testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या केमिस्ट्रीवर लक्ष, टीम इंडिया कॅरेबियन बेटांवर डंका पिटणार?

Last Modified शनिवार, 3 ऑगस्ट 2019 (10:57 IST)
पराग फाटक
वर्ल्ड कपचं जेतेपद दुरावल्याची खंत बाजूला सारत टीम इंडिया आता कॅरेबियन आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाली आहे.
कसा आहे दौरा
टीम इंडिया या दौऱ्यात ३ ट्वेन्टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट खेळणार आहे. छोटेखानी दौऱ्यातील २ टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपचा भाग असतील. या दौऱ्यातील पहिले दोन ट्वेन्टी-20 सामने लॉडरहिल, अमेरिका इथे होणार आहेत. मियामीमध्ये लॉडरहिल इथेच तीन वर्षांपूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ट्वेन्टी-20 मालिका झाली होती.

पहिल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने थरारक लढतीत एका धावेने विजय मिळवला होता. वेस्ट इंडिजने इव्हिन लुईसच्या शतकाच्या बळावर 245 धावांची मजल मारली.
जॉन्सन चार्ल्सने 79 धावा करत त्याला चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाने 244 धावा केल्या. लोकेश राहुलने 84 चेंडूत 12 चौकार आणि 5 षटकारासह 110 धावांची तडाखेबंद खेळी केली होती. रोहित शर्माने 62 धावा केल्या होत्या.

कोहली-रोहित कथित वाद
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात बेबनाव झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीनं अशा कोणत्याही वृत्ताचं खंडन केलं. असं काहीही घडलेलं नसून, खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. यात काहीही तथ्य नाही असं कोहलीने स्पष्ट केलं.

रोहित शर्माने यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. वेस्ट इंडिज दौऱ्यात विराट आणि रोहितच्या केमिस्ट्रीवर सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. रोहित वनडे आणि ट्वेन्टी-20च्या बरोबरीने टेस्ट संघातही आहे. त्यामुळे संपूर्ण दौऱ्यादरम्यान रोहित-विराट एकत्र असतील.
कोहलीकडेच नेतृत्व
टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने खेळत असल्याने विराट कोहलीला या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात येईल अशी चर्चा होती. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर चित्र बदललं. निवडसमितीने विराट कोहलीकडेच नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला.

ट्वेन्टी-२० संघ कसा आहे?
वर्ल्ड कपदरम्यान हाताला झालेल्या दुखापतीतून सावरलेला शिखर धवनने ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन केलं आहे. दीपक चहर आणि राहुल चहर ही भावाभावांची जोडी एकत्र खेळताना दिसू शकते.
मुंबईकर श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. वर्ल्ड कप संघात संधी न मिळालेले मनीष पांडे आणि खलील अहमद अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि कृणाल पंड्या ट्वेन्टी-२० संघात स्थान पक्कं करण्यासाठी आतूर आहेत. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हा नवा चेहरा संघात आहे.

वनडे संघात काय बदल?
वर्ल्ड कपसाठीच्या संघात बरेच बदल झाले आहेत. निवृत्तीच्या चर्चा रंगत असताना महेंद्रसिंग धोनीने लष्करी सेवेसाठी जात असल्याने संघनिवडीसाठी विचार होऊ नये असं स्पष्ट केलं.
त्यामुळे ऋषभ पंतवर बॅट्समन आणि कीपर अशी दुहेरी जबाबदारी असेल. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आल्याने वनडे संघात खलील अहमद आणि नवदीप सैनी यांनी संधी देण्यात आली आहे.

दिनेश कार्तिक, विजय शंकर यांना डच्चू देण्यात आला असून त्यांच्या जागी श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांना निवडण्यात आलं आहे. केदार जाधवने संघातलं स्थान टिकवलं आहे.

