वयाची साठी उलटल्यानंतर 'आयुष्याची आता झाली उजवण' असं म्हणण्याची गरज नाही. कारण आता या आयुष्याला २५ वर्षांचे बोनस आयुष्य जोडण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रयत्नांतर्गत एक गोळी बनविण्यात येत असून ती घेतल्याने आयुष्य किमान २५ वर्षांनी वाढेल, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
आगामी काळात ब्रिटनसह अनेक श्रीमंत देशातील बाळे हे २५ वर्षांचे बोनस आयुष्य घेऊनच जन्माला येण्याची शक्यता आहे. आयुष्यवृद्धीवरील या रामबाण औषधात स्पर्मिंडाईन नावाच्या कणाच्या सहाय्याने त्वचा वृद्ध करणार्या घटकांपासून शरीराचे संरक्षण करण्यात येईल. यासंदर्भात अजूनही संशोधन सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे.
यासंदर्भात संशोधन करणार्या शास्त्रज्ञांच्या गटाचे प्रमुख आणि ऑस्ट्रियातील ग्रेझ विद्यापीठातील डॉ. फ्रॅंक मेडीओ यांच्या मते, आम्ही करत असलेल्या संशोधनातून अशा प्रकारे आयुष्यवर्धक औषध तयार करणे शक्य होईल. त्यामुळे वृद्धत्व येण्याची प्रक्रिया मंदावेल आणि लोक आरोग्यवान होऊन त्यांचे आयुष्य वाढेल.
नुकताच ब्रिटनमध्ये एक अहवाल प्रकाशित झाला असून त्यात येथील नागरिकांचे सरासरी वय ८१ असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ या नव्या औषधाचा वापर झाल्यास ब्रिटनचे नागरिक किमान शंभर वर्षांहून अधिक काळ जगतील. पेशींचा मृत्यू होत जाऊन वृद्धत्व येण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला लांबविण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे.
स्पर्मिडाईन हा घटक वृद्धत्वाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. या स्पर्मिडाईनचे प्रमाण कमी कमी होत गेले की पेशींच्या वाढीला आवर घातला जातो. थोडक्यात देह वृद्धत्वाकडे झुकतो. त्यामुळे या स्पर्मिडाईनचे प्रमाण आहे तेवढे ठेवणे किंवा वाढविणे याद्वारे पेशी वृद्धिंगत होण्याची प्रक्रिया चालू ठेवणे किंवा लांबविणे शक्य होईल.
यासंदर्भात काही माशा आणि किटकांवर प्रयोग करण्यात आला. त्यात माशांचे आयुष्य अनुक्रमे तीस टक्क्यांनी आणि किटकांचे १५ टक्क्यांनी वाढल्याचे लक्षात आले. हा प्रयोग मानवी रक्तातील पेशींवरही करण्यात आला. त्यानुसार प्रयोगशाळेत ठेवलेल्या मानवी पेशींपैकी बारा दिवसांनंतर फक्त १५ टक्केच जिवंत राहू शकल्या. त्याचवेळी स्पर्मिडाईनचे प्रमाण वाढवेलल्या पेशींचे आयुष्य मात्र वाढलेले आढळले. बारा दिवसांनंतर त्यातल्या५० टक्के पेशी जिवंत आढळल्या. उंदरांनाही तब्बल दोनशे दिवस हे रसायन पाण्याद्वारे देण्यात आले. त्यातले त्यांना वृद्धत्वाकडे नेणारे घटक तीस टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले.