शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 12 जानेवारी 2021 (22:09 IST)

बर्ड फ्लू : तुमच्या मनातील 'या' 5 प्रश्नांना तज्ज्ञांची सविस्तर उत्तरं

पशुसंवर्धन आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणीत 843 मृत कोंबड्या, ठाण्यात बगळे आणि इतर पक्षी मिळून 15, रत्नागिरीत 9 कावळे यांचे अहवाल एच5एन1 आणि बीडमधल्या 11 कावळ्यांचा अहवाल एच5एन8 असा आला आहे.
राज्यासह देशात मोठ्या संख्येने पक्ष्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात सामान्य जनतेच्या मनातही अनेक प्रश्न आहेत.
या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांची आम्ही मुलाखत घेतली. पाहूयात ते काय म्हणाले,
1. बर्ड-फ्लूचा शिरकाव महाराष्ट्रात झाला आहे. तेव्हा चिकन आणि अंडी खाणं बंद करायचं का?
उत्तर: चिकन आणि अंडी खाण्यास काहीही हरकत नाही. आपल्या खाद्यसंस्कृतीनुसार चिकन किंवा अंडी पूर्ण शिजवल्याशिवाय खाऊ नका. कोणताही विषाणू 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत उकळव्यानंतर जिवंत राहत नाही. बर्ड फ्लूचा विषाणू साधारण 70-80 डिग्री सेल्सिअसपर्यंत मरून जातो. त्यामुळे अंडी, चिकन खाणं बंद करण्याची गरज नाही.
दरवर्षी भारताच्या कुठल्या ना कुठल्या राज्यात हा रोग पसरतो आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या माध्यमातून त्याचा प्रादुर्भाव इतरत्र होतो. पॉल्ट्री फार्म व्यावसायिक 2006 नंतर जागरूक झाले आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूच्या दृष्टीने सर्व उपाययोजना त्यांच्याकडे केलेल्या असतात.
2. बर्ड फ्लूची लागण माणसांना होऊ शकते का?
उत्तर: बर्ड फ्लू माणसाला होणं दुर्मीळ आहे. त्यासाठी या विषाणूमध्ये जनुकीय बदल व्हावे लागतील. ज्याला आम्ही म्युटेशन म्हणतो. म्युटेशन झाल्यानंतर जनुकीय बदल घडलेला विषाणू असेल त्याचे भाकीत करणे कठीण आहे.

डिसेंबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 2006-2020 पर्यंत जगभरातील 40-45 लोकांना बर्ड फ्लूची बाधा झाली आहे. भारतात आतापर्यंत एकालाही बर्ड फ्लूचा संसर्ग झालेला नाही.
पण माणसांना बर्ड फ्लू होणारच नाही असे मी म्हणणार नाही. पण माणसांमध्ये याचा संसर्ग होणं अतिशय दुर्मीळ आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही असे मला वाटते.
2. कुक्कुटपालन किंवा पॉल्ट्रि फार्मच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना बर्ड फ्लूची लागण होण्याची शक्यता अधिक आहे का?
उत्तर: पॉल्ट्री शेतकऱ्यांनी बर्ड फ्लूचा शिरकाव आपल्या राज्यात झाल्यानंतर त्याची काळजी घेणं गरजेचे आहे. कावळे, घुबड, घारी अशा पक्ष्यांना हा संसर्ग सर्वात आधी होतो. त्यांच्या स्थलांतरानंतर बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव कोंबडी आणि बगळ्यांमध्ये दिसतो. पण हा संसर्ग मोकळ्या ठिकाणी झाला आहे. पॉल्ट्री फार्म किंवा युनीट्स आहेत तिथे झालेला हा संसर्ग झाल्याचे दिसून येत नाही.
केवळ पॉल्ट्री फार्म, शेड, युनीटमध्ये काम करतात त्यांनी काळजी घ्यावी. मास्क वापरणे, हँड ग्लोव्ह्स घालणे गरजेचे आहे.
3. पाळीव पक्षी किंवा प्राण्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ शकतो का?
उत्तर: सोर्स ऑफ इनफेक्शन म्हणजे ज्या स्थलांतरित पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झालेली आहे अशा पक्ष्यांच्या जवळ पाळीव प्राणी गेले नाहीत तर त्यांना संसर्ग होण्याचा धोका नाही.
स्थलांतरित पक्ष्यांच्या संपर्कात पाळीव पक्षी किंवा प्राणी गेले तरच त्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.
4. बर्ड फ्लूची लागण माणसांना झाली तर उपचार आहेत का? ते काय आहेत?
उत्तर: हा फ्लू माणसांना होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे लक्षणं आणि उपचार याबाबत आपण अधिक बोलणं योग्य नाही. पण हा फ्लू आहे त्यामुळे फ्लूमध्ये जी लक्षणं असतात तीच दिसून येतात. पण याबाबत काळजी करण्याची गरज नाही असे मला वाटते.