शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (10:34 IST)

चिदंबरम यांची अटक टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव, काँग्रेसकडून बचाव

मीडिया कंपनी आयएनएक्समधील गैरव्यवहारप्रकरणी आरोपी म्हणून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (20 ऑगस्ट) दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला.
 
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मात्र ट्वीट करून चिदंबरम यांच्या पाठिशी उभं असल्याचं म्हटलं आहे. चिंदबरम सरकारबाबत नेहमी खरं बोलतात, त्यामुळे त्यांना हा त्रास दिला जात असल्याचं प्रियांका गांधी यांनी म्हटलंय.
 
पी. चिदंबरम यांना सीबीआयने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावल्यानंतर चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
 
दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडिया प्रकरणात मंगळवारी चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरम यांच्या दिल्ली येथील घराबाहेर नोटीस लावली. त्यामध्ये लिहिलं आहे की ही नोटीस मिळाल्यानंतर पुढच्या दोन तासांत चिदंबरम यांनी चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर व्हावं.
 
सीबीआयनं दिलेल्या नोटिशीवर चिदंबरम यांचे वकील अर्शदीप खुराणा यांनी म्हटलंय की, "माझे अशील चिदंबरम यांना दोन तासांत हजर राहण्याचे आदेश कायद्यातील कोणत्या कलमानुसार दिले आहेत हे या नोटिशीत नमूद करण्यात आलेलं नाही. त्यामुळे माझे अशील कायद्यानं दिलेल्या आपल्या अधिकाराचा वापर करत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागत आहेत."
 
खुराणा पुढे म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं त्यांच्या विशेष याचिकेची दखल घेण्यास परवानगी दिली असून आज सकाळी 10.30 पर्यंत त्यावर सुनावणी होईल. तोपर्यंत माझ्या अशिलांवर कोणतीही जबरदस्ती न करता सकाळी 10.30 पर्यंत न्यायालयातील सुनावणीची वाट पाहावी अशी विनंती मी करतो."
 
आयएनएक्स मीडिया खटल्यात चिदंबरम आरोपी आहेत. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी जामिनासाठी चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 
मनी लॉन्ड्रिंगप्रकरणीही चिदंबरम यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. त्याची चौकशी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय करत आहेत.
 
उच्च न्यायालयाने चिदंबरम यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता बळावली आहे. अटक रोखण्यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे
नेमकं काय आहे प्रकरण?
पी. चिदंबरम हे अर्थमंत्री असताना INX मीडियामध्ये 300 कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीचं हे प्रकरण आहे. Foreign Investment Promotion Board (FIPB) ने मर्यादेपेक्षा अधिक परदेशी गुंतवणूक स्वीकारण्यासाठी INX मीडियाला मिळालेल्या मंजुरीत अनियमिततेचा आरोप लावला होता.
 
त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate अर्थात ED) कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध एक केस दाखल केली होती. या केसमध्ये कार्ती चिदंबरम यांनी लाच घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
 
INX मीडियाद्वारे कथित बेकायदेशीर रक्कम वळवल्याच्या माहितीच्या आधारे CBI ने कार्ती चिदंबरम आणि इतर काही जणांवर एक स्वतंत्र केस दाखल केली आहे.
 
CBIने पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मीडिया फर्मवरील कर चौकशीला रद्द करण्यासाठी कथितरित्या रक्कम घेतल्याच्या प्रकरणात चार शहरांमध्ये चिदंबरम यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे मारले होते. या आधीही CBIनं अनेकवेळा कार्ती चिदंबरम यांची चौकशी केलेली आहे.
 
याशिवाय सप्टेंबर 2017मध्ये EDनं कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नईतल्या संपत्तींवर टाच आणली होती.
 
भारतीय माध्यमांनुसार चौकशीदरम्यान EDला माहिती मिळाली की, 2G घोटाळ्यातल्या एअरसेल मॅक्सिस प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या कार्यकाळात FIPBच्या मंजुऱ्याही मिळालेल्या आहेत. याचबरोबर कार्ती आणि पी. चिदंबरम यांच्या भाचीच्या कंपनीला मॅक्सिस ग्रूपकडून लाच मिळाल्याची माहितीही ED ला मिळाली होती.
 
माध्यमांमधल्या वृत्तांनुसार, एअरसेल-मॅक्सिस करारामध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भूमिकेचाही तपास CBI करत आहे.
 
2006 मध्ये मलेशियन कंपनी मॅक्सिसद्वारे एअरसेलमध्ये 100 टक्के भागीदारी मिळवण्यासाठी मंजुरी देण्याच्या प्रकरणात चिदंबरम यांच्यावर अनियमततेचे आरोपही लावण्यात आले आहेत.
 
पण पी. चिदंबरम यांनी नेहमी त्यांच्यावर आणि मुलावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्यावरचे सगळे आरोप राजकीय हेतून लावण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
पैसा मागितल्याचा आरोप
पी. चिदंबरम यांच्याबरोबरीने त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरोधातही आरोप आहेत. आयएनएक्स कंपनीविरोधातील चौकशी प्रकरण थांबवण्यात यावं यासाठी कार्ती यांनी 10 लाख डॉलरचा प्रस्ताव ठेवला होता.
 
आयएनएक्स मीडिया कंपनीच्या माजी संचालक इंद्राणी मुखर्जी यांनी कार्ती यांनी आपल्याकडे पैसे मागितल्याचा आरोप सीबीआय चौकशीदरम्यान केला होता.
 
दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलात हा सौदा झाल्याचं तपास करणाऱ्या संघटनेचं अर्थात सीबीआयचं म्हणणं आहे.
 
दरम्यान इंद्राणी मुखर्जी या त्यांची मुलगी शीना बोरा हत्या प्रकरणी तुरुंगात आहेत.