शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (12:16 IST)

कोरोना काळात पावसाळी अधिवेशनाच्या गर्दीचं शासनापुढे आव्हान

पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर कॅबिनेट मंत्री सुनील केदार कोरोना पोझिटिव्ह झाल्यानंतर सरकार पुढे हे अधिवेशन दोन दिवस चालवण्याचे आव्हान आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि दोन दिवस एकाच ठिकाणी महाराष्ट्रातून येणारे आमदार आणि त्यांचे पीए, अधिकारी या गर्दीत अधिवेशन पार पाडण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे.
 
महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. 3 सप्टेंबरला राज्यात सगळ्यात जास्त म्हणजे 18 हजार 105 रुग्ण आढळले. अशा परिस्थितीत मुंबईत दोन दिवसांचे विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. यासाठी सर्व मंत्री, आमदार, अधिकारी, पीए, पत्रकार यांची कोराना चाचणी केली जाणार आहे. ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल त्यांनाच तेच अधिवेशनाला येता येणार आहे. त्यातच अधिवेशनाच्या तोंडावर मंत्री सुनील केदार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात आतापर्यंत साधारणपणे 35 हून अधिक आमदार, मंत्र्याना कोरोनाची बाधा झाली. त्यातून काही बरे झाले तर काहींवर उपचार सुरू आहेत.
 
राज्य सरकारने याबाबत नियमावली केली पाहिजे. ज्यांचे वय 55 पेक्षा अधिक आहे किंवा ज्यांना इतर आजार आहेत याबाबत शासनाने काळजी घेतली नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. काही आमदार मुंबईतील रुग्णसंख्या बघता ते अधिवेशनाला येणं टाळण्याची शक्यता आहे. तर काही आमदार कोरोना असला तरी गेल्या काही दिवसात मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे अधिवेशनाला येणार आहेत.
 
वैभव नाईक यांना नुकताच कोरोना होऊन गेला पण मतदारसंघातील काम, थांबलेली काम यासाठी अधिवेशन हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे अधिवेशनाला येणार आहे. तसेच आरोग्याचा धोका असला तरी समाजातील इतर घटकांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही पण अधिवेशनाला जाणार आहोत असं मत आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केलं.