बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

IPL च्या प्ले ऑफमध्ये कुणाचं पारडं जड, कोण होणार स्पर्धेतून बाहेर

- जान्हवी मुळे
 
इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPLच्या बाराव्या मोसमातली जेतेपदाची लढाई आता निर्णायक टप्प्याकडे पोहोचत आहे. आठ संघांमधल्या या स्पर्धेच्या साखळी फेरीत निम्मे संघ बाद झाले असून चार अव्वल संघांमध्ये प्ले ऑफचे सामने रंगणार आहेत. प्ले ऑफच्या या लढती कशा असणार आहेत?
 
पहिला 'क्वालिफायर' सामना
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे IPLच्या इतिहासातले दोन सर्वांत यशस्वी संघ यंदा पहिल्या क्वालिफायर सामन्यात आमने सामने येतील.
 
7 मे रोजी, म्हणजे मंगळवारी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर म्हणजे चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानात हा सामना खेळवला जाणार आहेत. मुंबईचा रोहित शर्मा आणि चेन्नईचा अनुभवी महेंद्रसिंग धोनी या दोन कर्णधारांमधली चुरस हेही या सामन्याचं वैशिष्ट्य आहे.
मुंबई आणि चेन्नई या दोन संघांनी आजवर तीन-तीन वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवलं होतं. यंदाही मुंबई आणि चेन्नईनं दमदार कामगिरी बजावत गुणतालिकेत टॉप टूमध्ये स्थान मिळवलं आहे.
 
मुंबईनं 14 सामन्यात 9 विजय आणि 18 गुणांची कमाई करून पहिलं स्थान मिळवलं. तर गतविजेत्या चेन्नईच्या खात्यातही 14 सामन्यात 9 विजय आणि 18 गुण जमा आहेत, पण सरासरी कमी असल्यामुळे त्यांचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
 
तीन एप्रिलला मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईनं चेन्नईवर 37 धावांनी विजय मिळवला होता. मग चेन्नईत 26 एप्रिलला झालेला सामना मुंबईनं 46 धावांनी जिंकला होता.
 
आता मंगळवारी होणारा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात खेळून फायनल गाठण्याची आणखी एक संधी मिळेल.
'एलिमिनेटर' सामना
IPL प्लेऑफचा 'एलिमिनेटर' सामना 8 मे रोजी, विशाखापट्टणमच्या डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळवला जाणार असून, त्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ त्यात एकमेकांचा मुकाबला करतील.
 
नवं नाव धारण करून, श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिल्लीची टीम सात वर्षांनंतर आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. खरंतर यंदा त्यांनीही मुंबई आणि चेन्नईप्रमाणेच 14 सामन्यात 9 विजयासह 18 गुण मिळवले आहेत. मात्र त्यांची सरासरी मुंबई आणि चेन्नईपेक्षा कमी असल्याने त्यांना गुणतालिकेत तिसरं स्थान मिळालं.
 
तर न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या नेतृत्त्वाखालील हैदराबादनं 14 मॅचेसमध्ये सहा विजय मिळवून 12 गुणांसह चौथा क्रमांक पटकावला.
 
दोन्ही संघांमध्ये यंदाच्या मोसमात झालेल्या दोन लढतींमध्ये प्रत्येकानं एकेकदा विजय मिळवला. चार एप्रिलला दिल्लीत झालेल्या लढतीत सनरायझर्सनं दिल्लीवर पाच विकेट्स आणि नऊ चेंडू राखून मात केली होती.
 
मग चौदा एप्रिल रोजी हैदराबादमध्ये झालेला सामना दिल्लीनं 39 धावांनी जिंकला आणि त्या पराभवाची परतफेड केली होती.
 
आता 'एलिमिनेटर' सामना हा दोन्ही संघांसाठी 'करो या मरो'चा सामना असणार आहे, कारण या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात येईल.
 
दुसरा 'क्वालिफायर' सामना
आयपीएलचा दुसरा 'क्वालिफायर' सामना 10 मे रोजी विशाखापट्टणममध्येच खेळवला जाणार आहे. पहिल्या क्वालिफायरमधला पराभूत संघ आणि एलिमिनेटर सामन्याचा विजेता संघ यांच्यात ही लढत खेळवली जाईल.
 
दुसरा क्वालिफायर सामना जिंकणाऱ्या संघाला आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश मिळेल.
 
आयपीएलचा अंतिम सामना 12 मे रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.