शिवसैनिकांचा 'आयबीएन लोकमत'वर हल्ला
आयबीएन ग्रुपच्या आयबीएन लोकमत या मराठी वृत्तवाहिनीच्या मुंबईतील व पुण्यातील कार्यालयांवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून, संपादक निखिल वागळे व काही कर्मचार्यांना मारहाण केली. या हल्ल्यात आयबीएनच्या कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार व सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास आयबीएनच्या मुंबईतील विक्रोळी येथे असणार्या कार्यालयात सुमारे तीस - चाळीस व्यक्तींनी प्रवेश करून कार्यालयाची मोडतोड करण्यास प्रारंभ केला. या मंडळींचा रोख आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्याकडे होता असा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. वागळे समोर येताच हल्लेखोरांनी त्यांना काही तडाखे लगावले. तसेच वागळे यांच्या डोक्यात प्लॅस्टिकची खुर्ची देखील घातली. कार्यालयातील काही कर्मचारी मधे पडल्यामुळेच वागळे यांची हल्लेखोरांच्या हातून सुटका झाली. वागळे यांच्यासह अन्य कर्मचार्यांनाही हल्लेखोरांकडून थोडासा प्रसाद मिळाला. त्यानंतर हल्लेखोर तेथून वेगाने निघून गेले. तत्पुर्वी सावरलेल्या आयबीएनच्या कर्मचार्यांनी यातील चार - पाच जणांना पकडून ठेवले. हल्लेखोर तोंडाल रूमाल लावून आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या हल्लेखोरांच्या हातात स्टील रॉड, क्रिकेटचे स्टंप, बॅट इ. साहित्य होते असेही कळते. कार्यालयाची तोडफोड करताना ही मंडळी शिवसेनाप्रमुखांचा अपमान सहन करणार नाही, शिवसेनेच्या वाटेला पुन्हा जाऊ नका असेही बोलत होती असे आयबीएनच्या कर्मचार्यांचे म्हणणे आहे. त्यावरून हा हल्ला शिवसेनेने केला असावा असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. सचिन तेंडुलकरच्या विधानावर बाळासाहेबांनी केलेल्या टिपण्णीचा परामर्श घेताना तसेच निवडणुकीतील शिवसेनेच्या पराभवाचे विश्लेषण, प्रचार या काळातही वागळे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. याआधी वागळे महानगर या मराठी वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम करीत असताना त्यांना शिवसैनिकांनी अनेकदा अशाच कारणांवरून मारहाण केली आहे. आजच्या या हल्ल्याचा समाजाच्या सर्वच स्तरांतून निषेध केला जात आहे. कुमार केतकर, अरूण साधू, राजीव खांडेकर इ. ज्येष्ठ पत्रकारांनी या हल्ल्याचा निषेध करताना, हा हल्ला पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला हल्ला असल्याचे म्हटले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असे हल्ले सातत्याने होत असून शासनाने याबाबत कडक पावले उचलावीत अशी मागणी पत्रकार संघटना व ज्येष्ठ पत्रकारांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपण जातीने या प्रकरणात लक्ष घालू असे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या हल्ल्याला भ्याड हल्ला असे संबोधताना हल्लेखोरांना योग्य ते शासन केले जाईल अशी ग्वाही दिली आहे.