मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 2 सप्टेंबर 2019 (13:45 IST)

बाबासाहेब भोसले: इंदिरा गांधींच्या मर्जीतले अल्पकाळासाठी मुख्यमंत्री, पण 'पर्मनंट माजी मुख्यमंत्री’ - किस्से महाराष्ट्राचे

तुषार कुलकर्णी
आमच्या पेपरकडेच काय इतर कुणाकडेच त्यांचा फोटो नव्हता. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले ही बातमी द्यायची म्हटल्यावर त्यांचा फोटो तर हवा ना? मग आम्ही माहिती संचालनालयाकडे त्यांच्या फोटोची मागणी केली. त्यांच्याकडेही तो उपलब्ध नव्हता, त्यांनी लोकराज्य मासिकातून फोटो काढला आणि सगळ्या मासिकांना पाठवला."
 
ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी सांगितलेला हा किस्सा. त्याकाळी ते औरंगाबादच्या दैनिक 'मराठवाडा'मध्ये पत्रकार होते.
 
बाबासाहेब भोसले हे व्यक्तिमत्त्वच तसं होतं. माध्यम आणि प्रसिद्धी पासून दूर राहिलेले पण नंतर आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे पत्रकारांचे आवडते नेते बनलेले भोसले यांचा प्रवास जितका संघर्षमय होता, तितकाच रंजकही.
 
कथित सिमेंट घोटाळ्यात नाव अडकल्यानंतर बॅरिस्टर ए. आर. अंतुलेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती.
 
वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्रिपदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात होते, पण 'हायकमांड' इंदिरा गांधींनी सर्वांना धक्का देत बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री केलं. 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983 या काळात त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवलं.
 
"राजकारणात 'लाईटवेट' समजले जाणारे बाबासाहेब भोसले यांचं मुख्यमंत्री होणं हा एक चमत्कारच मानला जात होता," केसरी सांगतात.
 
बाबासाहेब भोसले यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द एकच वर्षाची होती. पण त्यांनी घेतलेल्या निर्णयांपेक्षा त्यांनी केलेल्या कोट्यांमुळेच ते लोकांच्या जास्त लक्षात राहिल्याचं केसरी सांगतात.

 'नाव तर चुकलं नाही ना?'
"इंदिरा गांधी यांना साताऱ्याचे अभयसिंह राजे भोसले यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं, पण चुकून बाबासाहेब भोसले यांचं नाव त्यांनी घोषित केलं असावं, अशी चर्चा त्या काळात व्हायची," असं ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते सांगतात. बाबासाहेब भोसले यांचा सहवास लाभला, त्यातून त्यांचं व्यक्तिमत्त्व उलगडत गेलं, असं थत्ते पुढे सांगतात.
 
भोसले यांची राजकीय कारकीर्द कशी होती, ते पाहण्याआधी आपण त्यांचं सुरुवातीचं आयुष्य कसं होतं, यावर एक नजर टाकू.
 
तुरुंगात साखरपुडा झालेले 'एकमेव' नेते
बाबासाहेब भोसले यांचा जन्म 15 जानेवारी 1921 रोजी सातारा जिल्ह्यातील तारळे इथे झाला. त्यांचे वडील अनंतराव हे सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते.
 
बाबासाहेब हे अभ्यासात हुशार होते. तरुण वयातच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. 1940च्या दशकात त्यांनी सातारा, कोल्हापूर, सांगली या भागात भूमिगत राहून काम केलं.
 
ब्रिटिशांची नजर त्यांच्या कारवायांवर पडली आणि त्यांची सर्व खासगी मालमत्ता जप्त करण्यात आली. 1942 साली गांधींजींनी 'भारत छोडो'चा नारा दिला. त्याचवेळी इंग्रजांनी काँग्रेसच्या नेत्यांची धरपकड सुरू केली. बाबासाहेब भोसलेंना दीड वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला.
 
मात्र तुरुंगाचा आणि त्यांचा संबंध इथेच संपला नाही. बाबासाहेब भोसलेंचा साखरपुडा तुरुंगातच झाला होता. स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास जाधव यांची कन्या कलावती यांच्याशी त्यांचा विवाह निश्चित झाला.
 
तुळशीदास जाधव हे येरवडा तुरुंगात होते. आपल्या डोळ्यांसमोर हा साखरपुडा व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार बाबासाहेब आणि कलावती यांचा साखरपुडा तुरुंगाधिकाऱ्यांच्या निगराणीत येरवडा येथे पार पडला.
 
