मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (17:43 IST)

शेवटच्या दिवशी ट्रंप सरकारचा चीनला तडाखा, भारतावरही केलं भाष्य

चीनने वीगर मुसलमानांवर दडपशाही करत त्यांच्यावर नरसंहार केल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी म्हटलंय.
 
तर आपण याच्याशी सहमत असल्याचं अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होऊ घातलेल्या जो बायडन यांच्या सरकारचे परराष्ट्र मंत्री असणाऱ्या अँथनी ब्लिंकन यांनी म्हटलंय.
 
चीनने गेल्या काही वर्षांमध्ये लाखो विगर मुसलमानांना कॅम्पवजा तुरुंगामध्ये ठेवलं असल्याचं मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या गटांचं म्हणणं आहे. या कॅम्पना चीन सरकार कट्टरताविरोधी प्रशिक्षण कॅम्प म्हणतं.
 
या विगर मुसलमानांना वेबबिगारी करण्यास भाग पाडण्यात येत असल्याचं बीबीसीच्या तपासात आढळलंय. डोनाल्ड ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात अमेरिका आणि चीनमध्ये तणाव होता. या दोन देशांची एकमेकांशी असलेली व्यापारी धोरणं आणि कोरोना व्हायरसची जगभरात पसरलेली साथ यावरून हे वाद अधिक गहिरे झाले.
 
अमेरिकेचे मावळते परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ म्हणाले, "चीनमधला हा नरसंहार अजूनही सुरू असल्याचं माझं मत आहे. चीनमधलं कम्युनिस्ट पक्षाचं सरकार विगर मुसलमानांना कशाप्रकारे उद्ध्वस्त करतंय हे आम्हाला दिसतंय."
 
ट्रंप प्रशासनाचा अंमल संपुष्टात येत असताना पॉम्पेओ यांनी हे विधान केलंय. पण चीनवर दबाव आणण्यासाठी हे विधान करण्यात आलं असून या विधानाचे परिणाम पॉम्पेओ यांना भोगावे लागणार नाहीत.
 
अमेरिकेत जो बायडन यांचं सरकार 20 जानेवारीपासून अस्तित्त्वात येतंय. यामध्ये परराष्ट्र मंत्री असणाऱ्या ब्लिंकन यांना पॉम्पेओ यांच्या या विधानाविषयी विचारण्यात आलं. या विधानाशी आपण सहमत असल्याचं त्यांनी म्हटलंय. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात बायडन यांच्या टीमनेही विगर मुसलमानांबद्दलचे असेच आरोप चीनवर केले होते. चीन मधल्या सरकारवर कोणाचाही अंकुश नसल्याने त्यांनी विगर मुसलमानांचा मोठा छळ केल्याचं बायडन यांच्या टीमने म्हटलं होतं.
 
माईक पॉम्पेओ यांनी भारताविषयीही एक वक्तव्य केलंय. ट्वीट करत पॉम्पेओंनी म्हटलंय, "ब्रिक्स लक्षात आहे? झायर बोल्सनारो ( ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष) आणि नरेंद्र मोदींचे आभार. B आणि I या दोघांनाही माहिती आहे की C आणि R हे त्यांच्यासाठी धोका आहेत."
 
भारताविषयी वक्तव्य
ब्रिक्स संघटनेमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश आहेत. पॉम्पेओंनी ब्राझीलचा उल्लेख B तर भारताचा उल्लेख I केलाय. तर C म्हणजे चीन आणि R म्हणजे रशिया. हे दोन्ही देश B आणि I मधल्या लोकांसाठी धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण पॉम्पेओ यांनी दक्षिण आफ्रिकेबद्दल काहीही म्हटलेलं नाही.
 
गेल्या काही दिवसांमध्ये चीन आणि भारतातला तणाव वाढलेला आहे. दोन्ही देशांच्या सेना लडाखमध्ये अजूनही आमनेसामने आहेत आणि सीमेवर अजून शांतता प्रस्थापित झालेली नाही.
 
रशियासोबतचे भारताचे संबंधही ताणले गेल्याचं सांगितलं जातंय. पश्चिमेतले देश भारताला चीन विरोधी मोहरा बनवत असल्याचं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोफ यांनी डिसेंबरमध्ये म्हटलं होतं.
 
चीनवर दबाव
अगदी शेवटच्या दिवसांमध्ये ट्रंप सरकारने चीनला ही 'भेट' दिलीय. सत्तेतून जाता जाता ट्रंप सरकारने चीनला हा शेवटचा झटका दिलाय. पॉम्पेओंचं हे विधान चीनच्या वायव्येला असणाऱ्या शिंजियांगमध्ये विगर मुस्लिमांवर करण्यात येणाऱ्या कारवाई विषयीचं आतापर्यंतचं सर्वात कठोर विधान असल्याचं म्हटलं जातंय.
 
या प्रकरणी जगातल्या इतर कोणत्याही देशाने इतकं मोठं विधान केलेलं नाही. युरोपियन युनियन, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियानेही शिंजियांगमधल्या मानवी हक्कांबाबतच्या परिस्थितीविषयी वेळोवेळी टीका केलेली आहे.
 
चीनवर अप्रत्यक्षरित्या आंतरराष्टीय दबाव टाकण्यासाठी हे महत्त्वाचं ठरू शकतं. पण यामुळे चीन सरकारचं धोरण बदलेल का? सध्याच्या स्थितीत चीन मजबूत परिस्थितीत आहे आणि कोरोनाची जागतिक साथ असतानाही त्यांच्या अर्थव्यवस्थेची सकारात्मक वाढ होतेय. पण दुसरीकडे अमेरिकेत अनेक गोष्टींमुळे सध्या उलथापालथ सुरू आहे.
 
