मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (10:35 IST)

अमोल कोल्हेंनी सांगितले नथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्या मागचे कारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी WHY I KILLED GANDHI या सिनेमामध्ये नथूराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्याच पक्षातल्या जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अमोल कोल्हे यांच्या भूमिकेचा विरोध केला आहे.
 
"कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही," असं आव्हाड यांनी म्हटलंय.
 
"डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेश घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही," असं आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे.
त्याचसंदर्भात अमोल कोल्हे यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी चर्चा केली. त्याचा हा संपादित अंश.
 
प्रश्न: तुम्ही ही भूमिका का स्वीकारली?
 
उत्तर: ही भूमिका मी 2017 मध्ये केली होती. नोएडातल्या मारवाह स्ट्युडिओत 2017 मध्ये याचं शूटिंग झालं होतं. आता 5 वर्षांनंतर हा सिनेमा रिलिज होतोय.
काही भूमिका या आपण विचारधारेशी सहमत असताना करतो आणि काही भूमिका या विचारधारेशी सहमत नसताना पण आव्हानात्मक वाटतात म्हणून करतो. ही भूमिका तशीच आहे. जरी या विचारधारेशी मी पूर्णपणे सहमत नव्हतो तरी 2017 मध्ये ही भूमिका मी स्वीकारली होती.
 
प्रश्न:एवढ्या उशिरा हा सिनेमा रिलीज होत आहे?
 
उत्तर: या सिनेमाचं जेव्हा चित्रीकरण झालं तेव्हा मला असं समजलं की तेव्हा दिग्दर्शक आणि निर्मात्यांमध्ये काही तरी अंतर्गत वाद झाला होता. मी त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही.
 
आता अचानक मला हे माध्यमांमधून समजलं की हा सिनेमा येतोय. मला अनेकांनी फोन करून हे खरं आहे का, असा प्रश्न विचारला. त्यानंतर मी दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी संपर्क केला, तेव्हा त्यांनी सांगितलं की हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
 
प्रश्न:या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते कोण आहेत?
 
उत्तर: अशोक त्यागी यांनी दिग्दर्शन केलंय आणि मानदीप सिंग आणि कल्याणी सिंग याचे निर्माते आहेत. राईट इमेज एन्टरटेनमेंटच्या माध्यमातून हा सिनेमा होतोय.
प्रश्न:तुम्ही सहमत आहात का नथुरामच्या विचारांशी?
 
उत्तर: मी सोशल मीडियाच्या माध्यमातून याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मी गेली 12-14 वर्षं इंडस्ट्रीमध्ये काम करतो. मी कधीही गांधीजींच्या हत्येचं समर्थन केलेलं नाही. करणारही नाही. नथूराम गोडसेच्या उदात्तीकरणाची भूमिका मी वैयक्तिक जीवनात कधीही घेतलेली नाही.
माझी वैयक्तिक आणि वैचारिक भूमिका सुस्पष्ट आहे, त्यात कुठलाही बदल झालेला नाही.
 
प्रश्न: तुमच्या कृतीमुळे नथुरामच्या उदात्तीकरणाला मदत होते, असं तुम्हाला वाटत नाही का?
 
उत्तर: जर मी फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका केली असती तर मला अनेक जण प्रश्न विचारणारे होते की तुम्ही टाईपकास्ट होत आहात असं तुम्हाला वाटत नाही का?
 
मी एका अशा भूमिकेच्या शोधात होते जी माझी ही इमेज तोडणारी एक वेगळी इमेज करणारी एक आव्हानात्मक भामिका हवीय.
 
2017 मध्ये माझी कलाकार म्हणून असलेली गरज आणि आव्हानं पूर्णपणे वेगळी होती आणि आज कर्मधर्म संयोगानं हा सिनेमा 2022 मध्ये रिलीज होत आहे. 2017 मधली स्थिती आणि आताची स्थिती याची आता तुलना होऊ शकत नाही.
प्रश्न:भले तुम्हीही भूमिका आधी केली असेल, पण आता तुमच्यामुळे तुमचा पक्ष अडचणीत आलाय असं तुम्हाला वाटत नाही का?
 
उत्तर: मला असं वाटत नाही. कारण यामध्ये एक साधी सरळ गोष्ट आहे, की 2019 मध्ये माझ्या पक्षाला याची कल्पना असल्याचं कारणं नव्हतं. 2017 मध्ये या संदर्भात पुढे 2019 ला असं काही जाऊन घडणार आहे हे मलाही ठाऊक नव्हतं. त्यामुळे इथं पक्ष अडचणीत येण्याचा संबंधच नाही.
उलट अमोल कोल्हेंना वैयक्तिक अखत्यारीमध्ये कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून त्यांनी ही भूमिका केली जी त्यांची राजकीय भूमिका नाही. हे आपण गेल्या अडीच वर्षांत संसदेच्या सर्व कामकाजातही पाहिलं असेल.
 
प्रश्न:शरद पवार आणि सुप्रिया सुळे किंवा पक्षातल्या वरिष्ठांना याची काही कल्पना देण्यात आली होती का?
 
उत्तर: मला काल जेव्हा सिनेमाचा प्रोमो मिळाला तेव्हा मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रियाताई सुळे यांना याची कल्पना दिली. शरद पवार यांनासुद्धा याची इत्यंभूत माहिती दिली की 2017 साली मी हा सिनेमा केला आहे आज 5 वर्षांनी तो रिलीज होतोय. पवार साहेबांसमोर मी माझी भूमिका सुस्पष्टपणे मांडली आहे.
 
प्रश्न:तुम्ही नथूराम गोडसेचं समर्थन करता का?
 
उत्तर: 100 टक्के नाही. कोणत्याही हत्येचं समर्थन कधीही केलं जाऊ शकत नाही. कलाकार म्हणून माझ्याकडे एक स्क्रिप्ट आली. त्या निर्मात्यांचं म्हणणं होतं की आम्हाला हे दाखवायचं आहे, उद्या समजा की आपल्याकडून मला दुसरी स्क्रिप्ट आली की त्यात हे( नथूराम गोडसे) दोषी आहेत असं दाखवायचं असेल तर याच पद्धतीने कलाकार म्हणून मी नीर-क्षीर विवेकबुद्धीनं त्याचा भूमिका म्हणून विचार करणं, याला मी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानतो.
 
प्रश्न: म्हणजे तशा भूमिका आल्या तर त्या तुम्ही स्वीकाराल?
 
उत्तर: नक्कीच. कलाकार म्हणून असलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती म्हणून असलेलं वैचारिक स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टींचा आपण आदर केला पाहिजे.