शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (14:56 IST)

ऑपरेशन ब्लू स्टार : जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात भरदिवसा हत्या कुणी केली होती?

सिद्धनाथ गानू
10 ऑगस्ट 1986, सकाळचे साधारण साडेअकरा वाजले होते, शहर पुणे. कँप परिसरात (जिथे लष्कराच्या दक्षिण कमांडचं मुख्यालय आहे) राजेंद्रसिंहजी मार्गावरून एक मारुती कार चालली होती. वळण्यासाठी गाडीने वेग कमी केला आणि तेवढ्यात दोन बाईकस्वार गाडीच्या समांतर आले.
 
त्या बाईकवर मागे बसलेल्या माणसाने कार चालवणाऱ्या व्यक्तीवर एकापाठोपाठ एक चार गोळ्या झाडल्या आणि वेगाने ते पसार झाले. गाडी चालवणारी व्यक्ती म्हणजे तेव्हा नुकतेच निवृत्त झालेले भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य. सुवर्ण मंदिरात लपलेल्या खलिस्तानवाद्यांना संपवण्यासाठी झालेल्या 'ऑपरेशन ब्लू स्टार'चा बदला घेण्यासाठी जनरल वैद्य यांची हत्या केली गेली.
 
ऑगस्ट 1983 मध्ये जनरल वैद्य यांनी लष्कराची सूत्रं हाती घेतली तेव्हा पंजाब धुमसत होता. खलिस्तानवाद्यांचं प्रस्थ वाढत चाललं होतं.
या सगळ्याला पायबंद घालण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लष्करी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.
 
जून महिना उजाडला तसे पंजाबात कठोर निर्बंध लागले. अमृतसर शहरात कर्फ्यू लागला, पत्रकारांना शहरातून बाहेर काढलं गेलं, होत्या नव्हत्या त्या फोन लाईन्सही बंद झाल्या.
 
6 जून 1984 ला सुवर्ण मंदिराला आपला तळ बनवलेले धार्मिक नेते भिंद्रनवाले आणि त्यांचे सशस्त्र अनुयायी विरुद्ध भारतीय लष्कर यांच्यात निकराचा सामना झाला.
 
शीखांसाठी पवित्र अशा सुवर्ण मंदिर आणि अकाल तख्तमध्ये घुसून सैन्याला कारवाई करावी लागली, अकाल तख्तचं नुकसान झालं, पण अखेर भिंद्रनवालेंसह त्यांच्या अनुयायांचा पाडाव झाला आणि खलिस्तानी चळवळीच्या नेतृत्वालाच सैन्याने खिंडार पाडलं.
 
भिंद्रनवाले मारले गेले तरी त्यांचे अनुयायी संपले नव्हते. त्यांना मानणारा आणि भारतापासून वेगळं होऊन शिखांचं स्वतंत्र राष्ट्र मागणारा मोठा वर्ग पंजाबात आणि बाहेरही होता.
भिंद्रनवालेंच्या मृत्यूबद्दलच्या संतापातून 'ऑपरेशन ब्लू स्टार'शी संबंधित दोन मोठ्या व्यक्तिमत्वांची शीख कट्टरतावाद्यांनी हत्या केली- पहिली, ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधींची आणि दुसरी ऑगस्ट 1986 मध्ये जनरल वैद्य यांची.
 
हैदराबाद ते बांगलादेश व्हाया पाकिस्तान
श्रीधरपंत आणि इंदिराबाई वैद्य यांच्या घरी 27 जानेवारी 1926 ला मुलगा जन्माला आला. त्याचं नाव ठेवलं गेलं अरुणकुमार.
 
अलिबाग, पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत, 1944 साली, म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षी अरुणकुमार कॅडेट बनला आणि पुढच्याच वर्षी 'डेक्कन हॉर्स' या पलटणीत दाखल झाला.
 
18व्या शतकात घोडदळाची पलटण म्हणून सुरू झालेल्या 'डेक्कन हॉर्स'मध्ये कालांतराने रणगाडेही सामील झाले.
 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हैदराबादसारखी संस्थानं अजून स्वतंत्रच होती. निजामाविरोधात झालेल्या कारवाईत लष्कराचीही भूमिका होती. एव्हाना वैद्य सैन्यात कॅप्टन झाले होते.
 
दौलताबाद, परभणी या भागात त्यांनी लष्करी कारवाईत भाग घेतला, असं डॉ. सौ. भाग्यश्री पाटसकर यांनी आपल्या 'जनरल अरुणकुमार वैद्य' या पुस्तकात लिहीलं आहे.
अरुणकुमार वैद्यांच्या लष्करी कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1965 चं भारत-पाकिस्तान युद्ध.
 
पंजाबमधल्या खेमकरण, असल उत्तर, चीमा या प्रांतात भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात तुंबळ लढाई झाली. डेक्कन हॉर्स रेजिमेंट या लढाईत कार्यरत होती आणि त्यांचे कमांडिंग ऑफिसर होते लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले अरुणकुमार वैद्य.
 
पाकिस्तानी सैन्याचे अमेरिकन बनावटीचे पॅटन रणगाडे आग ओकत होते. त्या रणगाड्यांना जायबंदी करून भारतीय लष्कराने निर्णायक विजय मिळवला.
 
या युद्धात अतुलनीय शौर्य दाखवल्याबद्दल हवलदार अब्दुल हमीद यांना 'परमवीर चक्र' हा सर्वोच्च लष्करी सन्मान मरणोत्तर प्रदान केला गेला. लेफ्ट. वैद्य यांनाही याच लढाईत 'महावीर चक्र' हा दुसरा सर्वोच्च लष्करी पुरस्कार दिला गेला. या लढाईत सुमारे 100 पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त केले गेले तर 40 पेक्षा अधिक ताब्यात घेण्यात आले.
 
या युद्धानंतर 6 वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडले.
 
साल 1971, यावेळी मुख्य लक्ष पूर्व पाकिस्तानवर असलं तरी पश्चिम सीमाही पूर्णतः शांत नव्हतीच. जम्मूपासून अगदी जवळ असलेल्या शकरगढ सेक्टरमध्ये बसंतरच्या लढाईत भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात तीव्र सामना झाला.
 
ही लढाईसुद्धा रणगाड्यांसाठी गाजली. एव्हाना ब्रिगेडियरपदी पोहोचलेले अरुणकुमार वैद्य या युद्धातही होते. पाकिस्तानी सैन्याकडून होणारा मारा चुकवत आपल्या रणगाड्यांना पुढे सरकवण्याचं काम त्यांनी मोठ्या कौशल्याने केलं.
 
या सगळ्या भागात रणगाडे उद्ध्वस्त करणारे भू-सुरूंग लावलेले होते त्यांना चुकवत वैद्यांनी ही कामगिरी केली. या लढाईत 62 पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त केले गेले. या कामगिरीसाठी ब्रिगेडियर वैद्य यांना दुसऱ्यांदा महावीर चक्र प्रदान केलं गेलं ज्याला सैन्याच्या परिभाषेत 'Bar to Maha Vir Chakra' असं म्हटलं जातं.
 
लष्करप्रमुखपद आणि वाद
वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पेलत आणि पदोन्नती होत जनरल अरुणकुमार वैद्य ऑगस्ट 1983मध्ये लष्करप्रमुख झाले. पण त्यांची ही नेमणूक वादापासून लांब नव्हती.
 
भारतीय लष्कराचे तत्कालीन उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांची ज्येष्ठता डावलून लेफ्टनंट जनरल वैद्य यांना बढती दिली गेली, असा आक्षेप घेतला गेला. लेफ्ट. जनरल सिन्हा यांच्याकडे लेफ्ट. जनरल वैद्य यांच्याइतका प्रत्यक्ष लष्करी कारवाईचा अनुभव (field experience) नव्हता असं कारण तेव्हा पुढे केलं गेलं.
 
पण सिन्हा यांच्या काही भूमिका सरकारला रुचणाऱ्या नव्हत्या त्यामुळे त्यांना डावललं गेलं असा अंदाज तेव्हा अनेकांनी व्यक्त केला होता. अर्थात अनुभव किंवा कर्तृत्वाच्या बाबतीत जनरल वैद्यांबदद्ल कोणतीही शंका असण्याचं कारण नव्हतं.
 
ऑपरेशन ब्लू स्टार आणि हिंसाचार
पंजाबात खलिस्तानवाद्यांचा वाढत चाललेला जोर जेव्हा आटोक्यात येतच नव्हता आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हं दिसत होती तेव्हा अखेर इंदिरा सरकारने लष्कराला पाचारण केलं.
सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईचं नेतृत्व केलं मेजर जनरल ब्रार यांनी, या संपूर्ण मोहीमेची जबाबदारी होती मेजर जनरल सुंदरजी (जे पुढे लष्करप्रमुख झाले) यांच्यावर आणि तेव्हा लष्करप्रमुख होते जनरल वैद्य.
 
ऑपरेशन ब्लू स्टार संपल्यानंतर इंदिरा सरकार आणि लष्कराविरोधातही रोष उसळला. लष्कराने शीखांवर अत्याचार केल्याच्या अनेक अफवा उठल्या, देशाच्या अनेक कानाकोपऱ्यांत हिंसक घटना झाल्या. केवळ चार महिन्यांतच पंतप्रधान इंदिरा गांधींची दिल्लीतल्या राहत्या निवासस्थानी त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली.
 
भारतीय सैन्यात विविध हुद्द्यांवर असलेल्या अडीच हजार पेक्षा जास्त शीख सैनिकांनी लष्कर सोडलं. जनरल वैद्य यांनी 1985 साली इंडिया टुडे मासिकाला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल म्हटलं होतं, "आपल्या जमातीबद्दलची निष्ठा (tribal loyalty) राष्ट्रीय निष्ठेपेक्षा वरचढ ठरल्याचा तो प्रकार होता. लष्करातल्या 75 शीखबहुल युनिट्सपैकी 8 युनिट्समध्येच या घटना घडल्या हे विसरू नका. दुष्प्रचार आणि चिथावणी ज्या युनिट्समध्ये नेतृत्वापेक्षा बलशाली ठरली तिथेच हे पाहायला मिळालं."
 
ब्लू स्टारमध्ये सहभागी प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांना कट्टरतावाद्यांकडून अनेक वर्षं धमक्या येत होत्या. जनरल वैद्यही त्याला अपवाद नव्हते.
त्यांना घोडेस्वारीची आवड होती, ते अनेकदा दिल्ली रेसकोर्सवर रपेट मारायला जात. त्यांना यंत्रणांनी असं न करण्याचा सल्ला दिला.
 
निवृत्तीनंतर त्यांच्या जिवाला अधिक धोका आहे हे ओळखून त्यांना सुरक्षा दिली गेली- एक पोलीस हवलदार.
 
जनरल वैद्यांच्या मृत्यूवेळी पुण्याचे पोलीस आयुक्त असलेले बी. जे. मिसार यांनी इंडिया टुडे मासिकाशी बोलताना, 'धमक्यांना न घाबरता आपण धोका पत्करायला तयार आहोत' असं जनरल वैद्य यांनी त्यांना सांगितल्याचं म्हटलं होतं.
 
शीख मारेकऱ्यांचं पुढे काय झालं?
जनरल वैद्य यांच्या मारेकऱ्यांपैकी सुखविंदर सिंह उर्फ सुखा याला एका महिन्यानंतर पुणे पोलिसांनी पिंपरीमधून अटक केली. त्याचा सहकारी जिंदा याला दिल्लीतून अटक केली गेली.
 
दोघांनी कोर्टात आपण जनरल वैद्य यांना मारल्याचं कबूल केलं, पण तो गुन्हा होता असं मानायला दोघे तयार नव्हते. कारण सुवर्ण मंदिरातली कारवाई हा शीख धर्माचा अपमान होता आणि तो करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवला अशी त्यांची धारणा होती. अनेक खलिस्तान समर्थकांचीही हीच धारणा आहे, त्यामुळेच अनेक समर्थक या दोघांचं आजही कौतुक करतात.
 
या दोघा मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा दिली गेली. या दोघांच्या आयुष्यावर 2015 साली एक चित्रपट आणला गेला, ज्यावर भारतात बंदी घालण्यात आली.
 
जनरल अरुण कुमार वैद्य यांनी वयाची चाळीस वर्षं लष्करी सेवेत काढली. भारतीय लष्करातल्या अत्यंत विभूषित अशा अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. परम विशिष्ट सेवा मेडल, दोन वेळा महावीर चक्र आणि अतिविशिष्ट सेवा मेडल या लष्करी सन्मानांबरोबरच त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मानही प्राप्त होता.
 
1971 सालच्या युद्धानंतर तेव्हा ब्रिगेडियर असलेल्या वैद्य यांना दुसऱ्यांदा महावीर चक्र पुरस्कार घोषित झाला त्यात लिहीलेला मजकूर असा होता, "ब्रिगेडियर वैद्य यांनी शत्रूशी लढताना भारतीय सैन्याच्या सर्वोत्तम परंपरांना अनुसरून सर्वकाळ अतुलनीय शौर्य, कौशल्य, दुर्दम्य इच्छाशक्ती, दूरदृष्टी आणि कल्पकता दाखवली."
 
भारताच्या इतिहासातले राजकीय आणि लष्करी प्रवाह जिथे एकमेकांत मिसळून जातात अशी प्रकरणं मोजकी आहेत. त्यातल्या एकापेक्षा जास्त प्रकरणांमध्ये आघाडीवर राहिलेल्या एका सैनिकाची ही कहाणी.