शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By अभिनय कुलकर्णी|

मराठी व्होटबॅंकेचे 'राज'कारण

NDND
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमर अकबर अँथनीतला 'दोही दिया पर क्या सॉलीड दिया' हा डॉयलॉग उधृत करून राज ठाकरे यांनी त्यांना या निवडणुकीत उतरण्याने काय अपेक्षित होते तेच सांगून टाकले. या निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडून येतील ही खात्री कुणालाच नव्हती, शिवसेना-भाजप युतीला ते धक्का देतील हा अंदाज होताच. पण युतीला मुंबई-ठाण्यातून जवळपास उखडून टाकतील असे मात्र वाटले नव्हते.

कल्याणची जागा वगळता मुंबई व ठाण्यातील नऊ जागांवर मनसेच्या उमेदवारांनी कमीत कमी एक लाखाहून अधिक मते घेतली आहेत. नाशिक या बालेकिल्ल्यात मनसेने दुसर्‍या क्रमांकावर झेप घेताना दोन लाखांहून अधिक मते घेतली, तर दक्षिण मुंबईतही बाळा नांदगावकर यांनी दुसर्‍या क्रमांकावर उडी घेत शिवसेनेचे विद्यमान खासदार मोहन रावले यांना तिसर्‍या क्रमांकावर फेकले. शिरीष पारकर व शिशिर शिंदे यांनी तिसर्‍या क्रमांकाची मते घेतली असली तरी दुसर्‍या क्रमांकाच्या उमेदवाराच्या तुलनेत त्यांच्या मतांत फारसे अंतर नाही. त्याचवेळी शिल्पा सरपोतदार, शालिनी ठाकरे, श्वेता परूळकर यांना स्वतःचा चेहरा नसतानाही त्यांनी लाखाहून जास्त मते घेतली हे लक्षणीय आहे.

या निकालाचा महत्त्वाचा अन्वयार्थ हा आहे, की मराठी माणसांच्या मतांची तिजोरी आता शिवसेनेच्या मालकीची उरलेली नाहीत. तिच्यात मनसे वाटेकरी झाला आहे. मुंबई व ठाणे या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला मनसेने भगदाड पाडले आहे. मराठी माणसाच्या मतांचे वाटेकरी होण्यासाठी चालेलल्या या भांडणात सध्या तरी मनसेने बाजी मारलेली दिसते. त्याचे पुढील विधानसभा निवडणुकीत मोठे परिणाम जाणवतील यात काही शंकाच नाही.

पण मुळात मनसेला हे यश मिळण्याची कारणे काय आहेत?

उत्तर भारतीयांसाठी गालिचा
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झालेली शिवसेना हे स्टेशन सोडून देत हिंदूत्वाच्या स्टेशनात रेंगाळली आहे. राज्यसभेपासून ते अगदी नैमित्तिक राजकारणापर्यंत शिवसेनेला अमराठी लोकांची काठी हातात घ्यावी लागते. मराठी माणसांसाठी 'बजाव पुंगी हटाव लुंगी' असे म्हणत दाक्षिणात्यांविरोधात आंदोलन उभारणारी शिवसेना आता लोंढेच्या लोंढे घेऊन येणार्‍या उत्तर भारतीयांसाठी गालिचा पसरवू लागली आहे. १९९५ नंतरच्या झोपड्या अधिकृत ठरविण्याचा निर्णय घेत त्यांनी या लोंढ्यांना 'सरकारी आवताण' दिले. त्याचवेळी चाळीस लाख झोपडपट्टीवासियांसाठी घरे देण्याचे आश्वासन घेत एकीकडे बिल्डरांचे उखळ पांढरे केले आणि दुसरीकडे बिहारी, युपीच्या लोकांच्या लोंढ्यांसाठी मुंबईत रहायची सोय करून दिली.

