बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (15:34 IST)

'माझं शिक्षण एक ओझं झालंय, पण मी शिक्षणाशिवाय जगू शकत नाही'- टॉपर ऐश्वर्याचे अखेरचे शब्द

बाला सतीश
तिला प्रशासकीय सेवेत जायचं होतं. कॉलेजचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. ऑनलाईन क्लास करायची तिची इच्छा होती. पण, त्यांच्याकडे कोचिंगसाठी पैसे नव्हते. वर्षभरानंतर हॉस्टेलमधून काढून टाकलं जाण्याची भीती तिला सतावत होती. शिवाय, ऑनलाईन क्लाससाठी लॅपटॉप खरेदी करण्यासाठी तिला बऱ्याच अडचणी येत होत्या.
 
ही आहे ऐश्वर्या रेड्डीची कहाणी. अभ्यासात हुशार, पण परिस्थिती अत्यंत हलाखीची. या परिस्थितीनेच तिला टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडलं. कधीकाळी शहरातली टॉपर असणारी ऐश्वर्यानं आर्थिक परिस्थितीशी दोन हात करताना आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
 
ऐश्वर्याने 2 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. तिचे अखेरचे शब्द होते, "माझ्या घरातल्या बऱ्याच खर्चांचं कारण मी आहे. मी ओझं बनले आहे. माझं शिक्षण ओझं आहे. शिक्षणाशिवाय मी जगू शकत नाही."
हैदराबादपासून 50 किमी अंतरावरच्या शादनगरमध्ये ऐश्वर्या राहायची. आम्ही तिच्या घरी पोहोचलो तेव्हा 2 खोल्यांच्या तिच्या घराबाहेर मीडियाची झुंबड उडाली होती. पत्रकारांना ऐश्वर्याच्या आईशी बोलायचं होतं.
 
कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी नेते मंडळींचीही ये-जा सुरू होती. ऐश्वर्याचे वडील गांता श्रीनिवास रेड्डी मेकॅनिक आहेत. आई सुमती घरी शिवणकाम करते.
ऐश्वर्या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. बारावीपर्यंतचं तिचं शिक्षण मोफत झालं. बारावीत तिला 98 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. त्यावर्षी ती तिच्या शहरात ती पहिली आली होती.
 
दिल्लीत राहाण्याचा आणि शिक्षणाचा खर्च
 
तिचे बारावीतले गुण बघून एका नातेवाईकाने तिला दिल्लीत लेडी श्रीराम कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्याचा सल्ला दिला. त्यासाठी मदतही केली.
 
तिला लेडी श्रीराम कॉलेजमध्ये बीएससीला अॅडमिशन मिळालं. मात्र, या कॉलेजच्या नियमानुसार हॉस्टेल वर्षभरानंतर सोडावं लागतं. ऐश्वर्यालाही हा नियम माहिती होता आणि पुढच्या वर्षी काय करायचं, ही काळजी तिला लागून होती.
 
पदवीच्या शिक्षणानंतर प्रशासकीय सेवेत जाण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र, प्रशासकीय सेवेच्या कोचिंगसाठी तिच्या कुटुंबाकडे पैसे नव्हते. ऐश्वर्याचं शिक्षण सुरू रहावं, यासाठी तिचे आई-वडील दिवसरात्र मेहनत करायचे. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी दागिनेही गहाण ठेवले.
 
दागिने ठेवले गहाण
ऐश्वर्याच्या आई सुमती सांगतात, "तिला दिल्लीला पाठवण्यासाठी मी दागिने गहाण ठेवून 80 हजार रुपये जमवले होते. पुढे होणाऱ्या खर्चाची तिला सतत काळजी असायची. आम्ही तिला प्रशासकीय सेवेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगायचो. ती अभ्यास खूप हुशार होती."
 
"मात्र, ऐश्वर्या घर आणि दागिने गहाण ठेवायला विरोध करायची. मी तिला नेहमी म्हणायचे की तू एकदा मोठ्या पदावर गेलीस की आपण अशी 10 घरं घेऊ."
"ऑनलाईन क्लासेस सुरू झाल्यानंतर तिला लॅपटॉप हवा होता. 70 हजार रुपये लागतील, असं ती म्हणाली होती. आम्ही पैशांची जुळवाजुळव करतोय, म्हणून सांगितलंही होतं."
 
मात्र, इकडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी बेताची होती की दुसऱ्या मुलीला खाजगी शाळेतून काढून सरकारी शाळेत घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेटसाठी 7 हजार रुपयांची जुळवाजुळव करणंही त्यांना जमलं नाही. शेवटी त्यांनी मुलीचं शिक्षणच थांबवलं.
आत्महत्या का केली?
पदवीच्या शिक्षणाव्यतिरिक्त ऐश्वर्या फ्रेंच भाषाही शिकत होती. लॉकडाऊनमुळे ती घरी आली होती.
 
