सनातन हा केवळ प्रॉब्लेम नाही, तर ‘महाभयंकर’; बंदी घालण्याची भुजबळांची मागणी
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या धमकी प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सनातनवर गंभीर आरोप केलेत. धमकी आली म्हणून कर्नाटक पोलिसांनी गप्प बसू नये. धमकी आल्यावर कडक कारवाई व्हावी. सनातन हा प्रॉब्लेम नव्हे, महाभयंकर प्रॉब्लेम आहे. सनातनसारख्या संस्थांवरती बंदी घालायला हवी. तिथे जशी कारवाई झाली, तशी महाराष्ट्रातसुद्धा जिथे जिथे सनातनचे लोक असतील, अशा या संस्था असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, असंही छगन भुजबळ म्हणालेत.
विशेष म्हणजे छगन भुजबळांच्या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही उत्तर दिलंय. सनातनवर बंदी घालण्याबाबत २०१२ ला पहिल्यांदा प्रस्ताव आला. आघाडी सरकार सनातनविरोधात ठोस प्रस्ताव देऊ शकलेलं नाही. ठोस पुरावे असल्यास राज्यानं बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांकडे विधानसभेचं लक्ष वेधलं.
आदित्य ठाकरेंना धमकी आली त्याचा आम्ही निषेध करतो. मंत्र्यांना कोणी धमकी देत असेल तर त्याला ठेचलं पाहिजे. या गंभीर प्रकरणाला राजकीय करण्याचा प्रयत्न सुनील प्रभू यांनी केला. दोन प्रकरणातील आरोपी महाराष्ट्रातील होते. दोन हत्या महाराष्ट्रात झाल्या. दोन कर्नाटकात झाल्या. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या कर्नाटकात झाली. गुन्हेगार हे गुन्हेगार असतात त्याला राजकीय वळण देता कामा नये. ट्विटरवर जे ट्रेंडिग झालं. त्याची चौकशी करा माझी मागणी आहे, असं फडणवीस म्हणाले.