NDND
शिवसेना मराठी माणसांची?
इथल्या मराठी माणसाला काय मिळालं? शिवसेनेच्या विस्ताराच्या काळातच मुंबईतल्या कापड गिरण्या बंद पडल्या. गिरणी कामगार देशोधडीला लागले. बिल्डरांच्या ताब्यात गेलेल्या मुंबईतला मराठी माणूस इथले रहाणे परवडत नाही, म्हणून उपनगरात आणि तिथून आणखी बाहेर फेकला गेला. या गिरण्यांच्या पुनरूज्जीवनासाठी, किमानपक्षी कामगारांना योग्य लाभ मिळावा यासाठी शिवसेनेने काही केलं नाही. मुळात मराठी माणसाच्या उत्थानासाठी शिवसेनेकडे ठोस कार्यक्रम कधीच नव्हता. त्यांच्या विकासाच्या कल्पना वडापावची गाडी टाकण्यापलीकडे कधी गेल्याच नाहीत. आजही उद्धव ठाकरे शिववडा खात खात मराठी माणसाच्या विकासाची बात करताहेत.

शिवसेना आणि आंदोलन
शिवसेनेने मराठी माणसाला 'अरे ला कारे' म्हणण्याची ताकद दिली, पण या ताकदीला विधायक वळण दिले नाही. म्हणूनच शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणजे गुंड असे काहीसे चित्र निर्माण झाले. पुढे हा कार्यकर्ताच निवडणुका लढवून नेता झाला आणि रस्त्यावरून थेट आलिशान गाडीत जाऊन बसला. ऑफिसं थाटून 'आदेश' द्यायला लागला. त्यातले काही बिल्डरही झाले. या सगळ्या संक्रमणाला सामान्य मराठी माणूस मात्र या सगळ्या अचंबित होऊन पहात होता. पण त्याच्यापुढे पर्यायही नव्हता, बाळासाहेब ठाकरे नावाच्या माणसावर विश्वास ठेवून तो इमाने इतबारे शिवसेनेला मत देत होता. पुढे नेतृत्व उद्धवकडे आल्यानंतरही त्याने संघटनेत आलेला मवाळ बदल पचवून शिवसेनेलाच मत दिले.
NDND
शिवसेनेला पर्याय मनस
पण आता मनात खदखदही जागत होती. राज यांनी ती ओळखून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाने वेगळी चूल मांडून या खदखदीलाच बाहेर काढले. आपल्या प्रगतीसाठी उत्तर भारतीयांकडे बोट दाखवत त्यांनी 'आक्रमण' असा नारा दिला. स्वतःच्या अपयशाचे खापर दुसर्‍यावर फोडण्यावर नितांत श्रद्धा असणार्‍या मराठी माणसाने आता राज ठाकरेंची कास धरली. मराठी माणसांच्या सगळ्या प्रश्नांसाठी राज ठाकरेंकडे उत्तर आहेत का? याचे उत्तरही 'नाही' असेच येईल. पण ज्या शिवसेनेने हिंदूत्वाची कास धरत सर्वसमावेशक राजकारण करून 'मराठी माणूस' हा उच्चारही बंद केलाय, त्या तुलनेत राज थेट मराठी माणसाची भाषा बोलत आहेत. त्यांच्यामुळे प्रश्न सुटत नसले तरी चर्चा होते आहे, ही बाब त्याला महत्त्वाची वाटते आहे आणि हे प्रश्न सुटतील, असा भाबडा विश्वासही वाटतो आहे. हाच विश्वास त्याने चाळीस वर्षांपूर्वी बाळासाहेबांवर दाखविला होता.

नव्या पिढीचा नवा नेता
शिवसेना स्थापन झाल्यापासून चाळीस वर्षांच्या काळात एक आख्खी पिढी संपली आहे. शिवसेनेचे नेतृत्व भलेही उद्धव ठाकरेंसारख्या तरूण चेहर्‍याकडे गेले असले तरी पक्षात मात्र मध्यमवयीन लोकांचा भरणा आहे. शिवसेना स्थापन करताना असलेली पिढी आता निवृत्तीला येऊन ठेपली आहे. त्यांच्या मुलाबाळांना उद्धव यांचे नेतृत्व राज यांच्या तुलनेत तेवढे आक्रमक वाटत नाही. उद्धव यांनी बाळासाहेबांचा आक्रमकपणा 'उधार' घेतला, असला तरी तो तरूणांना भावलेला नाही. त्या तुलनेत राज यांची आक्रमक भाषा, मराठीविषयीची स्पष्ट भूमिका, सडेतोड मुद्दे आणि या जोडीला दुसर्‍याला अंगावर घेण्याचा मूळ 'शिवसेनी' बाणा चांगलाच भावल्याचे दिसते आहे. बाळासाहेबांचा 'ट्रेडमार्क' असलेल्या या गोष्टी राजकडेही असल्या तरी त्या 'उधार' नाहीत, त्या स्वभावगत वाटतात. त्यामुळेच नवी पिढी त्यांच्याकडे झुकते आहे. या मतदानातही मराठी मतांचे झालेले विभाजन हे वयानुसार झाल्याचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. घरातली वडिलधारी मंडळी शिवसेनेला मत देत असली तरी युवावर्ग मात्र राज यांच्याकडे वळाला आहे, हे महत्त्वाचे आहे.