पॉम्पेओ यांच्या या विधानावर चीनच्या सरकारी माध्यम प्रतिनिधींनी जोरदार आक्षेप घेतलाय. अमेरिकन सरकारला साथ नीट सांभाळता न आल्याने त्यांनीच एकप्रकारे अमेरिकन नागरिकांचा संहार केल्याचं चीनच्या सरकारी मीडियाने म्हटलंय. कोव्हिड 19 मुळे अमेरिकेत आतापर्यंत चार लाख लोकांचा मृत्यू झालाय.
 
अमेरिकेसोबतच अनेक देशांच्या चीनसोबतच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे.
 
विगर मुसलमानांवरची दडपशाही म्हणजे जनसंहार असल्याचं बायडन यांच्या टीमनेही म्हटलंय. पण या गोष्टीला बायडन प्रशासनाचं प्राधान्य नाही.
 
पण अमेरिकेमधल्या नवीन सरकारला याबाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल.
 
डोनाल्ड ट्रंप व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतरही चीन आणि अमेरिकेतले संबंध पूर्ववत होणार नसल्याचं यावरून स्पष्ट होतंय.
 
शिंजियांगमधली परिस्थिती काय आहे?
वायव्येकडच्या शिंजियांग प्रांतामध्ये आपण फुटीरतावाद, कट्टरवाद आणि दहशतवादाशी लढत असल्याचं चीनचं म्हणणं आहे. इथे 1.1 कोटी वीगर मुसलमान राहतात. या तीन मुद्द्यांशी लढण्यासाठी तीन कॅम्प तयार करण्यात आले असून असं करणं आवश्यक असल्याचं चीनचं म्हणणं आहे.
 
गेल्या काही वर्षांमध्ये शिंजियांगमधल्या या कॅम्प्समध्ये मोठ्या संख्येने 'हान' समाजातल्या लोकांना ठेवण्यात आलंय. 1990च्या दशकापासूनच चीनमध्ये हान विरोधी कट्टरतावाद प्रबळ होतोय. यासंबंधीच्या हिंसाचाराच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे.
 
वीगर संस्कृती नष्ट करण्याचा चीनचा प्रयत्न असून मुसलमानांवर डुकरांचं मांस खाण्याची आण दारू पिण्याची सक्ती केली जात असल्याचं वीगर हक्कांसाठी काम करणाऱ्यांचं म्हणणं आहे. चीनच्या शिंजियांग प्रांतातून टोमॅटो आणि कापूस आयात करण्यावर ट्रंप प्रशासनाने गेल्या आठवड्यात बंदी घातली आहे. याच भागात सर्वाधिक विगर मुसलमान राहतात.
 
जगातल्या एकूण कापूस उत्पादनाच्या एक चतुर्थांशापेक्षा जास्त उत्पादन याच भागात होत असल्याचा अमेरिकन तज्ज्ञांचा अंदाज आहे. पण याच कापूस शेतीसाठी कॉन्सनट्रेशन कॅम्प्स आणि वेठबिगारी चालवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप होतोय.
 
शिंजियांगमध्ये लहान मुलांना योजनाबद्ध रीतीने त्यांच्या कुटुंबापासून वेगळं करण्यात येत असून हे सगळे मुसलमान असल्याचं 2019मध्ये बीबीसीच्या तपासादरम्यान आढळलं होतं. विगर महिलांना कुटुंब नियोजन करण्यासाठी भाग पाडलं जात असल्याचंही नुकत्याच करण्यात आलेल्या काही तपासांत आढळलं होतं. पण चीनने वारंवार हे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
वीगर मुसलमान कोण आहेत?
 
चीनच्या पश्चिमेकडील शिंजियांग प्रांत आणि तिथला स्थानिक विगर समाज यांच्यातल्या संघर्षाचा इतिहास मोठा आहे.
 
वीगर हे मूळचे मुसलमान आहेत. सांस्कृतिक आणि सामाजिक रूपाने ते स्वतःला मध्ये आशियातल्या देशांच्या जवळ मानतात.
 
या भागातली अर्थव्यवस्था शतकानुशतकं शेती आणि व्यापारावर अवलंबून आहे. इथले काशगर सारखे भाग हे सिल्क रूट मध्ये प्रसिद्ध होते.
 
विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये विगरांनी काही काळासाठी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं. या भागावर कम्युनिस्ट चीनने 1949 मध्ये ताबा मिळवला.
 
दक्षिण तिबेटप्रमाणेच शिंजियांगही अधिकृत रित्या स्वायत्त भाग आहे.
 
वीगरांच्या तक्रारी
 
चीनच्या सरकारने हळुहळू विगरांचं धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अस्तित्वं नजरेआड केल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
 
1990च्या दशकात शिंजियांगमध्ये झालेली निदर्शनं आणि त्यानंतर पुन्हा 2008मध्ये बीजिंग ऑलिम्पिकच्या रन अप दरम्यान झालेल्या निदर्शनांनंतर चीन सरकारने ही दडपशाही वाढवल्याचा आरोप आहे.
 
बहुतेक प्रमुख वीगर नेत्यांना गेल्या दशकाच्या काळात तुरुंगात टाकण्यात आलं किंवा दहशतवादाचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आल्यानंतर त्यांनी परदेशात आसरा घेतला.
 
शिंजियांगमध्ये मोठ्या प्रमाणात हान समाजाची वसाहत करण्यात आल्याने विगर या प्रांतात अल्पसंख्याक झाले.
 
आपल्या या दडपशाहीला योग्य ठरवण्यासाठी विगर फुटीरतावाद्यांचा धोका फुगवून सांगण्यात येत असल्याचा आरोपही चीनवर करण्यात येतो.