मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मे 2019 (10:37 IST)

निघोजमधल्या 'ऑनर किलिंग' प्रकरणाला नवं वळण: आता पतीवरही संशय

अहमदनगर जिल्ह्यातल्या निघोजमध्ये रुक्मिणी रणसिंग आणि मंगेश रणसिंग या पती-पत्नीला पेट्रोल टाकून जिंवत जाळल्याचा प्रकार घडला होता. गुरुवारी, 2 मे ला या दोघांना पुण्यातल्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
 
यानंतर रुक्मिणीचा रविवारी, 5 मे ला रात्री ९.३० वाजता मृत्यू झाला होता.
 
याप्रकरणी पोलिसांनी मंगेशचा भाऊ महेशने दिलेल्या तक्रारीनुसार कलम 307 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. रुक्मिणीने मृत्युपूर्वी वडील आणि नातेवाईक यांनी पेटवून दिल्याचं पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितलं होतं. त्यानुसार पोलिसांनी तिचे काका आणि मामा यांना अटक केली होती. तसंच 302 हा मनुष्य वधाचा गुन्हा देखील पोलिसांनी नोंदवला.
 
आंतरजातीय विवाहाला असणाऱ्या विरोधातून हे गुन्हा घडलाय का याचा पोलिस तपास करत आहे.
 
रुक्मिणीच्या भावाच्या साक्षीमुळं नवं वळण
रुक्मिणीचे वडील रामा भारतीय यांना मंगळवारी, 7 मे ला अटक करण्यात आली. ही घटना घडली तेव्हा तिथे रुक्मिणीची तीन भावंड उपस्थित होती. त्यांच्यापैकी एकाची साक्ष पोलिसांनी घेतली आहे.
 
या मुलाने मंगेशनेच रुक्मिणीला पेटविल्याचं असं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. आता पोलीस या दिशेनेही तपास करत आहेत.
 
पण फक्त लहान मुलाच्या जबाबामुळे तपासाची दिशा पूर्णपणे बदलेल असं नाही. या प्रकरणाच्या तपासात इतर गोष्टीसुद्धा बघितल्या जाणार असल्याचं प्राथमिक तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी सांगितलं.
 
सहा महिन्यांपूर्वी रुक्मिणी आणि मंगेश रणसिंग यांचं लग्न झालं होतं. या लग्नाला रुक्मिणीच्या वडिलांचा आणि नातेवाईकांचा विरोध होता. मंगेशच्या कुटुंबियांनी मात्र या नात्याचा स्वीकार केला होता.
 
रुक्मिणीची आई निर्मला भारतीय यांनी मंगळवारी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "मंगेश तिला मारहाण करत होता, म्हणून आम्ही तिला नांदायला पाठवणार नाही असं म्हणालो होतो. याच विषयावरून वादावादी झाली. त्यानंतर परत मंगेश आला तेव्हा आम्ही दोघेही घरात नव्हतो. घरी आलो तेव्हा आम्ही रुक्मिणीला पेटल्याचं पाहिलं."
 
आमचा या लग्नाला विरोध होता असंही त्या म्हणतात. "रुक्मिणीने हट्टाने लग्न केलं. या मुलाशिवाय मी जगू शकत नाही असं ती म्हणायची. पण जेव्हा ती आमच्याकडे परत आली तेव्हा तिने मंगेश मला मारहाण करतो असं सांगितलं. ती गेल्याचं काही दुःख नाही मला, पण जाताना ती माझ्या नवऱ्याला, भावाला आणि दीराला अडकवून गेली," असं त्या म्हणतात.
 
सर्व प्रकरणावर शेजाऱ्यांचं मौन
"आम्ही दोन-तीन घरं सोडून बाजूलाच राहतो. दुपारच्या वेळेस घरातून आरडाओरडा ऐकू आला म्हणून धावत गेलो. घरातून धूर येत होता आणि दरवाजाही बंद होता. आम्ही दरवाजा तोडला आणि अॅम्ब्युलन्स बोलावली," असं रुक्मिणीच्या शेजारी राहणाऱ्या संजय बळीद यांनी सांगितलं. त्यावेळेस रुक्मिणीची भावंडही तिथे असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
पण इतर शेजारी या प्रकरणी फारसं बोलत नाहीयेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील दोन्ही कुटुंबांबद्दल शेजाऱ्यांकडे चौकशी करत आहेत. अनेक वरिष्ठ अधिकारी निघोजमध्ये तळ ठोकून बसले आहेत आणि या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत.
 
या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक मनीष कलवानीया यांच्याकडे आहे. मंगेशचा भाऊ महेश रणसिंग याने मंगेशनेच रुक्मिणीला पेटवल्याचा आरोपाचा इन्कार केला आहे. मंगेश आणि रुक्मिणीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं असं त्यांचं म्हणणं आहे. शासनाने मंगेश आणि रुक्मिणीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.
 
सहा वर्षांच्या मुलाच्या जबानीमुळे तपासाची दिशा पूर्णपणे कशी बदलली जाऊ शकते असा प्रश्नही महेशने उपस्थित केला आहे.
 
मंगेश अनेकदा रुक्मिणीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी भेटला असल्याचं महेशने बीबीसी मराठीला सांगितलं.
 
या घटनेतील सगळे पुरावे, साक्षी तपासल्या जात आहेत. रुक्मिणीच्या छोट्या भावाचा जबाब पोलीस अधीक्षकांच्या उपस्थित नोंदवला गेला आहे.
 
दोन्हीही कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सारखी होती, तसंच मंगेशचं मुलीच्या घरी येणं-जाणं होतं. मुलीचे कुटुंबीय उत्तर प्रदेशातून येऊन निघोजमध्ये स्थायिक झालेत तर मुलाचं कुटुंब स्थलांतरित आहे आणि बऱ्याच काळापासून निघोजमध्ये राहातात. त्यामुळे प्रतिष्ठेच्या कारणावरुन हे जळीतकांड झालं असल्याची शक्यता धूसर असल्याचं स्थानिक पत्रकार संजय वाघमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
दुसरीकडे रुक्मिणी रणसिंग हिने बंडगार्डन पोलिसांना दिलेल्या मृत्युपूर्व जबाबात म्हटलं की तिचे वडील, मामा आणि काका यांनीच तिला पेटवून दिलं आहे. मंगेशनेही रुक्मिणीच्या कुटुंबियांनी पेटवून दिल्याचं म्हटलं आहे.
 
मंगेश रणसिंग हा ४५ टक्के भाजला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. रुक्मिणी रणसिंगवर बुधवारी पुण्यात अंत्यसंस्कार झाले.