जयदेव जयदेव जय शिवराया । या या अनन्यशरणा आर्या ताराया॥ धृ ॥
आर्यांच्या देशावरि म्लेच्छांचा घाला । आला आला सावध हो शिवभूपाला ॥ सद्गदिता भूमाता दे तुज हाकेला । करूणारव भेदुनी तव ह्रदय न का गेला? ॥ १ ॥
श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी । दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी ॥ ती पूता भूमाता म्लेच्छांही छळता । तुजवीण शिवराया तिज कोण दुजा त्राता? ॥ २ ॥
त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलो । परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो ॥ साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया । भगवन् भगवद्गीता सार्थ कराया या ॥ ३ ॥
ऎकुनिया आर्यांचा धावा गहिवरला । करूणोक्ते स्वर्गी श्रीशिवनृपी गहिवरला ॥ देशास्तव शिवनेरी घेई देहाला ॥ देशास्तव रायगडी ठेवी देहाला देशस्वातंत्र्याचा दाता तो झाला । बोला तत्श्रीमत्शिवनृप की जय बोला ॥ ४ ॥
|