राज की 'बात'
NDND
लोकसभा निवडणुकीत राज यांनी शिवसेनेचे उमेदवार 'पाडण्याचा' कार्यक्रम राबविला असला तरी त्यांचे लक्ष्य मात्र विधानसभा निवडणूक आहे ही 'राज की बात' लक्षात घ्यायला हवी. मुंबई, ठाणे या पट्ट्यात विधानसभेच्या किमान पन्नासाहून अधिक जागा आहेत. या पट्ट्यात मनसे चमत्कार घडवू शकते. यावेळी पाडापाडी नव्हे तर उमेदवार निवडून आणणे हेच मनसेचे उद्दिष्ट असेल. त्यात ती यशस्वी होण्याचीही शक्यता आहे. कारण अनेक विधानसभा मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना चांगली आघाडी मिळाल्याचे दिसून आले आहे.

राजची मर्यादा
या सगळ्यांच्या बरोबरीने आणखी एक बाब लक्षात घेतली आहे. राज यांना असलेली मर्यादाही स्पष्ट झाली आहे. राज यांची झेप मुंबई, ठाणे आणि नाशिकबाहेर जास्त नाही. मराठी माणसाचा मुद्दा मुंबई ठाण्यात, नाशिकमध्ये अपील होईल, पण पूर्ण महाराष्ट्रात तो तितका भावलेला नाही. पुण्यातल्या मनसेच्या उमेदवाराला जेमतेम ७८ हजार तर औरंगाबादमध्ये १७ हजार मते मिळाली. या पलीकडे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात मनसे कितपत चालेल ही शंका आहे. तेथील तरूणांना राज भावत असले तरी तिथले स्थानिक मुद्देही वेगळे आहेत. त्यांना बरोबर आणायचे असेल, तर तिथल्या प्रश्नांना राज यांना हात घालावा लागेल.

शिवसेनेचे काय होणार?
NDND
राजचे काहीही झाले तरी शिवसेनचे मात्र पुढे कठीण आहे. शिवसेनेचा विस्तार मुंबई, ठाण्यापलीकडे विदर्भ, मराठवाड्यात जोरात होत असताना बालेकिल्ल्यात मात्र तिची कोंडी झाली आहे. बालेकिल्ला राखण्यासाठीच आता उद्धव यांना मेहनत करावी लागणार आहे. त्याचबरोबर मराठी माणसाचा खरा त्राता कोण हे सिद्ध करण्यासाठी हिरीरीने पुढे यावे लागेल. पण ते करताना हिंदूत्वाचे काय करायचे तेही ठरवावे लागेल. मराठी माणसाला हाती धरले तर मग हिंदूत्व सुटते आणि हिंदुत्व घेतले तर मराठी माणूस सुटतो, अशी शिवसेनेची स्थिती झाली आहे. शिवाय मराठी माणसासाठी उच्चरवात बोलण्याबरोबरच त्याच्यासाठी आंदोलन करण्याची शिवसेनेची क्षमताही दाखवून द्यावी लागेल. तरच मराठी माणसाचा शिवसेनेवर पुन्हा विश्वास बसू शकेल. पण हे होणे कठीणच दिसते.

थोडक्यात, आगामी निवडणुकीत राज यांना काहीही गमवायचे नाही. त्यामुळे ते टेन्शन फ्री असती, पण शिवसेना-भाजप युतीला मात्र नवे कमावण्यापेक्षा आहे ते वाचविण्यावरच भर द्यावा लागेल हे नक्की.