मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

ब्रिटिश अधिकाऱ्यांनी का वाटत होती 'हिजड्यां'ची भीती?

- सौतिक बिश्वास
 
ऑगस्ट 1852 मधली ही गोष्ट. उत्तर प्रदेशातल्या मैनपुरीमध्ये 'बुरा' या तृतीयपंथीयाची निर्घृण हत्या करण्यात झाली. बुरा त्याकाळच्या वायव्य भारतात आपल्या दोन शिष्य आणि प्रियकरासोबत राहायची.
 
लग्न, बाळाचा जन्म अशा शुभप्रसंगी ती नाचगाणं करून बक्षीस मिळवून आपला उदरनिर्वाह चालवायची. तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच ती प्रियकराला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत रहायला गेली होती.
 
तिच्या पहिल्या प्रियकरानेच सूडाच्या भावनेने तिचा खून केल्याचा निर्वाळा तत्कालीन ब्रिटिश न्यायाधीशांनी दिला. या खटल्यादरम्यान न्यायाधीशांनी तृतीयपंथीयांचा उल्लेख 'भिन्नलिंगी वस्त्र परिधान करणारे', 'भिकारी' आणि 'अनैसर्गिक वेश्या' असं संबोधून केला होता.
 
एका न्यायाधीशाने आपल्या निकालात तृतीयपंथीयांना या 'ब्रिटिश वसाहतीवरचं ओझं' म्हटलं होतं. तर एकाने त्यांचं अस्तित्व ब्रिटिश सरकारसाठी ठपका असल्याचं म्हटलं.
 
एका तृतीयपंथीयाविषयी न्यायाधीशांकडून आलेल्या या प्रतिक्रिया आश्चर्यचकित करणाऱ्या होत्या. कारण या खटल्यात तीच पीडित होती.
 
इतिहासकार डॉ. जेसिका हिंची यांच्या मते या हत्याकांडाने ब्रिटिशांमध्ये तृतियापंथीयांविषयी असलेली 'नैतिक दहशत' उघड झाली.
 
डॉ. हिंची म्हणतात, "खरंतर ती या गुन्ह्यात पीडित होती. मात्र, तृतीयपंथीय गुन्हेगार आणि अनैतिक असतात, असा त्यातून अर्थ काढण्यात आला."
 
तृतीयपंथीय सांभाळ करण्यायोग्यच नसल्याचं ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाटू लागलं होतं. तृतीयपंथीय म्हणजे 'घाण, आजार, संसर्ग, डाग' आहेत, अशीच त्यांची ओळख तयार करण्यात येत होती. 'पुरूषांशी शरीरसंबंध ठेवण्याचं व्यसन असलेल्या' व्यक्ती, अशीच त्यांची प्रतिमा तयार करण्यात येत होती. तृतीयपंथीय केवळ 'सामाजिक नैतिकेतला' धोका आहेत, असं नाही तर 'वसाहतवादी राजकीय सत्तेलाही धोका' असल्याचा तत्कालीन अधिकाऱ्यांचा समज होता.
 
सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये इतिहासाच्या सहप्राध्यापक असलेल्या डॉ. हिंची यांनी जवळपास एक दशक भारतातील ब्रिटिश सरकारच्या काळातील तृतीयपंथीयांसंबंधीच्या ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास केला. या दस्तावेजातून त्यांना त्या काळात भारतात तृतियपंथीयांवर ब्रिटिश सरकारच्या कायद्यांचा काय परिणाम झाला, याचा सखोल अभ्यास करता आला. या अभ्यासाचं सार त्यांनी 'Governing Gender and Sexuality in Colonial India' या पुस्तकात दिलंय.
 
तृतीयपंथीय हे स्त्रियांसारखा वेश परिधान करतात. त्यांचे अंडकोष काढलेले असतात किंवा ते तसेच जन्माला आलेले असतात. त्यांच्यात गुरू-शिष्य परंपरा असते. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्यांना फार महत्त्व आहे. राजा-महाराजांच्या काळात जनानखान्याची राखण करण्याचं काम तृतीयपंथीय करायचे. तर काही संस्कृतींमध्ये तृतीयपंथीय नाच-गाणे करून लोकांचं मनोरंजन करायचे.
 