1945 मध्ये त्यांचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने झाला. 1947 मध्ये त्यांनी 'काँग्रेसचा इतिहास' हे पुस्तक लिहून आपल्या अभ्यासू वृत्तीची चुणूक दाखवली होती.
 
भारत स्वतंत्र झाल्यावर ते 1948 मध्ये लंडनला उच्चशिक्षणासाठी गेले. 1951 मध्ये तिथून परतल्यावर त्यांनी साताऱ्यात वकिली सुरू केली. पुढे ते उच्च न्यायालयात वकिली करू लागले.
 
स्वातंत्र्य चळवळीपासूनच ते काँग्रेसशी जोडले गेलेले होते. वकिली करत असताना काही काळ ते महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे सचिवदेखील झाले. 1980 मध्ये ते कुर्ला उपनगराच्या नेहरूनगर मतदारसंघातून आमदार बनले आणि बॅरिस्टर अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्यांची कायदा मंत्री म्हणून वर्णी लागली.
 
मुख्यमंत्री म्हणून का निवड झाली?
मुख्यमंत्री असताना बॅरिस्टर अंतुले यांचं नाव कथित सिमेंट घोटाळ्यात आलं. त्यामुळे इंदिरा गांधींच्या मर्जीत असलेल्या अंतुलेंना आपली खुर्ची नाइलाजाने सोडावी लागली. मुख्यमंत्रिपदावर मराठा मंत्री असावा, अशी इंदिरा गांधींची इच्छा होती.
 
"बाबासाहेब भोसले स्वातंत्र्य चळवळीतून आलेले होते, त्यांची प्रतिमा स्वच्छ होती, त्यांनी कधीही मुख्यमंत्रिपदासाठी किंवा कोणत्याही पदासाठी लॉबिंग केल्याचं ऐकिवात नव्हतं, ते उच्चविद्याविभूषित होते आणि उत्तम इंग्रजी बोलत असत या देखील त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या," असं थत्ते सांगतात.
 
"बाबासाहेब भोसलेंच्या नावाला कुणीच विरोध केला नाही. उलट बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या नियंत्रणात राहतील असं बहुतेक नेत्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नावाला समर्थन दिलं. अंतुलेंची इच्छादेखील हीच होती. त्यामुळे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले."
 
'असे तमाशे करू नका'
थत्ते सांगतात की भोसलेंच्या दिलखुलास स्वभावामुळे अनेकांचे गैरसमज व्हायचे आणि काही लोक त्यांना गांभीर्याने घेत नसत. काही लोकांना वाटायचं की भोसले हे विनोदवीर आहेत. ते गंमत करतात, त्यांना काय कळतं, अशी काही लोकांची धारणा होती? पण त्यांना या सर्व गोष्टी कळायच्या."
 
थत्ते आणखी एक किस्सा सांगतात, "भोसले मुख्यमंत्री झाल्यावर एक 80 वर्षांचे गृहस्थ त्यांच्याकडे आले. त्या गृहस्थांचा सहकार क्षेत्रात दबदबा होता. त्यांना विधान परिषदेची आमदारकी पाहिजे होती म्हणून ते भोसलेंना भेटायला गेले.
 
"भोसले दिसल्याबरोबर त्यांनी त्यांचे पाय धरले. तेव्हा भोसले त्यांना म्हणाले 'आज आमदारकी पाहिजे म्हणून आज तुम्ही माझे पाय धरत आहात. उद्या माझे दिवस फिरल्यावर तुम्ही माझे पाय ओढायला कमी करणार नाहीत. तेव्हा ही नाटकं करू नका आणि भविष्यात तसे तमाशे करू नका'."
 
"भोसले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना नियंत्रित करणं आपल्या डाव्या हाताचा मळ असेल, असं अंतुलेंना वाटायचं. पण ते इतकेही साधे नव्हते. 'वेश असावा बावळा, परी अंतरी नाना कळा' असं त्यांचं धोरण होतं. त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जितकी जाणीव होती, त्याहून अधिक स्वतःच्या क्षमतांची जाणीव त्यांना होती," असं थत्ते सांगतात.
 
'बंडोबा थंडोबा झाले'
अचानकपणे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या आयुष्यात सर्वकाही आलबेल होतं, असं नाही. अंतर्गत बंडाळीशी त्यांना संघर्ष करावा लागला होता. याबाबतचा एक किस्सा थत्ते सांगतात.
 
