शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

आदित्य ठाकरे विधानसभेची निवडणूक लढवणार की नाहीत?

आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद. तीही त्यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर. ते काही घोषणा करतील का म्हणून पत्रकारांमध्ये चर्चा.
 
'तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवणार का?' 'तुम्ही भविष्यात शिवसेनेचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असणार का?' अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर करण्यात आली.
 
पण वडील उद्धव ठाकरेंच्या शैलीमध्ये त्यांनी या हसत हसत या प्रश्नांना बगल दिली. निवडणूक लढवण्याबद्दल 29 वर्षांचे आदित्य म्हणाले, "मी अजून त्याबद्दल विचार केला नाहीये. विचार केल्यावर सांगेन."
 
आदित्य ठाकरे विधानसभेची निवडणूक लढवतील, अशी मुंबईत जोरदार चर्चा सुरू आहे. आदित्य यांच्या या विधानामुळे ही चर्चा यापुढेही सुरूच राहणार आहे. पण ते खरंच निवडणूक लढवतील का?
 
शिवसेनेत आदित्योदय
"उद्धव व आदित्यला मी लादलेलं नाही. तुम्ही त्यांचा स्वीकार केला आहे. यापुढेही त्यांना सांभाळा, इमानाला महत्त्व द्या." थकलेल्या बाळासाहेबांचे हे शब्द ऐकून शिवाजी पार्कावर शांतता पसरली. तो दिवस होता 2012 सालच्या दसऱ्याचा.
 
बाळासाहेब इतके थकले होते की ते मेळाव्यासाठी येऊ शकले नव्हते. त्यांची रेकॉर्ड केलेली चित्रफित लावली होती. त्यानंतर महिन्याभरातच बाळासाहेबांचं निधन झालं.
 
तेव्हा आदित्य फक्त 22 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वीच (जुलै 2012) उद्धव ठाकरेंची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांची तब्येत खालावली होती. कमी वयातच तेव्हा आदित्य ठाकरेंना भविष्यातला नेता म्हणून पुढे करण्यात आलं होतं. बाळासाहेबांच्या या विधानामुळे आदित्य हेच उद्धवनंतर शिवसेनेचं नेतृत्व करतील, हे उघड होतं.
 
दोन वर्षांपूर्वीच, म्हणजे 2010 साली वयाच्या विसाव्या वर्षी आदित्य ठाकरेंनी युवासेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. एकीकडे उद्धव आणि बाळासाहेब आजारी होते तर दुसरीकडे मनसे स्थापन झाली होती आणि तरुण शिवसैनिकांना आकृष्ट करत होती. तेव्हा आदित्यच्या रूपाने तरुण चेहरा द्यायचा शिवसेनेने प्रयत्न केला.
 
आदित्य ठाकरेंनीही पुढे तरुणांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न केला. मुंबई विद्यापीठावर सत्ता मिळवली. पाठ्यपुस्तकांचे, नाईटलाईफचा, विद्यार्थ्यांच्या मार्कांचे प्रश्न अधूनमधून मांडले. राणीच्या बागेत पेंग्विन आणण्याच्या आग्रहामुळे त्यांच्या टीकाही झाली.
 
आदित्य झाले 'नेते'
2014 साली लोकसभा निवडणुकीत भाजप पूर्ण बहुमताने निवडून आली आणि युतीत बिघाडी झाली. भाजपच्या महाराष्ट्रात महत्त्वाकांक्षा वाढल्या. त्यामुळे विधानसभेआधी युती तुटली.
 
पुढची 5 वर्षं शिवसेना सत्तेत राहून विरोधकांच्या भूमिकेत होती. भाजप हुळहळू स्थानिक निवडणुकांमध्ये वाढत असताना शिवसेनेवरचा दबाव वाढत गेला.
 
याच काळात 2018 साली आदित्य ठाकरेंची शिवसेनेत नेतेपदी नेमणूक झाली. त्यांच्यावरची जबाबदारी वाढली. ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली, त्याच ठाकरे घराण्यातली तिसरी पिढी नेतेपदी पोहोचली. शिवसेनेत नेतेपद फार कमी जणांना मिळतं आणि त्याला फार महत्त्व असतं.
 
निवडणूक लढवणार की नाही?
आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आणि युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांनी 25 मेच्या दिवशी इन्स्टाग्रामवर आदित्य ठाकरे यांचा फोटो पोस्ट केला आणि लिहिलं 'हीच वेळ आहे.. हीच संधी आहे.. लक्ष्य विधानसभा २०१९ !! महाराष्ट्र वाट पाहतोय...'
 
त्या पोस्टवर युवासेनेच्या अनेक पाठीराख्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आणि निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला.
 
युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांना विचारलं असता ते म्हणाले, "आदित्य ठाकरेंनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. असा तरुण चेहरा विधानसभेत आला तर निश्चितच त्याचा शिवसेनेला फायदा होईल."
 
या प्रश्नावर शिवसेना गप्प असली तरी भाजपने तत्परतेने प्रतिक्रिया दिली.
 
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जेव्हा आदित्य ठाकरे निवडणूक लढवण्याच्या शक्यतेबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, "आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली तर स्वागतच करू."
 
दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेत मान्सून पूर्व तयारीच्या बैठकीला आदित्य ठाकरे उपस्थित होते. तेव्हाही निवडणूक लढवण्याबाबत विचारणा केली असता ते हसत म्हणाले 'सध्या राज्यातला दुष्काळ आणि मुंबईत मान्सून पूर्व तयारीच्या कामांवर लक्ष दिलं पाहिजे'. आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीबाबत बोलताना अद्याप तरी निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट केलेलं नाही.
 
ठाकरेंचा पायंडा मोडणार?
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही निवडणूक न लढण्याचा हा पायंडा कायम ठेवला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०१४ ला निवडणूक लढणार असं जाहीर करूनही शेवटच्या क्षणी शब्द मागे घेतले होते. ठाकरेंचा हा पायंडा आदित्य मोडतील?
 
पत्रकार अभय देशपांडे म्हणतात, "आदित्य यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष मैदानात यावं लागणार आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्याची गरज वाटत असावी."
 
पुढे ते म्हणतात, "छगन भुजबळ, नारायण राणे यांच्याकडून आलेल्या अनुभवामुळे ठाकरे कुटुंबाव्यतिरिक्त दुसरे मोठे सत्ता केंद्र निर्माण होणार नाही याची अलीकडच्या काळात कटाक्षाने काळजी घेतली जाते. त्यामुळे भविष्यात सरकारमधील महत्त्वाचं पद भूषवण्याची संधी आली तर ती घरातील व्यक्तीकडे असावी अशी भूमिकाही यामागे असू शकते."
 
यापूर्वी जेव्हा आदित्य ठाकरेंबद्दल उद्धव यांना विचारलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते "ठाकरे कुटुंबात आम्ही निवडणूक लढवण्याबाबत बाळासाहेबांनी आमच्यावर कोणतीही बंधनं घातली नाहीत. ते सर्वस्वी आमचे निर्णय होते."