दक्षिण आशियामधल्या अनेक देशांमध्ये असा समज आहे की तृतीयपंथीयांच्या आशीर्वादाने निपुत्रिकालाही अपत्यप्राप्ती होऊ शकते आणि तृतीयपंथीयाने निपुत्रिक राहण्याचा शाप दिल्यास त्या व्यक्तीला कधीही अपत्यप्राप्ती होत नाही. अनेक तृतीयपंथीय मुलं दत्तक घेतात. त्यांचे प्रियकरही असतात. आजकाल अनेकजण तृतीयपंथीयांना ट्रान्सजेंडर समजतात. मात्र, तसं नाही. 2014 साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हिजड्यांना अधिकृतपणे तृतीयपंथीय म्हणून ओळख दिली.
 
बुरा त्या काळी भारतातल्या उत्तर प्रांतात राहणाऱ्या अडीच हजार नोंदणीकृत हिजड्यांपैकी एक होती. बुराच्या मृत्यूच्या अनेक वर्षांनंतर तृतीयपंथीयांची संख्या कमी करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली. 1871च्या कायद्याअंतर्गत तृतीयपंथीयांना गुन्हेगार मानण्यात आलं.
 
या कायद्यामुळे तृतीयपंथीयांवर पाळत ठेवण्यासाठी पोलिसांना अधिकार मिळाले. यानंतर पोलीस तृतीयपंथीयांची सर्व माहिती एका रजिस्टरमध्ये गोळा करू लागले. डॉ. हिंची सांगतात, "अशा प्रकारचं रजिस्टर तयार करण्यामागचा उद्देश तृतीयपंथीयांवर पाळत ठेवण्याचा मार्ग होता. शिवाय, अंडाशय काढण्याची पद्धत बंद करून तृतीयपंथीय तयारच होणार नाही, यासाठीही प्रयत्न केला जायचा."
 
त्याकाळी तृतीयपंथीयांना स्त्रियांसारखे कपडे घालणे, दागिने घालणे आणि सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करण्यावर बंदी घालण्यात आली आणि हे नियम न पाळणाऱ्याला दंड किंवा तुरुंगवास व्हायचा. इतकंच नाही तर पोलीस त्यांचे लांब केसही कापत आणि कुणी स्त्रियांसारखे कपडे किंवा दागिने घातल्यास तेही काढून घेत. डॉ. हिंची सांगतात, "पोलीस नेमके काय शिक्षा करत हे स्पष्ट नसलं तरी तृतीयपंथीयांना त्यांच्या जाचाला सामोरं जावं लागायचं."
 
तृतीयपंथीयांनी आपल्याला सार्वजनिक ठिकाणी आणि जत्रांमध्ये नाचण्याची आणि नाटक सादर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल केल्या होत्या. डॉ. हिंची सांगतात की नाच आणि नाटक हेच त्यांच्या रोजगाराचं साधन होतं. 1870च्या दशकाच्या मध्यात गाझीपूरच्या तृतीयपंथीयांनी आपल्यावर उपासमारीची वेळ आल्याची तक्रार दाखल केली होती.
 
अधिकाऱ्यांनी आणखीही एक धक्कादायक पाऊल उचललं होतं. त्यांनी या तृतीयपंथीयांकडे राहणारी लहान मुलं बळजबरीने ताब्यात घेतली. एखादा हिजडा लहान मुलाचा सांभाळ करत असेल तर त्याला दंड किंवा तुरुंगवासही व्हायचा.
 
यापैकी अनेक मुलं खरंतर त्यांचे शिष्य असायचे. काही मुलं अनाथ, दत्तक घेतलेली आणि काही बालमजूर म्हणून असायची. तर काही मुलं ही संगीतकारांची असायची. ही मुलं तृतीयपंथीयांसोबत कला सादर करत. तर काही तृतीयपंथीय मुलं असलेल्या विधवांसोबत राहायचे. मात्र, पोलिसांच्या मते ही मुलं म्हणजे, "नैतिक अधःपतनाचे स्रोत होते."
 