"एकदा त्यांच्याकडे शुगर लॉबीतल्या आमदारांचं शिष्टमंडळ आलं होतं. साखर उद्योगाशी निगडित असलेले हे 10-15 आमदार त्यांना म्हणाले आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. त्या आमदारांच्या बोलण्यातला अर्थ त्यांना लगेच कळला आणि ते तात्काळ म्हणाले की माझ्या बाजूने विधानसभेतील 288 पैकी 287 आमदार उभे राहिले आणि इंदिरा गांधी नसल्या तर या पाठिंब्याला काही अर्थ नाही. जर माझ्याविरोधात 287 आमदार झाले आणि इंदिरा गांधी माझ्या पाठीशी असल्या तरी या लोकांच्या बंडाला काही अर्थ उरत नाही.
 
"भोसले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याविरोधात बंड झालं होतं. पण 'हायकमांड'चा आदेश आल्यावर हे बंड थंड झालं. त्यावर भोसलेंनी प्रतिक्रिया दिली 'बंडोबा थंडोबा झाले.' तेव्हापासून आतापर्यंत कोणताही बंडखोर नेता जर शांत झाला तर हाच वाक्प्रचार वापरला जातो," थत्ते सांगतात.
 
'पोलिसांचं बंड'
भोसलेंना फक्त त्यांच्याच पक्षातील बंडखोरांचा सामना करावा लागला असं नाही. सर्वच बाजूंनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. एका बाजूला शरद पवारांसारखा विरोधी पक्षनेता, दुसऱ्या बाजूला अंतर्गत बंड, तिसऱ्या बाजूला दत्ता सामंत यांचा गिरणी कामगार संप. या सर्व आव्हानांचा त्यांना सामना करावा लागला.
 
त्याचबरोबर त्यांच्या कारकिर्दीमध्ये पोलिसांनी बंड केलं. पोलिसांनी आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी संपाचं हत्यार उपसलं. काही काळ मुंबईत अराजकतासदृश स्थिती होती. नंतर CRPFला बोलवण्यात आलं. पोलिसांचं हे बंड एकूण 48 तास चाललं होतं.
 
राज्याच्या पोलिसांनीच आपल्या शासनाविरोधात बंड करणं हे व्यवस्थेचं आणि भोसलेंचं मोठं अपयश होतं. पोलिसांचं बंड काही काळातच नियंत्रणात आणलं गेलं असं म्हटलं जरी गेलं असलं तरी मुळात असं बंड होणं, हेच यंत्रणेचं अपयश असल्याचं केसरी सांगतात.
 
'जनसामान्याच्या जिव्हाळ्याचे निर्णय'
बाबासाहेब भोसलेंची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द अल्पकाळ असली तरी त्यात संघर्ष मोठ्या प्रमाणात होता. त्यांनी घेतलेल्या निर्णयांची यादी मोठी नसली तरी काही निर्णय जनसामान्याच्या जिव्हाळ्याचे होते.
 
दहावी पर्यंतच्या मुलींनी मोफत शिक्षण देण्याचा निर्णय त्यांच्याच काळात झाला. असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक संरक्षण देणारी श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना त्यांनी सुरू केली. मासेमारांसाठी विमा योजना सुरू झाली ती त्यांच्याच कार्यकाळात.
 
स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तसेच दुष्काळ परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.
 
अमरावती विद्यापीठाला परवानगी त्यांच्याच काळात मिळाली. मात्र त्यांचं मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर तीन महिन्यांनी हे विद्यापीठ (सध्याचं संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ) सुरू झालं.
 
चंद्रपूर जिल्ह्याची निर्मिती, औरंगाबाद खंडपीठाची स्थापना, हे निर्णय त्यांच्याच काळात झाले. पंढरपूरच्या विठोबाला बडव्यांच्या 'कचाट्यातून' सोडवण्यासाठी त्यांनी पंढरपूर देवस्थान कायदा आणला.
 
मंत्रिमंडळातले नेते
भोसले यांच्या मंत्रिमंडळात अनेक तरुण चेहरे होते. विलासराव देशमुख, रजनी सातव आणि श्रीकांत जिचकार हे त्यांच्याच मंत्रिमंडळात होते. विलासराव पुढे मुख्यमंत्री झाले, श्रीकांत जिचकार यांनी त्यांच्या विद्वत्तेची भुरळ अवघ्या राज्याला घातली होती. रजनी सातव या महिला आयोगाच्या अध्यक्ष बनल्या.
 
