बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जून 2020 (21:25 IST)

कोरोना लॉकडाऊनचे किस्से : नवरा ऑफिसच्या व्हीडिओ कॉलवर होता, मी त्याच्यासमोर टॉप काढला, पण मागे आरसा होता

लॉकडाऊनमुळे घरात बंद असताना प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य बदललं होतं. यादरम्यान प्रत्येकाच्या आयुष्यात अशाही काही गोष्टी घडल्या, ज्या पूर्णपणे अनपेक्षित होत्या.
 
हे किस्से आयुष्यभर आठवणीत राहणार आहेत. यातल्या काही गोष्टी आपण इतरांना सांगू शकतो, तर काही गोष्टी दुसऱ्यांना सांगण्याची बिलकुल सोय नाही.
 
असेच किस्से जाणून घेण्यासाठी बीबीसीने लोकांना लॉकडाऊनमधली आपली आगळीवेगळी कहाणी पाठवण्यास सांगितलं होतं.
 
लोकांनीही याला प्रतिसाद देताना आपल्या रंजक गोष्टी आम्हाला पाठवल्या. आता हे किस्से तुम्हाला सांगितलं नाही तर कसं चालेल?
 
यासाठी आम्ही सहा किस्से तुम्हाला सांगण्यासाठी निवडल्या आहेत. हे किस्से ऐकून एक तर तुम्ही खळखळून हसाल किंवा कपाळावर हात तरी नक्की मारून घ्याल. पण या गोष्टी तुम्हाला सांगताना वाचकांची ओळख लपवली आहे बरं का...
 
"कामासाठीचं प्रेझेंटेशन मुलाचं होमवर्क म्हणून पाठवलं"
मी कामासाठी बनवलेली एक प्रेझेंटेशन माझ्या मुलाचं होमवर्क म्हणून सबमिट केलं. माझा मुलगा आपलं होमवर्क करायला विसरला होता. पण मी सबमिट केलेल्या 'होमवर्क'साठी त्याचं खूप कौतुक झालं.
 
माझा मुलगा नववीच्या वर्गात शिकतो. त्याला त्याचं होम-वर्क करायचं होतं. साधारणपणे मी त्याची मदत करतो. पण एके दिवशी तो होमवर्क करायला विसरला होता. मी त्या दिवशी इतर कामांमध्ये बिझी होतो. त्यामुळे मुलाने शेवटपर्यंत त्याची प्रेझेंटेशन बनवले नव्हते.
 
मी विद्यार्थ्यांना आयटी शिकवतो. त्यामुळे मी त्यांच्यासाठी बनवलेलं एक प्रेझेंटेशन मुलाला दिलं. अशा प्रकारचं दुसरं प्रेझेंटेशन बनव, असं मी त्याला सांगितलं. पण त्याने त्यात काहीच बदल केले नाहीत, फक्त बाहेरचं नाव बदलून प्रेझेंटेशन सबमिट करून टाकलं.
 
त्यांचे शिक्षक प्रेझेंटेशन पाहून प्रचंड खुश झाले. अशा प्रकारचं प्रेझेंटेशन कोणत्याच विद्यार्थ्याकडून पाहिलं नसल्याचं ते म्हणाले.
 
त्याला या होमवर्कसाठी पैकीच्या पैकी गुण देण्यात आले. शाळेच्या बातमीपत्रातही त्याचा उल्लेख करण्यात आला. पण याबाबत माझ्या मनात अपराधीभाव आहे. पण आता माझी खरी गोची झाली आहे. आता मला त्याच्या होमवर्कसाठी आणखी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. शाळेत कौतुक झाल्यामुळे माझा मुलगा मात्र खुश आहे. पहिल्यांदाच मी असं काही केलं होतं. पण पुढे असं काही नक्कीच करणार नाही.
 
"सासूसाठी आणलेलं सामान निर्जंतुकीकरण न करता दिलं"
मी माझ्यासाठी आणि माझ्या सासूसाठी काही किराणा सामानाची डिलिव्हरी घरपोच मागवली होती. सामान आल्यानंतर मी माझं सामान निर्जंतुकीकरण करून तर घेतलं. पण सासूसाठीचं सामान निर्जंतुकीकरण न करताच त्यांना दिलं.
 
सध्या प्रत्येक वस्तू व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावं लागतं. हे कधीकधी कंटाळवाणं वाटतं. त्यामुळेच मी सासूसाठी आणलेलं सामान स्वच्छ न करता सरळ पिशवीत टाकून त्यांच्याकडे देऊन टाकलं.
 
काही वेळानंतर मी पाहिलं त्या कुठेतरी बाहेर चालल्या आहेत. तेव्हा त्यांना कुठूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असं माझ्या मनात आलं.
 
मला अपराधी वाटलं. मी त्यांना मारण्याचा प्रयत्न बिलकुल करत नव्हते. पण सामान निर्जंतुक केलंय किंवा नाही हे त्यांनी कधी विचारलंच नाही. त्यांनी विचारलं असतं तर मी सांगितलं असतं.
 
मी सध्या खूप घाबरलेली आहे. प्रत्येक गोष्ट निर्जंतुक करून घेते. त्यामुळेच मला वाटलं की त्यांचं सामान त्यांनीच स्वच्छ करून घ्यावं.
 