डॉ. हिंची सांगतात, "तृतीयपंथीय भारतीय मुलांसाठी धोका असल्याचं तत्कालीन सरकारला वाटायचं. खरंतर त्या तुलनेत हिजड्यांकडे खूप कमी मुलं असायची." सरकारी माहितीनुसार 1860 ते 1880 दरम्यान तृतीयपंथीयांसोबत राहणाऱ्या मुलांची संख्या 90 ते 100 इतकीच होती. यातल्या खूपच कमी मुलांना हिजडा करण्यात आलं होतं आणि त्यातले अनेकजण आपल्या पालकांसोबतच राहायचे.
 
डॉ. हिंची सांगतात, "तृतीयपंथीयांना सार्वजनिक जीवनात हद्दपार करून त्यांचं सांस्कृतिक अस्तित्व संपवणं, हा या कायद्याचा अल्पकालीन उद्देश होता आणि दीर्घकालीन उद्देश होता तृतीयपंथीयांची संख्या कमी करत नामशेष करणं. वरिष्ठ पदावर असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना तृतीयपंथीय म्हणजे राजसत्ता आणि वसाहतवादी अधिकाराला धोका वाटायचे."
 
ज्या व्यक्तींच्या लैंगिकतेविषयी शंका असायची, त्यांच्यावरही पाळत ठेवली जायची. बायकांसारखे दिसरणारे, स्त्रियांसारखे कपडे घालणारे, नाटकांमध्ये काम करणारे आणि नातेवाईकांसोबत राहणाऱ्यांचा यात समावेश होता. इतकंच नाही तर नाटकांमध्ये स्त्री पात्र वठवणारे पुरूष आणि महिलांसारखा वेश असलेल्या भाविकांवरही पाळत ठेवली जायची.
 
हिंदू धर्मात जो श्रद्धेचा विषय होता त्या तृतीयपंथीयांविषयी ब्रिटिश आणि इंग्रजी बोलणाऱ्या तथाकथित उच्चभ्रू भारतीयांना तिरस्कार वाटायचा.
 
हिंदू धर्मातल्या काम भावनेला ब्रिटिशांनी हीन लेखल्याचं भारतीय संस्कृतीविषयीचे अभ्यासक वेंडी डॉनिगर म्हणतात. मात्र, तृतीयपंथीयांना नाकारण्यामागे धर्म हे कारण नसल्याचंही ते सांगतात. त्यांच्या मते ब्रिटिशांना त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर, त्यांची लैंगिकता यावर आक्षेप होता. त्यांची घृणा वाटायची.
 
इतका भीषण इतिहास असूनही तृतीयपंथीयांनी त्यांना नामशेष करण्याचे पोलिसांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत जगण्याची स्वतःची रणनीती तयार केली आणि आज सार्वजनिक स्थळी ते सहज नजरेस पडतात. डॉ. हिंची सांगतात, कायदा मोडण्यात, पोलिसांना गुंगारा देण्यात आणि पुढे जात राहण्यात ते तरबेज झाले. इतकंच नाही तर आपल्या गोतावळ्यात आणि आपल्या समाजात स्वतःच्या सांस्कृतिक प्रथाही त्यांनी जिवंत ठेवल्या. पोलिसांना थांगपत्ता लागू नये, म्हणून ते आपली मालमत्ताही लपवून ठेवू लागले.
 
डॉ. हिंची सांगतात, त्यांना गुन्हेगार म्हटलं गेलं. अनैसर्गिक म्हटलं गेलं. त्यांना नामशेष करण्याचे कायदेशीर प्रयत्नही झाले. मात्र, तरीही आज दक्षिण आशियातल्या सार्वजनिक जीवनात, संस्कृतीत, चळवळींमध्ये आणि राजकारणात त्यांचं अस्तित्व दिसतं, यातूनच त्यांचं यश स्पष्ट होतं.
 
भारतात त्यांना आजही सापत्न वागणूक मिळते, त्यांना गरिबीचं जीवन जगावं लागतं. तरी देखील लग्न, बारसं अशा शुभकार्यांमध्ये नाचून ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. ही जगण्यासाठीच्या संघर्षाची रोमांच उभी करणारी कहाणी आहे.