1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

गोदामाई कोपली (स्लाईड शो)

PRWD

रामघाट पाण्याखाली
दोन दिवसांपासून झालेली संततधार आणि गंगापूर धरणातून सोडलेला विसर्ग यामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीला महापूर आला. १९६९ मध्ये आलेल्या पुरापेक्षाही गोदेचे हे रूप भयंकर होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. रौद्ररूप धारण केलेल्या गोदेने आजूबाजूचा परिसर गिळंकृत केला. गोदेच्या या पुरामुळे धार्मिक महत्त्व असलेला पंचवटीतील रामघाटही पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. या घाटावरील सर्व मंदिरेही पाण्यात बुडाली होती. परिणामी श्राद्धादी विधी थंडावले.

WDWD

कोपलेली गोदामा
हा नाशिकचा अहिल्याबाई होळकर पूल. ब्रिटिशांनी बांधलेला. पूर्वीचा व्हिक्टोरीया ब्रिज. या पुलाच्या पलीकडेच प्रसिद्ध पंचवटी भाग आहे. या पुलाच्या खाली गोदेचे पाणी टेकले होते. शहरातील बाकीच्या जवळपास सर्व पुलांवरून पाणी वाहत होते. त्यामुळे एकटा हा पूल वाहतुकीसाठी खुला होता. या पुलावरून पुराचे रूप धडकी भरविणारे होते. तरीही नित्यवर्षाप्रमाणे नाशिककरांनी हे रूप डोळ्यात साठविण्यासाठी गर्दी केली होती.
WDWD

नारोशंकराच्या घंटेला पाणी
बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसईच्या किल्ल्यातून आणलेली घंट रामघाटावरील प्रसिद्ध नारोशंकराच्या मंदिरावर बसवलेली आहे. ही घंटाही पाण्यात बुडाली. ही घंटा पाण्यात बुडणे म्हणजे पुराचा कहर असे मानले जाते. या मंदिराच्या आसपास असलेली इतर मंदिरेही पाण्यात बुडाली होती. प्रसिद्ध कपालेश्वर मंदिराच्या पायर्‍याही पाण्यात बुडाल्या होत्या. या परिसरात राहणार्‍या साधूंनाही स्थलांतरीत व्हावे लागले.
WDWD

बुडत्याला काडीचा आधार
पुराने शहरातील रहिवासी वस्तीतही पाणी शिरले. अनेकांना घरे सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले. गंगापूर रस्ता भागात आसाराम बापू आश्रम, तसेच अनेक बंगल्यात पाणी शिरले. पुराच्या पाण्यात अडकलेली ही व्यक्ती झाडाच्या आधारे तग धरून होती.
WDWD

आयुष्याची दोरी बळकट
पाण्यात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी महापालिकेपासून अग्निशमन दलापर्यंतच्या अनेक संस्था धावून आल्या. शहरातील बोट क्लबच्या सदस्यांनीही याला हातभार लावला. बोटीद्वारे जाऊन या तरूणांनी दोरी टाकून पाण्यात अडकलेल्यांना वाचवले. त्यासाठी फेकलेल्या दोरीमुळे त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट ठरली.
WDWD

जल आक्रमिले
गोदेच्या या पुराने काठावरच्या अनेक इमारती आपल्यात सामावून घेतल्या. अनेक इमारतींचे तळमजले पाण्याने भरून गेले. या पाण्यातून मार्ग काढत मुख्य रस्त्यावर जाणे अशक्यप्राय होते. त्यामुळे त्यांनी घरात बसणेच पसंत केले. इमारतीखाली पार्क केलेल्या गाड्याही पाण्यात बुडाल्या होत्या.
सर्व छायाचित्रे- रवी जाधव, नाशिक)