"लॉकडाऊनमध्येसुद्धा आजी-आजोबांसाठी केक घेऊन गेलो"
एप्रिल महिन्यात माझ्या दोन्ही मुलांचा वाढदिवस होता. कोरोना लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर जाण्याचा विचार कुणी करू शकत नाही. पण या काळातही आजी-आजोबांसाठी मी केक घेऊन गेलो होते. पण केक त्यांच्या दरवाजावर ठेवून निघून आलो.नेहमी नातेवाईकांच्या वाढदिवसांच्या दिवशी आम्ही एकत्र येत असतो. पण यावर्षी हे शक्य नव्हतं.
 
पण तरीही मी केक घेऊन माझ्या आजी-आजोबांना देण्यासाठी गेलो. त्यांना बरं वाटावं म्हणूनच मी गेलो होतो. त्यांनाही चांगलं वाटलं.
 
त्यांना सर्वांशी मिळून मिसळून राहायला आवडतं. सध्याच्या काळात त्यांना एकटं वाटत असेल म्हणूनच मी लॉकडाऊनमध्ये त्यांना केक द्यायला गेलो.
 
"नवरा व्हीडिओ कॉलवर होता, मी त्याच्यासमोर टॉप काढला, पण मागे आरसा होता"
लॉकडाऊनदरम्यान माझा नवरा घरातूनच काम करत होता. त्याच्या ऑफिसात अनेक निरस लोक आहेत. त्यामुळे तो कधी एखाद्या व्हीडिओ कॉन्फरन्स कॉलवर असेल, तेव्हा मजेने त्याच्यासमोर टॉप पूर्ण काढून टाकावा, असा माझा विचार होता.
 
एके दिवशी नवरा व्ही़डिओ कॉन्फरन्स कॉलवर होता. पण त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी सहजच मी त्याच्यासमोर टॉप काढून उभी राहिले. अशा स्थितीतच मी त्याच्यासमोर बराचवेळ होते. पण नंतर माझीच फजिती झाल्याचं मला लक्षात आलं.
 
माझा नवरा जिथे बसला होता, त्याच्या बरोबर मागे एक आरसा होता. मी समोर उभी राहून हे सगळं करत होते आणि हे सगळं आरशातून कॉम्प्यूटर स्क्रिनवर दिसत होतं.
 
कॉन्फरन्स कॉलवर असलेल्या बहुतेक सर्वांनीच मला त्या स्थितीत पाहिलं असेल, असं कळल्यानंतर मला पण खूप अवघडल्यासारखं वाटलं. बहुतेक त्यांनी परिस्थिती बिघडू नये म्हणून काही म्हटलं नाही. पण मला वाटतं नंतर त्यांच्यामध्ये याबाबत चर्चा झालीच असेल. माझ्या नवऱ्याने सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं. त्यावेळी त्याला हसू वगैरे काही आलं नाही. पण नंतर ज्यावेळेस ही गोष्ट आठवते त्या त्यावेळेस दोघांनाही हसू येतं.
 
"एकटेपणा घालवण्यासाठी दारूचं व्यसन"
मी माझ्या फ्लॅटमध्ये एकटा राहतो. लॉकडाऊनच्या काळात मी कुठेच बाहेर पडलो नाही. फक्त सामानाची होम डिलिव्हरी द्यायला येणाऱ्या व्यक्तीशीच माझा संपर्क व्हायचा. मित्रांशी व्हीडिओ कॉलवर बोलायचो. पण तरीसुद्धा एकटेपणा वाटतच होता.
 
घरपोच दारू मिळण्याची सोय झाल्यानंतर मी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात दारू खरेदी केली.
 
पूर्वी एक किंवा दोन ग्लासपुरतं मर्यादित असलेली दारू हळूहळू वाढत गेली. काही वेळा एकाच वेळी संपूर्ण बाटली मी संपवू लागलो.
 
असं करत दारूचं व्यसन वाढत गेलं. पूर्वी मी बारमध्ये जाऊन दारू प्यायचो. पण आता माझं घरच माझ्यासाठी बार बनलं आहे. या गोष्टी मला नंतर कळून आल्या.
 
"लॉकडाऊन तोडून मित्रांसोबत पार्टी"
मी माझ्या एका मित्रासोबत एका फ्लॅटमध्ये राहतो. आमचा एक मित्र आमच्या घरापासून थोड्या लांब राहतो. दुसरी एक मैत्रीणही अशीच लांबच्या भागात राहते.
 
एक दिवशी लॉकडाऊन तोडून भेटण्याचा आम्ही निर्णय घेतला. एका मित्राचा वाढदिवस होता. सर्वांनी मिळून तो साजरा केला.
 
या कालावधीत आम्ही एकूण चारवेळा भेटलो. तीन वेळा वाढदिवस साजरा करण्यासाठीच भेटलो होतो.
 
एकटे राहणाऱ्यांसाठी सध्याचा काळ कठीण आहे. एकटेपणा घालवण्यासाठी आम्ही हे योग्य करत असल्याचं तेव्हा वाटलं.
 
आम्ही आमची चूक लपवण्यासाठी हे सगळं बोलत आहोत, याची नंतर आम्हाला जाणीव झाली. आता या चुकीबद्दल अजूनही आम्हाला अपराधीपणा वाटतो.