मुंबईला वादळाचा धोका नाही!
मुंबईकरांना नाक मुठीत धरून शरण यायला लावणार्या फयान चक्रीवादळाने अखेर आपला रोख बदलत गुजरातच्या दिशेने आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे मुंबईवरील धोका टळला असला तरी गुजरातच्या किनारपट्टीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तयार झालेले फयान चक्रीवादळ मुंबई व कोकण किनारपट्टीच्या दिशेने आगेकुच करू लागल्यामुळे येथील नागरिक चांगलेच धास्तावले होते. दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागत वादळी हवेमुळे मोठे नुकसानही झाले. सोसाट्याच्या वार्यामुळे वीजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला. सावधगिरी म्हणून मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळा व कॉलेज दुपारी दीड नंतर तर सर्व कार्यालये दुपारी दोन वाजल्यानंतर बंद करण्याचा आदेश दिला. परिणामी कर्मचार्यांची तारांबळ होऊन रेल्वेसेवा व बससेवेवर चांगलाच ताण आला. हा ताण कमी करण्यासाठी मुंबई नागरी परिवहन सेवेच्या बेस्ट उपक्रमाने उपनगरातील रेल्वेस्टेशनांपासून शहरातील मुख्य नागरी वस्त्यांदरम्यान जादा बस सोडल्या. पावसाच्या संततधारेमुळे काही काळ विस्कळीत झालेल्या मध्य व पश्चिम उपनगरी रेल्वेसेवेने देखील लवकरच सावरत मुंबईकरांना आपले घर गाठण्यासाठी मदत करीत, लांब पल्ल्याच्या जादा लोकल गाड्या सोडल्या. मुंबईचे प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या दक्षिण मुंबई परिसरात फेरीवाले व अन्य व्यवसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवल्यामुळे एरव्ही गजबजलेल्या या परिसरात आज शुकशुकाट दिसत होता.फयान ने मात्र मुंबईकरांच्या आपतकालीन सावधानतेची चांगलीच परीक्षा बघितली. फक्त हूल देऊन त्याने आपला मोर्चा गुजरातच्या दिशेने वळवल्याने गुजरात सरकारने आपल्या आपतकालीन सेवांना सज्जतेचा इशारा दिला आहे. गेले दोन दिवस राज्यभर कोसळलेल्या पावसाने तापमान चांगलेच थंड केले असले तरी शेती व बागायतदारांचे भरपूर नुकसान झाले आहे. राज्याला आधीच अन्नटंचाई भेडसावत असताना भात, कांदा व अन्य पीकांची भरपूर हानी झाली आहे. द्राक्ष व आंबा बागायतदारांना देखील या अकाली पडलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. त्यामुळे यंदा द्राक्ष व आंब्याचे उत्पादन घटण्याची भीती शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे.