‍या जात असताना त्यांच्या सेक्स जीवनावरही त्याचा परिणाम होत आहे. कामगार मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या अहवालात याला पुष्टी देण्यात आली आहे.

आर्थिक मंदी व इतर सामाजिक समस्यांमुळे पुरूषांमध्ये टेस्टोटेरॉन या हार्मोन्सचे प्रमाण कमी होते. यातून विविध समस्या निर्माण होतात. आर्थिक तंगी व कामासंदर्भातील तणावामुळे पुरूषांमध्ये या हार्मोन्सचे प्रमाण कमी होते, असे डॉ. याचना ग्रोव्हर यांनी सांगितले. टेस्टोटेरॉन सेक्सची भावना वाढविण्याचे काम करते. हे हार्मोन्स मूडही ठरवते आणि स्मरणशक्तीही. एखादा माणूस चीडचीड करू लागला की लोकांना वाटते वयामुळे असे होते असावे. पण तसे नाही. टेस्टॉटेरॉनचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याच्या स्वभावात फरक पडतो. मानसिक दडपणामुळे हे सारे घडते, अशी माहितीही ग्रोव्हर यांनी दिली.

डॉ. निकिता त्रेहान यांच्या मते गेल्या काही वर्षांपासून सेक्स समस्या आणि नपुंसकतेचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. सेक्स समस्या वाढण्यासाठी आर्थिक मंदीच नव्हे तर गेल्या वर्षापर्यंत असलेली आर्थिक तेजीही कारणीभूत असल्याचे डॉ. त्रेहान यांचे मत आहे. कारण आर्थिक तेजीत अधिकाधिक पैसे मिळविण्यासाठी, करीयर करण्यासाठी पुरूष व स्त्री धडपडत असतात. त्यामुळे सेक्सकडे त्यांचे दुर्लक्ष होते.

मंदीचा दाम्पत्यातील सेक्स जीवनावर नेमका काय परिणाम होतो आहे, हे जाणून घेण्यासाठी वर्ल्ड असोसिसएशन ऑफ सेक्सॉलॉजिस्ट (डब्ल्यूएएस) यांच्या सहकार्याने भारत, अमेरिका व युरोपमध्ये सर्वेक्षण केले जात आहे. त्याचे निष्कर्ष याच वर्षी स्वीडनमध्ये होणार्‍या एका परिषदेत जाहीर केले जातील. मंदीचा टेस्टेटोरॉनवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास या सर्वेक्षणात केला जाईल.

भारतात अहमदाबादमध्ये ९७ लोकांवर केलेल्या सर्वेक्षणात असे आढळले की १५ते २० दाम्पत्ये आर्थिक नुकसानीमुळे घटस्फोटापर्यंत पोहोचली होती. मंदीमुळे त्यांच्यात सेक्स उरला नव्हता. त्यातले बहुतांश लोक ३५ पेक्षा कमी वयाचे होते. काहींचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते.

डॉ. त्रेहान यांच्याकडे गेल्या काही वर्षांत ३३ वर्षाच्या वरील महिलाच प्रसुतीसाठी येत आहेत. वास्तविक प्रसुती तिशीच्या आतच व्हायला हवी, असे सर्वसाधारण वैद्यकीय मत आहे. कारण त्यानंतर प्रसुत होणार्‍या महिलांना व होणार्‍या बाळाला त्रास होण्याची शक्यता असते.

मंदीच्या या काळात मानसोपचारतज्ज्ञ निमेश देसाई यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी अनेक स्टॉक ब्रोकर, आर्थिक क्षेत्रात काम करणारे वा कॉंट्रॅक्टवर काम करणारे लोक येत आहेत. नोकरी जाण्याची भीती असलेल्यांची संख्या यात मोठी आहे. नोकरी गमावणे म्हणजे आपली ओळख पुसण्यासारखे आहे, असे त्यांना वाटते. हे लोक बोलणे बंद करतात, नजर लपवतात. मुलांची फी वेळेत भरू शकणार नाही, याचे दुःख त्यांना खाते.

मानसोपचारतज्ज्ञ अवधेश शर्मा यांच्या मते आर्थिक मंदीमुळे घाबरून न जाता, त्याचा ठामपणे मुकाबला केला पाहिजे. निराशा टाळली पाहिजे. कारण संकटातही संधी असते. नोकरी गेल्याने आता दुसरे काही जाणार नसते. त्यामुळे जिद्दीने प्रयत्न करण्याची शक्तीही आपोआप दाटून येते. तिचा फायदा उचलला पाहिजे.

सध्या डॉ. शर्मांकडे येणार्‍यांत युवकांची संख्या मोठी आहे. त्यातले बरेचसे लोक फॅशन, टुरीझम व आयटी क्षेत्रातील आहेत.
About Writer
वार्ता