गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

भाजप नेत्यानं एका 'दलित' कुटुंबाला मारहाण करण्यामागचं सत्य - फॅक्ट चेक

-  प्रशांत चहल
उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 37 वर्षांच्या रामू सिंह लोधी यांना गोरखपूरच्या मोठ्या रुग्णालयात नेण्याची तयारी करण्यात येत आहे.
 
त्यांच्या डोळ्याला लागलेली जखम पाहून डॉक्टरांनी त्यांना गोरखपूरला जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच रामू यांच्या दोन्ही पायांमध्ये फ्रॅक्चर असल्याचे जिल्हा रुग्णालयातील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. कृष्णकुमार यादव यांनी सांगितले.
 
10 दिवस उपचार घेतल्यानंतरही रामू यांना आपल्या पायावर उभे राहता येत नाही.
 
त्यांचे वडील झीनक लोधी (65) त्यांची शुश्रुषा करत आहेत. त्यांचे धाकटे भाऊ अनिल यांच्या पाठीवर काठ्यांमुळे आलेले नीळसर वळ अजूनही दिसतात.
 
"सिद्धार्थनगरमधील भाजपा नेते आशुतोष मिश्र यांनी दलित कुटुंबाला बेदम मारहाण केली आणि योगी सरकारच्या दबावामुळे पोलीस या नेत्याविरोधात कारवाई करत नाही," असा दावा करत लोकसभेच्या सहाव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी एका कुटुंबाचा व्हीडिओ प्रसिद्ध झाला होता. हेच ते लोधी कुटुंब होय.
 
ट्विटर आणि फेसबुकवरील अनेक ग्रुप्समध्ये हा बीभत्स व्हीडिओ शेकडोवेळा शेअर करण्यात आला होता. तो लाखोवेळा पाहिला गेला आहे.
 
बीबीसीच्या फॅक्ट चेक टीमने सिद्धार्थनगरला जाऊन या व्हीडिओची पडताळणी केली.
 
मारहाण होण्याची घटना 9 मे 2019ला झाली होती. पण सोशल मीडियावर शेअर केला जाणारा व्हीडिओ भ्रम पसरवणारा आहे. असं आम्हाला दिसून आलं.
 
हे कुटूंब दलित आहे?
ही घटना सिद्धार्थनगर जिल्ह्यातील दक्षिणेस असणाऱ्या खेसरहा ब्लॉकमधील टोला टिकुहियामधील आहे. हा भाग कपियवा गावामध्ये येतो.
 
या भागात साधारणतः 90 घरे आहेत. त्यात 3 घरांमध्ये सुतारकाम करणारे लोक राहतात. बाकी सर्व घरांमध्ये लोधी समुदायाचे (मागास वर्ग) लोक राहतात.
 
त्या भागात एकही दलित कुटुंब नसल्याचं गावातील लोकांनी सांगितलं.
 
टोला टिकुहियामध्ये प्रवेश करताच आमची भेट काही मुलांशी झाली. ही मुलं खेळताना मराठीच्या वळणाचं हिंदी बोलत होती.
 
"गेल्या पिढ्या शेजारच्या गावांमध्ये शेतीत मजुरी करून पोट भरत असत. पण तेवढ्यानं घर चालेना. रोजगारासाठी या लोकांनी दीड दशकांपूर्वी केरळ आणि महाराष्ट्रातील पुण्या-मुंबईसारख्या शहरात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची मुलं तिकडेच शिकतात," असं गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीनं सांगितलं.
 
रामू लोधी आणि त्यांचे भाऊ अनिलसुद्धा मुंबईतील बांधकामाच्या कामावर मजुरी करतात. ते दोघेही सुटीवर घरी आले होते.
 
टोला टिकुहियाला सरकारी घरकूल योजनेंतर्गत कपियवा गावातल्या नापीक जमिनीवर वसवण्यात आलं होतं. पण या गावात एकही पक्का रस्ता नव्हता.
 
काही दिवसांपूर्वीच गावात विटांचा रस्ता तयार करण्यात आला, या रस्त्यामुळेच गावात हिंसा झाली आणि हा वाद निर्माण झाला.
 
भांडण कसं सुरू झालं?
9 मे रोजी झालेली घटना आठवून रामू लोधी सांगतात, "आम्ही आमचा लहान भाऊ विजयच्या लग्नासाठी मुंबईवरून आलो होतो. 12 मे रोजी त्याचं लग्न होतं."
 
