शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (10:53 IST)

विराट कोहली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शाकाहारी झाला, कारण...

सूर्यांशी पांडे
एखाद्या हॉटेलमध्ये अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विलियम्स 'व्हिगन' जेवण ऑर्डर करत असेल तर त्यात काही आश्चर्य वाटणार नाही. कारण ही बातमी आता जुनी झाली आहे.
 
सेरेना विलियम्सने गरोदरपणात तिच्या आहारात बदल केला आणि आता ती पूर्णपणे 'व्हिगन' आहार घेते. व्हिगन म्हणजे शाकाहार तर असतोच. पण त्यात दूध, दही, तूप, बटर, ताक, मलई आणि पनीरही सोडावं लागतं. इतकंच काय मधही वर्ज्य असतं.
 
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीसुद्धा गेम सीजनमध्ये वेगन आहारावर होता. त्यावेळी सगळ्यांनाच जरा आश्चर्य वाटलं. कारण तो अर्जेंटिनाचा आहे आणि दक्षिण अमेरिकेत शाकाहारी जेवण मिळणं कठीण असतं.
 
अशा परिस्थितीत व्हिगन आहार घेणं, खरंच आव्हानात्मक ठरतं.
 
याच रांगेत जेव्हा विराट कोहलीचं नाव जोडलं गेलं, तेव्हा तो वेगन का झाला, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
 
व्हिगन आहार दोन पद्धतीने घेता येतो, असं खेळाडूंच्या आहारतज्ज्ञ दीक्षा छाबडा सांगतात.
 
फलाहार आणि मंद आचेवर शिजलेल्या भाज्या खाणं
ज्वारी, बाजरी, गहू, मक्का आणि डाळी यांचं सेवन आणि त्यासोबत अव्होकॅडोसारखी हाय-फॅट फळ घेणं.
या दोन्ही पद्धतींचं मिश्रणही होऊ शकतं.
 
दुखापतीतून सावरण्यासाठी वेगन आहाराची मदत
छाबडा सांगतात, "व्हिगन आहारामुळे दुखापत लवकर बरी होते. यामुळेच कदाचित खेळाडूंचा कल व्हिगन आहाराकडे वाढताना दिसत असावा."
 
इजा झाल्यावर त्या भागावर सूज येते. या सूजेमुळे जीवाणूंना प्रतिबंध होतो आणि त्यामुळे शरिरावर वाईट परिणाम होत नाही. जखम छोटी असेल तर सूज येणं चांगलं आहे. मात्र इजा गंभीर असेल तर सूज हानीकारकसुद्धा ठरू शकते.
 
अशा दुखापतग्रस्त खेळाडूंना भरपूर अँन्टी ऑक्सिडंट आणि विटॅमिन देणारा आहार गरजेचा असतो.
 
हिरव्या भाज्या, बोरं, कमी शर्करायुक्त फळं या भाज्यांमध्ये ही पोषकतत्व मोठ्या प्रमाणावर असतात. त्यांना अँन्टी इन्फ्लेमेटरी (सूजनाशक) फूडही म्हणतात.
 
हे पदार्थ सूज रोखतात आणि शरिरातली विषद्रव्यं बाहेर काढण्यात मदत करतात. जास्त शर्करायुक्त पदार्थ, मांस यासारखे प्रो-इन्फ्लेमेटरी फूड दुखापतग्रस्त व्यक्तीच्या शरिराला जास्त हानीकारक ठरतात.
 
वेगन आहार वजन नियंत्रणात ठेवतो
व्हिगन आहारात विटॅमिनसोबतच फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे वजय नियंत्रणात ठेवता येतं. फायबरयुक्त आहारामुळे कमी जेवूनही पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाल्लंही जात नाही.
 
मांसाहारामध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रोटीन असतं आणि खेळाडूला प्रोटिनची सर्वाधिक आवश्यकता असते. मांसाहार बंद केला तर शरिराला प्रोटीन कुठून मिळणार?
 