थत्ते सांगतात, "मंत्रिमंडळात घेतल्याबद्दल विलासराव देशमुख यांनी भोसलेंचे आभार मानले. तेव्हा ते म्हणाले, 'अरे! माझे कसले आभार मानतो? तुझं नाव दिल्लीतूनच आलं होतं.' इतके ते सरळ होते. कोणत्या गोष्टीचं क्रेडिट घेण्याच्या भानगडीत ते कधी पडत नसत."
 
'दिल्लीमध्ये मन लागत नाही'
पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात, "मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचं दिल्लीला येणं जाणं असायचं. दिल्लीत आल्यावर त्यांना मानवंदना देण्यात आली होती. याची काय गरज आहे, असं ते म्हणायचे. कोणत्याही औपचारिक मानसन्मानासाठी ते आग्रही नसायचे, पण 'दिल्ली दरबारी' आपला योग्य तो आदर राखला जात नाही याची जाणीव त्यांना होती. ही गोष्ट ते खासगीत बोलून दाखवायचे. त्यामुळेच ते म्हणायचे 'दिल्ली मला gloomy (भकास) वाटतं'."
 
एकदा इंदिरा गांधींना भेटण्यासाठी भोसले दिल्लीत आले होते. एकदा ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी त्यांना विचारलं की "मॅडमची आणि तुमची 45 मिनिटं भेट झाली. इतकी काय चर्चा झाली. तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं 42 मिनिटं तर मी वेटिंग रूममध्येच होतो. पुढं ते म्हणाले, 'मी आणि मॅडमशी चर्चा? अहो! त्यांच्या नजरेला नजर भिडवणंसुद्धा शक्य नाही."
 
आधी शपथ मग हायकमांडची भेट
त्यांच्या थेट आणि दिलखुलास स्वभावामुळे ते पत्रकारांचे आवडते नेते बनले होते. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते इंदिरा गांधींना भेटायला गेले. थत्ते सांगतात, "तेव्हा अशी पद्धत होती की भावी मुख्यमंत्री आधी इंदिरा गांधींची भेट घेऊन यायचा, मग शपथ घ्यायचा. पण भोसलेंनी आधी शपथ घेतली आणि नंतर ते इंदिरा गांधींच्या भेटीला गेले. त्यावर पत्रकारांनी विचारलं 'तुम्ही असं का केलं?'"
 
"तेव्हा ते मिश्किलपणे म्हणाले, 'बाबांनो. वेळीच शपथ घेऊन टाकलेली बरी. ही काँग्रेस आहे. इथे शपथ घेतल्यानंतर राज्यपालांसमोरच्या रजिस्टरमध्ये मुख्यमंत्री म्हणून सही करण्याचा मधला वेळ असतो, त्यावेळेतही मागच्या मागे कोट ओढून माघारी बोलावले जाऊ शकते."
 
मुख्यमंत्रिपद का गेलं?
 
केसरी सांगतात, "नेत्यांच्या भाष्यापेक्षा त्यांचे निर्णय आणि कृती लक्षात राहायला हवी. भोसले यांचे विनोद, कोट्या लक्षात आहेत. पण त्यांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली कामं किती जणांच्या लक्षात आहेत?"
 
"त्यांचं भाषण उत्तम होतं, पण पक्षातल्या आमदारांवर ते नियंत्रण ठेवण्यात कमी पडले. सगळ्या घटकांना सामावून घेणं प्रसंगी त्यांच्यावर मात करणं हे त्यांना जमलं नाही. त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले," केसरी सांगतात.
 
'मी कायमचा माजी मुख्यमंत्री बनलो'
मुख्यमंत्रिपद गेल्यावरही त्यांनी केलेलं वक्तव्य अजूनही बहुतेकांच्या लक्षात आहे. "ते म्हणाले, माझं मुख्यमंत्रिपद काढून घेण्यात आलं. पण आता माझ्या नावामागे माजी मुख्यमंत्री हे पद कायमचं लागलं आहे. ते मात्र कुणीही काढून घेऊ शकत नाही," अशी आठवण थत्ते सांगतात. "ते हसत हसत मुख्यमंत्रीपदी आले आणि हसत हसत गेले," थत्ते सांगतात.
 
भोसले यांनी पुढे काँग्रेसला रामराम ठोकला आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेत प्रवेश घेतला.
 
कधी काळी 'काँग्रेसचा इतिहास' हे पुस्तक लिहिणाऱ्या भोसलेंचं नाव शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर काँग्रेसच्या इतिहासातून पुसलं गेलं.