1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (11:10 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीबाबत माहिती नाही - संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीबाबत माहिती नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
 
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अडिच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीची चर्चा सुरू आहे, त्याबाबत राऊत यांना विचारलं असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
 
तसंच तिन्ही पक्षांची मुंबईच बैठक होणार आहे, या बैठकीत सर्व निर्णय होतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
 
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीचं आश्चर्य वाटायचं कारण नाही, त्याचे अर्थ काय काढता, असा सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
 
तसंच राजकीय दबावातून राज्यसभेत जागा बदलण्यात आल्या आहेत, ते चुकीचं आहे. राजकारण एका बाजूला आणि सभागृहाची प्रतिष्ठा दुसऱ्या बाजूला आहे, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे, पण त्यावर मुंबईतल्या बैठकीत निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय.
 
दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत
महाराष्ट्रात शिवसेनेसह सरकार स्थापन करण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात बुधवारी एकमत झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत दोन्ही काँग्रेसमध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली.
 
या बैठकीनंतर आमची चर्चा सकारात्मक होती राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. बुधवारी दिवसभर राजधानी दिल्लीत अनेक घडामोडी घडत होत्या.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही बुधवारी भेट झाली. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. 50 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या बैठकीचे अनेक राजकीय अर्थही लावण्यात येत होते.