मारहाणीची ही घटना 9 मे रोजी सकाळी 8.30 नंतरची आहे. गावात विटांचा रस्ता तयार करणं सुरू होतं. आमच्या घरासमोरच्या झोपडीचा 2 फूट हिस्सा रस्त्यामध्ये जात होता.
 
गवताचं छप्पर घातलेली ही झोपडी आम्ही पाहुण्यांसाठी बांधली होती. पण गावचे प्रमुख बबलू मिश्र यांनी ती झोपडी हटवण्याचा आग्रह केला. पण लग्न पार पडेपर्यंत आम्हाला वेळ मिळू शकतो का यावर चर्चा सुरू होती. पण तितक्यात काही लोकांनी येऊन छप्पर कापायला सुरूवात केली.
 
मुंबईत शिकणारा रामू यांचा 17 वर्षांचा मुलगा विशालने या सगळ्या घटनेचं मोबाइल चित्रिकरण सुरू केलं.
 
त्याने केलेल्या व्हीडिओमध्ये छप्पर कापण्यावरून चाललेली चर्चा चांगलीच पेटलेली दिसून येते.
 
रामूच्या घरातील महिला गर्दीला उद्देशून बोलू लागतात तेव्हाच गावाचे प्रमुख देशी पिस्तुल अनिल लोधीच्या दिशेने रोखतात व त्यांना शिव्या देत असल्याचं व्हीडिओमध्ये दिसून येतं.
 
28 वर्षांचे अनिल सांगतात, बबूल मिश्रने पिस्तुल काढल्यावर त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांनी आम्हाला मारायला सुरूवात केली. त्यांनी माझ्या भावाला घरातून बाहेर ओढून जवळच्या शेतीत नेलं आणि विजेच्या खांबाला बांधून मारहाण सुरू केली.
 
या गावात राहाणारे 55 वर्षे वयाचे इंद्रजीत सिंह म्हणतात, "रस्त्याच्या बाबतीत सगळं गाव एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला रामू लोधीचं कुटुंब होतं. त्यांनी बेकायदेशीररीत्या जमीन बळकावली होती. त्यांना ती रिकामी करून द्यायला सांगितल्यावर त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
 
गावातील 17 लोकांना पोलिसांनी हिंसेच्या घटनेमुळे ताकीद दिली आहे. त्यात इंद्रजीत सिंह यांचंही नाव आहे. रामू आणि त्याच्या कुटुंबीयांना मारण्यात गावातले लोक सहभागी होते असं ते म्हणतात.
 
चेहरा आणि हाताला लागलेल्या जखमा दाखवत रामू यांची आई सांगते, "आम्ही हात जोडून फक्त तीन दिवसांचा अवधी तर मागितला होता."
 
उत्तर प्रदेश पोलिसांनी काय केलं?
खेसरहा ब्लॉकचे ठाणेप्रमुख विजय दुबे या घटनेचे तपास अधिकारी आहेत.
 
डायल-100 वरून स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती असं ते सांगतात.
 
एमएलसी रिपोर्टनुसार बीबीसीला सांगितलं की, रामू यांच्या शरीरावर डॉक्टरांना आठ ठिकाणी जखमांच्या खुणा सापडल्या होत्या. पण त्यांच्या डोळ्यांची जखम गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
विजय दुबे सांगतात, "पीडित कुटुंबाने केलेल्या तक्रारीनुसार मोहनलाल, सोनू, दयाराम यांना ताब्यात घेतलं आहे. दोन इतर आरोपी म्हणजे गावाचे प्रमुख बबलू मिश्र आणि सोहन यांना स्थानिक पोलिसांनी वॉन्टेड यादीत ठेवले आहे."
 
सर्व आरोपींविरोधात घेराव घालून मारणं, मारण्याची धमकी देणं अशा प्रकारचे सहा आरोपांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
पण पोलिसांना या पिस्तुलाच्या व्हीडिओची माहिती नाही का? तसेच टोला टिकुहियापासून फक्त 5 किमी अंतरावरती घोसियारी बाजारमध्ये राहाणाऱ्या बबलू मिश्रला घटनेनंतर 11 दिवसांनी पोलीस ताब्यात का घेऊ शकले नाहीत? स्थानिक पोलिसांनी या प्रश्नांचं कोणतंही स्पष्ट उत्तर आम्हाला दिलं नाही.
 
वॉटेन्ड बबलू कोठे आहे?
आमच्या पडताळणीत बबलू मिश्र ज्या गावात रस्त्याचं काम करत होते त्या गावाचे प्रधान (सरपंच) नसल्याचंच दिसून आलं.
 
