शरीर आहे तिथे व्याधी आहे. कोणत्याही ऋतूत किरकोळ आजार हे होत असतातच. कुठलेही काम करताना, चालताना, खेळताना, स्वयंपाक करताना, प्रवास करताना, लग्नप्रसंगी, शाळेत, रस्त्यात, देवळात, घरात अशा अनेक प्रसंगी कोणत्या ना कोणत्या तरी कारणास्तव आपल्या शरीरास किंवा इतर व्यक्तींच्या शरीरास दुखापत होत असते. यासाठी प्रत्येकाला काही औषधे माहीत असणे हे अत्यंत आवश्यक आहेच. प्रवासात किंवा घरी ही प्रथमोपचाराची पेटी संग्रही असू द्या.
हळद - कोठेही खरचटले, कापले असता हळद दडपावी. सर्दी झाल्यास विस्तवावर हळद टाकून रात्री त्याची धुरी घ्यावी. चेहरा नितळ होण्यासाठी साय व हळद तोंडाला लावावी. घसा खवखवत असल्यास कपभर दुधात एक चमचा हळद घालून गरमागरम रात्री प्यावे. मार बसून सूज आल्यास हळद व तेल लावून शेकावे. डोळे आल्यास हळदीच्या पाण्याने धुवावेत. पायाच्या बोटास चिखल्या झाल्यास रात्री हळद व गोडेतेल लावावे. मोहरी - कोणतेही लोणचे घालण्यासाठी मोहरीची पूड लागतेच. थंडीच्या दिवसांत अंग फुटते. त्यावेळी रात्री अंगाला मोहरीचे तेल लावावे. थंडीने पोटात मुरडा होत असेल तर चमचाभर मोहरी व थोडी मेथी गरम पाण्याबरोबर गिळून टाकावी.
मेथी - दररोज फोडणीत मेथीची पूड टाकावी. त्यामुळे पोटात वात धरत नाही. मधुमेह झालेल्यांनी दररोज रात्री मेथी एक चमचा पाण्यात भिजत घालावी. सकाळी चावून खावी. मेथीला मोड आणून उसळ करावी. मेथी वातहारी आहे. आव पडत असल्यास मेथी चमचाभर गरम पाण्यातून घ्यावी. मेथीची पालेभाजी खावी. हिंग - दररोज फोडणीत हिंग घालावा. पदार्थ रुचकर होतो. थंडीने पोटात दुखत असेल तेव्हा बेंबीत हिंगपूड व थेंबभर पाणी घालून तासभर झोपावे. पोटात मुरडा होत असेल तर चमचाभर हिंग व सुपारीएवढा गूळ मिसळून सकाळी खावा. अपचन झाल्यास ताकात चिंचोक्याएवढा हिंग घालून वाटीभर प्यावे. खाण्याचा सोडा - पोटात दुखत असल्यास अर्धा कप ताकात चिमूटभर सोडा घालून फसफसल्यावर प्यावे. पोटात गॅस धरल्यावर दोन चमचे लिंबाचा रस घेऊन त्यात डाळी एवढा सोडा घालून तो प्यावा. तसेच, अपचन झाल्यास सोडा खावा. कोणचीही डाळ शिजत नसेल तर डाळीएवढा सोडा घालावा डाळ लगेच शिजते. चुना - विडा तयार करताना चुना लावतात. हा पचनास हलका आहे. अंगावरील फोडात पू झाला असल्यास चुना पाण्यात कालवून फोडावर लावल्यास पू शोषला जाऊन काळी खपली लगेच बसते. जखम झाल्यास चुना भरतात. पुरण पातळ झाल्यास डाळीएवढा चुना घालून ते पुन्हा शिजवल्यास पुरण घट्ट होत. गुळपोडीच्या गुळात चुना घातल्यास गूळ पोळीतून बाहेर येत नाही. मुकामार बसल्यास हळद चमचाभर व चुना हरभर्याएवढा घेऊन पाण्यात कालवून त्या जागी लावल्यास वेदना तत्काळ कमी होतात.
|