टेस्टचं नवं आव्हान
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा या दोन टेस्ट भाग असल्याने टीम इंडियाला काळजीपूर्वक खेळावं लागेल. मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल यांच्यावर सलामीची भिस्त आहे.
विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे मधली फळी सांभाळतील. रोहित शर्माची टेस्ट संघात निवड होणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

वृद्धिमान साहाचं प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन झालं आहे. साहा आणि ऋषभ पंत यांच्यात चुरस आहे. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव ही वेगवान चौकडी आहे. रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा फिरकीचा भार हाताळतील.
कोचिंग टीमची शेवटची परीक्षा
रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफसाठी ही शेवटची असाइमेंट असणार आहे. रवी शास्त्री यांच्यासह टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील अनेकांचे करार संपले आहेत.

मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफला ४५ दिवसांचं एक्स्टेंन्शन दिलं आहे. कोचपदी कायम राहण्यासाठी शास्त्री उत्सुक आहेत.

आंद्रे रसेलची अनुपस्थिती वेस्ट इंडिजला जाणवणार
अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल दुखापतीमुळे ट्वेन्टी-20 मालिकेत खेळू शकणार नाही. त्याची अनुपस्थिती वेस्ट इंडिजला जाणवेल. त्याच्या जागी जेसन मोहम्मदला संधी देण्यात आली आहे.

कार्लोस ब्रेथवेट ट्वेन्टी-20 संघाचा कर्णधार आहे. कीरेन पोलार्ड आणि सुनील नरिन हे प्रमुख आकर्षण असणार आहेत.

अँथनी ब्रँबल, जॉन कॅम्पबेल, खॅरी पिअर हे नवे चेहरे आहेत. शिमोरन हेटमेयर, निकोलस पूरन, एविन लुईस या त्रिकुटाकडून जोरदार फटकेबाजी अपेक्षित आहे.
वनडे संघात धडाकेबाज ख्रिस गेल आहे. वर्ल्ड कपनंतर गेल निवृत्ती घेणार अशी चर्चा होती. मात्र तसं झालं नाही. जेसन होल्डर, शेल्डॉन कॉर्ट्रेल, केमार रोच, ओशाने थॉमस, कीमो पॉल यांच्याकडून वेस्ट इंडिजला मोठ्या अपेक्षा आहेत.

टीम इंडियाची कॅरेबियनमधली वनडेतली कामगिरी
मॅचेस - ३६

विजय - १४

पराभव - २०

रद्द - २

सीरिज -९ , विजय - ५ , हार - ४
........................................

टीम इंडियाची कॅरेबियनमधली ट्वेन्टी-२० कामगिरी
मॅचेस - ३

विजय - १

पराभव - २

सीरिज - ३, विजय - १ , हार - १ , तटस्थ- १

.....................................

टीम इंडियाची कॅरेबियनमधली टेस्ट कामगिरी
मॅचेस - ४९

विजय - ७

पराभव - १६

ड्रॉ - २६

सीरिज - ११ , विजय - ४ , पराभव - ७
टीम इंडियाची लॉडरहिल, अमेरिका इथली कामगिरी
मॅचेस - 2

विजय - 0

हार - 1

रद्द - 1

यावर अधिक वाचा :

तुम्हाला चांद्रयान २ चे चंद्रावरील लँडिंग पंतप्रधान नरेंद्र ...

national news
तुम्हाला चांद्रयान २ चे चंद्रावरील लँडिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पाहता येणार पण कसे ...

मोबाईल कंपन्याचा तुम्हाला त्रास तुम्ही करा या प्रकारे ट्राय ...

national news
सध्या मोबाईलवरील कॉल ड्रॉपची समस्या अनेकांच्वाया डोक्ढयाला ताप बनली आहे. अनेकदा दिवसभरात ...

भारतीय पोस्टाकडून ई ट्रेडिंग सुरू

national news
आता भारतीय पोस्टानेही ई ट्रेडिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन आणि ...

व्हॉटसअॅपचे नवे फीचर, मेसेज कितीवेळा फॉरवर्ड करण्यात आला ते ...

national news
व्हॉटसअॅपने एक नवं फीचर लाँच केलं आहे. ‘Frequently forwarded’ असं या नव्या फीचरचं नाव ...

CCD : उत्तराधिकारी आता कोण... की कंपनी विकली जाणार?

national news
व्ही. जी. सिद्धार्थ हेगडे यांच्या मृत्यूनंतर आता कॅफे कॉफी डे (सीसीडी)च्या भविष्याबद्दल ...