कपियवाँ आणि टोला टिकुहियाँ गावाच्या प्रमुख संगीता मिश्र आहेत. संगीता मिश्र या बबलू यांच्या वहिनी आहेत. पण त्यांचं नाव टोला टिकुहियामध्ये कोणालाही माहिती नाही.
 
बबलू मिश्र शेजारच्या एका गावचे प्रमुख आहेत आणि त्यांचे धाकटे भाऊ आशुतोष मिश्र आणखी एका वेगळ्या गावाचे प्रमुख आहेत.
 
या दोन्ही भावांची आम्ही घोसियारी बाजाराजवळील त्यांच्या घरामध्ये आम्ही भेट घेतली.
 
बबलू मिश्र यांच्या मतानुसार त्यांच्या कुटुंबाने चार ग्रामसभांच्या प्रमुखपदाची निवडणूक लढवली होती. त्यातील तीन जागांवर त्यांचा विजय झाला.
 
टोला टिकुगियाच्या घटनेला दोन भावांमधील राजकारणानं प्रेरित घटना म्हटलं जात आहे आणि रामू यांचं कुटूंब ढोंग करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
स्थानीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्षपद भूषवलेल्या आशुतोष मिश्रने रामूला गंभीर जखमा झाल्या आहेत हे स्वीकारण्यास नकार दिला.
 
बबलू मिश्र यांच्या हाताच्या बोटाला पट्टी बांधण्यात आली आहे. भांडणात पडून वाचवण्याच्या प्रयत्नात ही जखम झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच रामू लोधीला झालेल्या जखमा छप्पर कोसळल्यामुळं झाल्याचं त्यांनी सांगितलं.
 
तुम्ही पिस्तुल रोखलेला दाखवणारा एक व्हीडिओ व्हॉटसअॅपवर सर्क्युलेट होत असल्याचं आम्ही बबलू मिश्र यांना सांगितलं.
 
तर ते हळूच हसून म्हणाले, रामूने घाबरवण्यासाठी पिस्तुल काढलं होतं, पण गावकऱ्यांनी ते हिसकावून घेतलं आणि गावाचा प्रमुख म्हणून ते माझ्या हातात दिलं होतं. पण ते पिस्तुल माझं नव्हतं.
 
आरोपींचा भाजपशी काय संबंध आहे?
सोशल मीडियावर रामू लोधीच्या कुटुंबाचा जो व्हीडिओ पसरला आहे त्याबरोबर भाजपा नेते आशुतोष मिश्राने मारहाण केली असा दावा करण्यात आला आहे.
 
गावाचे प्रधान आशुतोष मिश्र यांना स्थानिक पातळीवर लोक भाजपाचे नेते म्हणून ओळखतात. टोला टिकुहियाचे सर्व लोक असंच समजतात.
 
जिल्हा पंचायतीची निवडणूक आपण भाजपाच्या पाठिंब्यानं लढली होती मात्र आपण त्या निवडणुकीत पराभूत झालो असं आशुतोष सांगतात.
 
या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सिद्धार्थनगर भाजपा जिल्हाध्यक्ष लालजी त्रिपाठी यांच्याशी चर्चा केली.
 
ते म्हणाले, जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांमध्ये कोणताही राजकीय पक्ष चिन्ह जारी करत नाही. तसेच आशुतोष मिश्र नावचा कोणताही माणूस भाजपच्या कोणत्याही जबाबदारीच्या पदावर नाही.
 
व्हीडिओला चुकीचा संदर्भ कोणी दिला?
 
पीडित कुटुंब दलित नसून तर मागास वर्गातील असल्याचं आमच्या पडताळणीत दिसून आलं.
 
ज्या गावप्रमुखाचं नाव या घटनेत येत आहे, त्यांचा आणि त्यांच्या भावाचा भाजपशी कोणताही अधिकृत संबंध आढळला नाही.
 
सिद्धार्थनगर लोकसभा मतदारसंघात 12 मे रोजी मतदान झालं. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार ही घटना 9 मे म्हणजे प्रत्यक्ष घटनेच्या बरीच आधी हा व्हीडिओ सर्क्युलेट झाली होती. ठाणेप्रमुख विजय दुबे यांच्यामते एका स्थानिक घटनेला चुकीच्या पद्धतीने राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. रामूची तब्येत सुधारली नाही आणि ते मजूरी करण्याच्या लायक राहिले नाही तर कुटुंबाचं काय होईल अशी चिंता झीनक सिंह लोधी यांना वाटत आहे.