दीडशे वर्षांची परंपरा लाभलेला गुरुवारी श्रीराम रथोत्सव
जळगाव नगरीचे ग्रामदैवत तथा वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावचे विद्यमाने कार्तिकी प्रबोधनी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य श्रीराम रथयात्रेचे कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे. यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून जळगाव नगरी श्रीराम रथोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. या दिवशी पहाटे चार वाजता काकड आरती, प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक, सकाळी सात वाजता महाआरती, सकाळी साडेसात ते साडेआठ सांप्रदायिक परंपरेचे भजन त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता श्रीराम रथाचे महापूजन वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त, विद्यमान पंचम गादीपती हरिभक्ती परायण श्री मंगेश महाराज जोशी (श्री अप्पा महाराजांचे पाचवे वंशज) यांच्या हस्ते व शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळी यांच्या वेद मंत्र घोषात होईल.