नियमित जीवनशैली, संतुलित आहार आणि दररोज किमान अर्धा तास व्यायाम या त्रिसूत्रीच्या आधारे मधुमेहाला दूर ठेवता येऊ शकते, असे देशविदेशांत झालेल्या विविध संशोधनांतर्गत स्पष्ट झाले आहे. १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. मधुमेहाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. गॅस्टेशनल डायबिटीस हा गर्भवती स्त्रियांमध्ये होण्याची शक्यता असते. त्याचे आणि टाइप-१ चे प्रमाण हे साधारण ५ ते ७ टक्क्यांच्या आसपास असते, मात्र टाइप-२ या मधुमेहाचे प्रमाण मात्र जागतिक स्तरावर मोठे म्हणजे साधारण ९० ते ९५ टक्क्यांच्या घरात आढळते. जगात आजघडीला साधारणपणे १८० दशलक्ष इतके मधुमेहाचे रुग्ण आहेत. आणि एकूण मृत्यूंपैकी ५ टक्के मृत्यू मधुमेहामुळे होतात. १९९५मधील एका संशोधनानुसार भारतातील मधुमेही रुग्णांची संख्या साधारण २० दशलक्ष इतकी आढळली. सन २०२५पर्यंत ती तिप्पट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, हा तर धोक्याचा इशारा आहे. मधुमेह होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये अनियमित जीवनशैली, असंतुलित आहार किंवा जंक फूड खाणे, तणाव अथवा चिंता तसेच या सर्व कारणांनी वाढणारे वजन यांचा समावेश आहे. त्यामुळे मधुमेहाचे आपल्या आयुष्यातील आगमन रोखावयाचे असेल तर त्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे किंवा वाढलेले वजन किमान ५ ते ७ टक्क्यांनी घटविणे हा एक प्रमुख उपाय सांगितला जातो. यासाठी आठवड्यातून किमान पाच दिवस ३० मिनिटांचा व्यायाम किंवा चालणे हे अत्यावश्यकच असल्याचे तज्ज्ञ सांगतात.त्याखेरीज आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत शक्य तितका नियमितपणा सांभाळण्याचा प्रयत्न करणे, जसे जेवणाच्या वेळा सांभाळणे, अवेळी खाणे, फास्टफूड खाणे टाळावे. संतुलित आहार आणि व्यायामात सातत्य ठेवून वजनावर नियंत्रण ठेवले की मधुमेहाला दूर ठेवणे अशक्य नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.स्त्रोत- महान्यूज |