रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 4 डिसेंबर 2019 (13:13 IST)

सुंदर पिचाई यांच्या खांद्यावर येणार गुगलची सर्व जबाबदारी

लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन हे अल्फाबेट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षपदावरुन पायउतार होत आहेत. अल्फाबेट ही गुगलची मुख्य कंपनी असून, पेज आणि ब्रिन हे गुगलच्या सहसंस्थापकांपैकी आहेत.
 
या दोघांनी पदभार सोडल्यास गुगलचं सर्व काम सुंदर पिचाई सांभाळतील, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय.
 
सुंदर पिचाई हे सध्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते आता अल्फाबेट कंपनीचंही मुख्य कार्यकारी अधिकारीपद सांभाळतील.
 
लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांचं म्हणणं आहे की, आता कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडण्याची वेळ आलीये. मात्र, पेज आणि सर्गेई हे दोघेही कंपनीच्या संचालक मंडळावर राहतील.
 
21 वर्षांपूर्वी म्हणजे 1998 साली सिलकॉन व्हॅलीत (कॅलिफोर्निया) एका गॅरेजमध्ये गुगलची सुरुवात झाली. त्यानंतर 2015 साली कंपनीत मोठे बदल झाले आणि अल्फाबेटला गुगलची मूळ कंपनी बनवण्यात आलं. आजच्या घडीला गुगल जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमधील एक गणली जाते.
 
आर्टिफिशियल इंटेलिजियन्सच्या दिशेनं पावलं टाकणाऱ्या गूगलचं काम अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवणं, हे अल्फाबेटचं काम होतं.
 
अल्फाबेट कंपनी स्थापन केल्यानंतर तिची जबाबदारी पेज आणि सर्गेई यांनी सांभाळली. मात्र, मंगळवारी (3 नोव्हेंबर) एका ब्लॉगच्या माध्यमातून पेज आणि सर्गेई यांनी अल्फाबेटपासून दूर होत असल्याची घोषणा केली.
 
"कंपनीचे संचालक या नात्यानं कंपनीशी थेट जोडलेले राहू तसंच कंपनीचे शेअरहोल्डरही राहू. मात्र, कंपनीमध्ये बदलाची वेळ आलीये," असं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
 
त्यांनी ब्लॉगमध्ये पुढे म्हटलं आहे, "आम्ही कधीच कंपनीच्या व्यवस्थापनात नव्हतो आणि आम्हाला असं वाटतं की, कंपनी चालवण्यासाठी आता कुठलीतरी चांगली पद्धत असू शकते. आता अल्फाबेट किंवा गुगलला दोन-दोन मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा अध्यक्ष नकोत."
 
कंपनी चालवण्यासाठी सुंदर पिचाईंपेक्षा दुसरी चांगली व्यक्ती असू शकत नाही, असंही पेज आणि सर्गेई यांना वाटतं.
 
47 वर्षांच्या सुंदर पिचाईंचा जन्म भारतात झाला. त्यांचं शिक्षणही भारतात झालं. मात्र पुढील शिक्षणासाठी ते स्टेनफोर्ड विद्यापीठ आणि पेन्सिल्वेनिया विद्यापीठात गेले. 2004 साली सुंदर पिचाई यांनी गुगल कंपनीत कामाला सुरुवात केली होती. आता संपूर्ण गुगलची जबाबदारी त्यांच्या खाद्यांवर येणार आहे.