प्रोटीनची कमतरता कशी भरून काढणार?
न्युट्रिशनिस्ट आणि वेलनेस कोच अवनी कौल सांगतात की प्रत्येक खेळाडूला त्याच्या खेळाप्रमाणे आणि शरिराप्रमाणे आहाराची गरज असते. वेटलिफ्टर किंवा बॉडी बिल्डरसाठी प्रोटीन खूप गरजेचं असतं. धावण्याच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या खेळाडूंना ताकदीसोबतच ऊर्जेचीही गरज असते. ही गरज कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असणाऱ्या पदार्थ घेतल्याने पूर्ण होते.
 
त्यामुळे आहारात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट योग्य प्रमाणात असणं गरजेचं असल्याचं अवनी कौल म्हणतात.
 
व्हिगन आहारामुळे रक्तशर्करा म्हणजे ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राहते. यामुळे मधुमेह म्हणजेच डायबीटीज होण्याची शक्यता खूप कमी होते. मात्र जे प्रोटीन प्राण्यांपासून उत्पादित पदार्थांमधून मिळतं त्याची कमतरता कशी भरून निघणार?
 
मांस, दूध, अंडी आणि माशांमध्ये मुबलक प्रमाणात पॉझिटिव्ह नायट्रोजन आणि अमायनो अॅसिड्स असतात.
 
ही कमतरता दूर करण्यासाठी कोणत्या वेगन पदार्थांमध्ये या अन्नघटकांचं प्रमाण अधिक आहे आणि ते पदार्थ तुमच्या आहारात कसे समाविष्ट करता येतील, याची माहिती तुम्हाला हवी. विराट कोहलीसारख्या मोठ्या खेळाडूंकडे आहारतज्ज्ञांची टीम असते. मात्र सामान्य व्यक्तीसाठी संतुलित वेगन आहार तयार करणं, कठीण काम आहे.
 
पर्यावरणासाठी खेळाडू बनत आहेत वेगन?
यूथ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची कार्यशाळा घेणाऱ्या अविन कौल यावर अधिक प्रकाश टाकतात. व्हिगन आहारामुळे पर्यावरणाची अजिबात हानी होत नाही. यामुळेसुद्धा अनेक खेळाडू व्हिगन आहाराला पसंती देत आहेत.
 
मांस शिजवल्यामुळे वातावरणात कार्बन फूटप्रिंटचं प्रमाण वाढतं. संयुक्त राष्ट्रांच्या अन्नधान्य आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार वेगन आहारामुळे पर्यावरणातील कार्बन फूटप्रिंटचं प्रमाण कमी होईल. शिवाय शेती आणि शेतकऱ्यांना फायदा होतो.
 
व्हिगन आहारात प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी डाळी, सोयाबीन, तीळ, शिया सीड्स, किनोओ, चणे, फ्लावर उपयोगी ठरतात.
 
व्हिगन आहार हाच पर्याय आहे का?
इंडियन फेडरेशन ऑफ स्पोर्ट्स मेडिसीनचे अध्यक्ष डॉ. पी. एस. एम. चंद्रन आणि न्यूट्रिशनिस्ट आणि मेटॅबॉलिक बॅलन्स कोच हर्षिता दिलावरी सांगतात, वेगन आहार स्वीकारणं हा खेळाडूंचा वैयक्तिक निर्णय आहे.
 
व्हिगन आहारापासून मिळणारे लाभ इतर आहारातूनही मिळतात. त्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार गरजेचा असतो.
 
हर्षिता दिलावरी सांगतात, "व्हिगन आहारात काही मायक्रो-न्यूट्रियन्टची कमतरता असते. ही कमतरता भरून काढण्यासाठी गोळ्याही घेतल्या पाहिजेत."
 
त्यांच्या मते व्हिगन आहारात फायटोकेमिकल्स मुबलक प्रमाणात असतात. कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांना हे फायटोकेमिकल्स प्रतिबंध करतात. मात्र विटामीन बी-12चं प्रमाण खूप कमी असतं. प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांत विटामीन बी-12 सहज मिळतं. मात्र व्हिगन आहार घेणाऱ्यांना त्यासाठी टॅबलेट्स घेणं गरजेचं असतं.
 
त्यामुळेच व्हिगन आहारात दलिया, कडधान्य आणि सोयाबीन खाणं आवश्यक आहे, असं दिलावरी सांगतात. त्या म्हणतात, "खेळाडूसाठी प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शिअम, विटामीन डी आणि फॅटी अॅसिड्स सर्वात जास्त गरजेचे असतात."