फ्रेंच शिकत असताना ती रात्री फ्रेंच सिनेमे बघायची. त्यामुळे सकाळी उशिरा उठायची. पण, तिला अभ्यासात व्यत्यय येऊ नये, म्हणून कुणीही तिला घरातलं कुठलंही काम करू देत नसे.
 
दरम्यानच्या काळात तिची वारंगळच्या एका मैत्रिणीशी ओळख झाली. तिने शैक्षणिक कर्जाविषयी सांगितलं. 1 नोव्हेंबरला ती त्या मैत्रिणीला भेटायला गेली होती.
 
भेटून परत आल्यावर तिने आईला कर्जाविषयी सांगितलं. सुमती सांगतात, "परतल्यावर ती खूप आनंदी होती. घरी येऊन ती आनंदाने नाचली. मैत्रिणीच्या आईने आपल्याला कर्जाची माहिती दिली आणि हे कर्ज काढण्यासाठी त्या मदतही करणार असल्याचं तिने सांगितलं होतं."
या पैशातून कुटुंबावर असलेलं दोन लाख रुपयांचं कर्ज फेडायचं आणि उरलेल्या पैशातून शिक्षण पूर्ण करायचं, असं तिला वाटलं.
 
मात्र त्याच दिवशी ऐश्वर्या आणि तिची आई यांच्यात दिल्लीला जाणं, राहाणं आणि कॉलेज अॅडमिशन यावर झालेल्या खर्चावरून मोठा वाद झाला. बरंच भांडण झालं.
 
त्यानंतर ऐश्वर्या खोलीत गेली आणि तिने दार बंद करून घेतलं. नेहमीप्रमाणे तिने सिनेमा बघितला. पण जेवणार नसल्याचं सांगितलं. सकाळी उठली. पण दुसऱ्या दिवशीही जेवणाला नकार दिला. ऐश्वर्याच्या वडिलांनी तिला बाहेरून काही आणायचं आहे का विचारलं, पण ती त्यालाही नाही म्हणाली.
 
पण, तिचे वडील आजारी होते. त्यांना कावीळ झाली होती. त्यामुळे वडिलांना तिने खाऊ घातलं. नंतर ती पुन्हा खोलीत गेली. खोलीतून बराच वेळ काहीच आवाज आला नाही. बहीण पायपुसणं घेण्यासाठी खोलीत गेली तेव्हा ऐश्वर्याने पंख्याला गळफास घेतल्याचं तिला दिसलं.
 
सुमती सांगतात, "आम्ही तिला खाली उतरवलं आणि ऑटो घ्यायला धावलो. आम्ही तिला उठवण्याचा प्रयत्न करत होतो. हे सगळं खोटं आहे, असंच वाटत होतं."
 
मृत्यूपूर्वीची चिठ्ठी
आत्महत्येपूर्वी ऐश्वर्याने एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात ती लिहिते -
 
"माझ्या मृत्यूसाठी कुणीच जबाबदार नाही. माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला खूप खर्च करावा लागतोय. मी ओझं बनले आहे. माझं शिक्षण ओझं आहे. मी याविषयी बराच काळापासून विचार करत होते.
 
माझ्या समस्येवर मृत्यू हाच एकमेव उपाय असल्याचं मला वाटतं. माझ्या मृत्यूसाठी अनेक कारणं सांगितली जाऊ शकतात. पण, माझा हेतू वाईट नाही. मला वर्षभरासाठी इन्स्पायर स्कॉलरशीप मिळावी, यासाठी कृपया प्रयत्न करा. मला माफ करा. मी चांगली मुलगी होऊ शकले नाही."
 
या चिठ्ठीत शेवटी तिने इंग्रजीत सही केली आहे.
 
हुशार आणि हलाखीची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र, ऐश्वर्या किंवा तिचं कुटुंब त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही.
 
सुमती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "मीच तिला वारंगळहून बोलावून घेतलं होतं. घरी येऊन स्कॉलरशीपसाठी बँक खातं उघडण्यासाठी मीच दबाव टाकला होता. मी तिला बोलावलंच नसतं तर आज हे घडलंच नसतं."
 
"शिक्षणासाठीच्या खर्चाची काळजी करू नको, असं आम्ही कितीतरी वेळा तिला सांगितलं होतं. पण आदल्या दिवशी झालेल्या भांडणामुळे ती खूप दुखावली होती."