1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 25 डिसेंबर 2019 (08:33 IST)

NPR: अमित शाह - नरेंद्र मोदी बरोबर म्हणाले, देशभरात NRC होणार नाही

संपूर्ण देशात NRC प्रक्रियेबाबत अद्याप कुठलीही योजना नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अखेर स्पष्ट केलं.
 
देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर देशभरात राष्ट्रीय नागरिकत्व यादी (NRC) तयार केली जाईल, असं त्यांनीच काही दिवसांत राज्यसभेत तसंच वेगवेगळ्या पत्रकार परिषदा आणि जाहीर सभांमध्ये सांगितलं होतं.
 
मात्र रविवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांनी देशभरात NRC बाबत कुठलीही चर्चा झाली नाही, असं सांगितल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. त्याला दुजोरा देत, अमित शाह यांनी आज ANI वृत्तसंस्थेच्या संपादक स्मिता प्रकाश यांच्याशी बोलताना म्हणाले, "पंतप्रधान मोदी बरोबर बोलले. ना मंत्रिमंडळात, ना संसदेत देशभरात NRC प्रक्रिया घेण्याबाबत काही वाच्यता झाली नाही."
 
तसंच आज ज्या मुद्द्यावरून राजकारण तापलं, त्या 'राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही' म्हणजेच NPRवरही त्यांनी भाष्य केलं. "NPR आणि NRC यांचा कुठलाही संबंध नाही. NRC हे नागरिकांचं रजिस्टर आहे तर NPR हे लोकसंख्येचं. त्याबद्दल CAAप्रमाणेच चुकीची माहिती पसरवली जाते आहे."
 
दर 10 वर्षांनी जनगणना होते, त्याच जनगणनेबरोबर हे NPR अपडेट केलं जात आहे. मात्र हा काही कायदा नाहीये जो आम्ही आत्ता आणला, हे गेल्या कित्येक दशकांपासून सुरू आहे, असंही शाह या मुलाखतीत म्हणाले.
 
स्पष्टीकरण की युटर्न?
दोनच दिवसांपूर्वी, दिल्लीमधील रामलीला मैदानावर भारतीय जनता पार्टीची दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू होती. तेव्हा देशभरात CAAविरोधात आंदोलनं सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी या वादावर पहिल्यांदाच जाहीर भाष्य केलं.
 
ते पुढे म्हणाले, "CAA हे भारताच्या हिंदू अथवा मुस्लीम कुणासाठीही नाहीये. देशातल्या 130 कोटी लोकांशी याचा काहीएक संबंध नाही. NRCविषयी अफवा पसरवल्या जात आहे. काँग्रेसच्या काळात हे विधेयक तयार करण्यात आलं होतं. तेव्हा काय झोपले होते काय?"
 
"आम्ही तर हा कायदा बनवला नाही. NRCवर आमच्या सरकारच्या काळात काहीच झालेलं नाही, ना संसदेत NRCवर काही चर्चाही झाली. ना त्याचे काही नियम-कायदे आम्ही बनवले. नुसती हवा बनवली जाते आहे," असं मोदी म्हणाले.
 
मात्र नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर देशभरात NRC लागू होईल, असं गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत CAA विधेयक मांडलं तेव्हा सांगितलं होतं.
 
मात्र आज अमित शाह यांनी या NRC देशभरात करण्याचा विचार अद्याप झालेला नाही, असं सांगितलं. "आणि एवढी मोठी गोष्ट आम्ही लपूनछपून करणार नाही. जर गरज पडली तर त्यासाठी योग्य ती प्रक्रिया पार पाडली जाईल," असंही ते स्मिता प्रकाश यांच्याशी बोलताना म्हणाले.