रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (14:04 IST)

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे ‘हिंदुस्थानी भाऊ’चा हात

hindustan bhau vikas pathak
Instagram
मुंबईतल्या धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनाला तोडफोडीचं गालबोट लागलं असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं पोलिसांना जमावाला थोपण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला आहे. धारावीत दहावी, बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांचा जमाव कसा झाला? त्यांना नेमकं कुणी बोलावलं होतं? याची माहिती विद्यार्थ्यांना विचारण्यात आलं असता अनेकांनी ‘हिंदुस्थानी भाऊ’चं नाव घेतलं आहे.
 
राज्यात केवळ धारावीतच नव्हे, तर नागपूर, सातारा, कराड इतर काही ठिकाणी देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे हे नियोजन करुन आंदोलन करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. तसंच हिंदुस्थानी भाऊच्या इन्स्टाग्राम अकाऊंट देखील त्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये हिंदुस्थानी भाऊ धारावीत आंदोलनात सामील झाला होता आणि त्यानंच केलेल्या आवाहनानंतर विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणात जमा झाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
…तर आज ही वेळच आली नसती; ‘हिंदुस्थानी भाऊ’ची प्रतिक्रिया
धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं. अचानक झालेल्या गर्दीमुळे पोलिसांचीही भंबेरी उडाली. आंदोलन ठिकाणी ‘हिंदुस्थानी भाऊ’ या युट्यूब स्टारनं हजेरी लावल्यानंतर या विद्यार्थ्यांना जमा करण्यामागे त्याचा हात असल्याचं समोर आलं आहे.
 
‘हिंदुस्थानी भाऊ’नं आजच्या आंदोलनासाठी चिथावणीखोर वक्तव्य आणि आवाहन केल्याचे व्हीडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही आढळून आले आहेत. यानंतर मुंबई पोलिसांनीही याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसंच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात खुद्द ‘हिंदुस्थानी भाऊ’ची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. मी कुठल्याही पक्षाशी किंवा संघटनेशी संबंधित नसून मी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर आलो. सरकारनं जर विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती, असं म्हणत शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा आपणच दिला होता याचीही कबुली दिली आहे.
 
मुलं आज त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर आली आहेत. मी कुठल्याही पक्षाशी किंवा संघटनेशी जोडलेलो नाही. मी फक्त विद्यार्थ्यांसाठी उभा आहे. गेल्या ३ महिन्यांपासून विद्यार्थी तणावात आहेत. याबाबतचे मेसेज मला मिळाले. दोन दिवसांपूर्वी आंदोलनासाठीचं आवाहन करणारा व्हीडिओ मी टाकला होता. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. कारण सरकारनं त्याचं म्हणणं ऐकलं नाहही. त्याचं म्हणणं सरकारनं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. मी स्वत: उतरुन त्यांचा फक्त आवाज बनलो आहे. माझ्या मुलांनी कुणालाही त्रास दिलेला नाही, असं विकास पाठक ऊर्फ ‘हिंदुस्थानी भाऊ’ म्हणाला.